Search This Blog

Thursday, 3 March 2022

नागरिकांच्या सेवेसाठी ‘हॅलो आरटीओ’ व मदत कक्ष कार्यान्वित


 नागरिकांच्या सेवेसाठी ‘हॅलो आरटीओ’ व मदत कक्ष कार्यान्वित

Ø 07172272555 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 3 मार्च : उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरच्या कार्यक्षेत्रात 15 तालुके येत असून मुख्यालयापासून इतर तालुक्यांचे अंतर लक्षात घेता वाहनधारकांना विविध कामासाठी प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य होत नाही. त्यामुळे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हॅलो आरटीओ’ व मदत कक्ष कार्यान्वित केला आहे.

परिवहन विभागाच्या सेवा जसे लायसन्स, वाहनांचा कर भरणे, वाहन हस्तांतरण करणे, योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण करणे, परवाना इत्यादी कामांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील तालुक्यांचे अतंर लक्षात घेता प्रत्येक वेळी वाहनधारकास कार्यालयातील कामासाठी किंवा अनुषंगीक माहितीसाठी / अडचणीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य होत नाही. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन परिवहन विभागाने 07172272555 हा क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास जनतेची वेळेची बचत होणार असून मध्यस्थाद्वारे होणारी फसवणूक टाळता येणे शक्य आहे.

व्हॉट्सॲप क्रमांकावर पुरविण्यात येणारी माहिती : परिवहन विभागाच्या संबंधित कामाकाजाचे ऑनलाईन अर्ज करतांना प्रत्येक कामाचे फ्लो – चार्ट पुरविण्यात येतील. कार्यालयात येण्यापूर्वी कार्यालयीन कामाकाजासाठी आवश्यक प्रत्येक दस्ताऐवज माहिती व्हॉट्सॲपद्वारे प्राप्त होईल. वाहनधारकांना पडणा-या सामान्य प्रश्नांची उत्तरे तसेच ऑनलाईन अर्ज भरतांना तांत्रिक अडचणीबाबत माहिती उपलब्ध होईल. थकीत वाहन कर व पर्यावरण कर धारकांना मागणी पत्र या व्हॉट्सॲप क्रमांकाद्वारे पाठविण्यात येणार असून थकीत कर वसुलीसाठी कार्यालयीन क्रमांक उपयोगात आणता येणार आहे.

जिल्ह्यातील वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या ‘हॅलो आरटीओ’ या प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

युक्रेनमधून चंद्रपूरचे सहा विद्यार्थी स्वगृही


 युक्रेनमधून चंद्रपूरचे सहा विद्यार्थी स्वगृही

Ø चार दिल्लीत दाखल, एक हंगेरीत तर दुसरा रोमानियाच्या मार्गावर

चंद्रपूर दि. 3 मार्च : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील 12 विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी सुखरुप स्वगृही परतले आहेत. तर चार विद्यार्थी दिल्ली येथे पोहचले असून उर्वरीत दोन विद्यार्थी येण्याच्या मार्गावर आहे. यापैकी एक जण हंगेरी या देशाच्या सीमेवर असून दुसरा विद्यार्थी रोमानिया या देशाच्या मार्गावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

चंद्रपूर जिल्ह्यात पोहचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हर्षल बलवंत ठावरे (चिमूर), आदिती अनंत सायरे (वरोरा), साहिल संतोष भोयर (बल्लारपूर), खुशाल बिपूल बिस्वास (चंद्रपूर), शेख अलिशा करीम (राजुरा) आणि गुंजन प्रदीप लोणकर  (चिमूर) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चिमुरची ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे, चंद्रपूर येथील धीरज असीम विश्वास आणि महेश भोयर तर ब्रम्हपूरी येथील महक उके दिल्ली येथे पोहचले आहेत. तर भद्रावती येथील नेहा शेख ही हंगेरीच्या सीमेवर असून चंद्रपूरचा दीक्षाराज अकेला हा रोमानिया देशाच्या सीमेकडे वाटचाल करीत असल्याची माहिती संबंधितांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला दिली. 

युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी त्वरीत जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील 07172-251597 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 7666641447 या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Wednesday, 2 March 2022

बुधवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त तर 2 बाधित

 

बुधवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त तर 2 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 23

चंद्रपूर दि. 2 मार्च : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये सिंदेवाही 1 तर गोंडपिपरी येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, मुल, सावली, पोंभूर्णा, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 936 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 346 झाली आहे. सध्या 23 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 78 हजार 827 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 78 हजार 284 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000


Tuesday, 1 March 2022

मंगळवारी जिल्ह्यात 10 कोरोनामुक्त तर 2 बाधित

 

मंगळवारी जिल्ह्यात 10 कोरोनामुक्त तर 2 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 24

चंद्रपूर दि. 1 मार्च : गत 24 तासात जिल्ह्यात 10 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 2 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चिमूर  येथे 2 रुग्ण आढळून आले असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 934 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 343 झाली आहे. सध्या 24 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 78 हजार 376 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 77 हजार 651 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

ब्रम्हपुरीतील शासकीय रुग्णालयात मिळणार अद्यावत सोयीसुविधा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार




 

ब्रम्हपुरीतील शासकीय रुग्णालयात मिळणार अद्यावत सोयीसुविधा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप

चंद्रपूर, दि. 1 मार्च : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील रूग्णांना अनेकदा गंभीर आजाराच्या उपचारासाठी चंद्रपूर येथे जावे लागते. रुग्णांची ही अडचण लक्षात घेत त्यांना दिलासा देण्यासाठी ब्रम्हपुरी येथील शासकीय रुग्णालय सर्वसोयी सुविधांनी अद्यावत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ब्रम्हपुरी येथील शासकीय रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर खेमराज तिडके, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, नगरसेवक विलास विखार, न.प. आरोग्य सभापती प्रीतीश बुरले, नगरसेवक महेश भर्रे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, धनराज मुंगले, बंटी श्रीवास्तव, मुन्ना रामटेके आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, ब्रम्हपुरी येथील शासकीय रुग्णालयात यावर्षी ट्रामा सेंटर सुरू होईल. तसेच ५० बेडचे आयसीयु युनीट सुध्दा मंजूर करण्यात येत आहे. रुग्णालयात कुठलीही कमतरता राहणार नाही, असा विश्वास देतो, असे ते म्हणाले.

यापूर्वी दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रासाठी चंद्रपूर येथे जावे लागत होते. जाणे-येणे करण्यासाठी त्यांना फार त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांना स्थानिक स्तरावर प्रमाणपत्र देण्याच्या उद्देशाने ब्रम्हपुरी येथे काही दिवसांपूर्वी दिव्यांग तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यातील १६० दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जिवने यांनी केले. संचालन डॉ. कामडी यांनी तर आभार डॉ. पटले यांनी मानले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ खंडाळे, डॉ.इंगळे, डॉ. अब्दुल रब शेख, डॉ. नागमोती, डॉ. मेंढे, डॉ. सिडाम, डॉ. नाकाडे, डॉ. स्नेहल कहुरके, डॉ. खरकाटे आदी उपस्थित होते.

00000