Search This Blog

Friday, 19 May 2023

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे 21 मे रोजी आयोजन

 


छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे 21 मे रोजी आयोजन

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

चंद्रपूर, दि. 19: कौशल्य उद्योजकता व नाविण्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 21 मे  रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे जिल्ह्यातील होतकरू तरूणांसाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. सदर शिबीराचे उद्घाटन राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमात उमेदवारांना 10 वी, 12 वी नंतर शिक्षणाच्या वाटा, सीईटी/12 वी नंतर विविध अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील रोजगारांच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, पालक विद्यार्थी समुपदेशन, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारीत प्रशिक्षण व रोजगारांच्या संधी आदीबाबत मार्गदर्शन, व्यवसाय व करिअर संबंधित विषयाची माहीती तज्ञ मार्गदर्शकाकडून मिळणार आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर करिअर शिबीराचा लाभ घ्यावा. तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सत्रात उपस्थित राहण्याबाबत कळवावे व स्वत:उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रवी मेंहेदळे यांनी केले आहे.

00000

जिल्हाधिकाऱ्यांकडून कॅन्सर हॉस्पिटल बांधकामाची पाहणी

 



जिल्हाधिकाऱ्यांकडून कॅन्सर हॉस्पिटल बांधकामाची पाहणी

चंद्रपूर, दि. 19: चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काल चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या  बांधकाम स्थळी भेट देवून बांधकाम प्रगतिची पाहणी केली. सदर प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्वक व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी प्रकल्प अंमलबजावणी प्रमुख डॉ. राकेश कपुरिया, प्रकल्प व्यवस्थापक वैभव गजभिये, वित्तिय व्यवस्थापक मयुर नंदा आदींची उपस्थिती होती.

00000

धान खरेदी नोंदणीकरीता 31 मे पर्यंत मुदतवाढ


धान खरेदी नोंदणीकरीता 31 मे पर्यंत मुदतवाढ

Ø नोंदणीसाठी शेतकऱ्यांची उपस्थिती बंधनकारक

चंद्रपूर, दि. 19: पणन हंगाम 2022-23 रब्बी (उन्हाळी) मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणी करताना हंगाम 2022-23 पासून ज्या शेतकऱ्याचा सातबारा आहे, त्याच शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे.

धान खरेदीकरीता एन.ई.एम.एल पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी, दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील 35 खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.

00000

Thursday, 18 May 2023

शबरी आदिवासी महामंडळातर्फे दहा लक्ष पर्यंत कर्ज


शबरी आदिवासी महामंडळातर्फे दहा लक्ष पर्यंत कर्ज

Ø ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 18: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या 18 ते 45 वयोगटातील स्त्री-पुरुष तसेच बचत गटासाठी रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अल्प व्याजदरावर दीर्घ मुदतीच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शबरी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शाखा व्यवस्थापक आर. एस. भदाणे यांनी केले आहे

महिला सबळीकरण योजनेसाठी 2 लक्ष रुपये, स्वयंसहायता बचत गटासाठी 5 लक्ष, कृषी आणि संलग्न व्यवसायासाठी दोन लक्ष, हॉटेल/ढाबा व्यवसायासाठी 5 लक्ष, स्पेअर पार्ट/ऑटो वर्कशॉप/गॅरेज व्यवसायासाठी 5 लक्ष, लघुउद्योग व्यवसायासाठी 3 लक्ष, तर वाहन व्यवसायासाठी 10 लक्ष रुपये कर्ज महामंडळातर्फे देण्यात येत आहे.

कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्जासोबत आधार कार्ड, जातीचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. कर्जयोजनेविषी अधिक माहितीसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, मुल रोड, मधुबन प्लाझा, तिसरा माळा, माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल शेजारी, शिवाजीनगर, चंद्रपूर येथील शाखा कार्यालयात भेटावे.

000000 

स्वातंत्र्य सैनिकांनी हयातीचा दाखला जमा करावा


स्वातंत्र्य सैनिकांनी हयातीचा दाखला जमा करावा

Ø स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या जोडीदारांचा होणार सत्कार

चंद्रपूर, दि. 18 : स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्याने सर्व स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे जोडीदार यांचा मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांचे जोडीदार हे या सत्कारापासून वंचित राहू नये यासाठी सर्व स्वातंत्र्यसैनिक व जोडीदारांनी हयातीचा दाखला व स्वातंत्र्य संग्राम सैनिकाशी संबंधित इतर कागदपत्रे निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडे 25 मे 2023 पर्यंत जमा करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

00000