सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी अनुदान
चंद्रपूर, दि.24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती (नवबौद्धांसह) व आर्थिक दृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय कुटुंबांमधील तरुण-तरुणींना अनाठायी खर्च व कर्जबाजारीपणामुळे येणाऱ्या आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्यास 25 हजार रुपये इतके कन्यादान अनुदान देण्यात येणार असून, विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला प्रत्येक जोडप्यामागे 4 हजार इतके अनुदान देण्यात येणार आहे.
उपरोक्त योजनेचा लाभ घेण्यासाठी दाम्पत्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा यातील कोणत्याही कलमाचे उल्लंघन केलेले नसावे, ही अट बंधनकारक आहे. सदर योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी ऑगस्ट अखेरपर्यंत विवाह सोहळ्यासाठी प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांचे कार्यालयात सादर करावेत.
या अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक संस्थांनी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
00000000

No comments:
Post a Comment