जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 5 : जिल्ह्यातील शासकीय तथा निमशासकीय बालगृह येथे राहणाऱ्या मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा तसेच इतर मुलांसोबत स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्म यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे, कार्यक्रम अधिकारी संग्राम शिंदे, पिठासन अधिकारी इशा प्रियदर्शनी भास्कर, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासारकर, वैद्यकीय अधिकारी अमोल शेळके, बालकल्याण समितीच्या सदस्या ज्योत्स्ना मोहितकर, अमृता वाघ, वनिता घुमे, भावना देशमुख, मनिषा नखाते आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला रफी अहमद किडवाई स्कूलद्वारे स्कॉउट गाईड परेड आणि धगधगती मशाल पेटवून मैदानाच्या प्रदक्षिणेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमात महिला संरक्षण, बाल कामगार प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, बालशोषण प्रतिबंध वर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
प्रास्ताविकात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांनी विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक व कौशल्यात्मक विकास व्हावा व बालगृहातील मुलांना बाहेर जगतातील स्पर्धाना सामोरे जाण्याचे ध्येर्य निर्माण व्हावे, यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव 2023-24 चे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बालगृह आणि शाळांतील 1000 विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळ, इनडोर खेळ आणि सांस्कृतिक स्पर्धेची चुरस रंगणार असून खो-खो, कबड्डी, धावणे, बुद्धिबळ, कॅरम, वक्तृत्व , निबंध, चित्रकला, वादविवाद, रांगोळी, नृत्य, गायन, नक्कल आणि एकांकिका आदि स्पर्धेकरीता चुरस बघायला मिळणार असल्याची माहिती दिली.
जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांनी, हा एक उत्तम उपक्रम असून याद्वारे विद्यार्थ्याना आपले कला कौशल्य दाखविण्याचे उत्तम व्यासपीठ उपलब्ध असल्याचे प्रतिपादन केले. इतरही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्पर्धांसाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजूरकर तर आभार प्रिया पिंपळशेंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन, वन स्टॉप सेंटर, स्त्री आधार केंद्र, जिल्ह्यातील बालगृह आदि सहकार्य करीत आहेत.
००००००
No comments:
Post a Comment