Search This Blog

Friday, 12 September 2025

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

 

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

मुंबईदि. १२ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणीशस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहेत.

या विशेष मोहिमेतून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मेवाटप केले जाणार असून काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवरील निदान, सल्ला आणि उपचार देखील मोफत केले जाणार आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरे

राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये, तालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. गाव, वस्ती, तांडेपाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ होईल. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येतील.

उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग

या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठसार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिकावैद्यकीय शिक्षण विभागनगरपालिकाइंडियन मेडिकल असोसिएशनमहाराष्ट्र वैद्यकीय परिषदधर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, ईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्र रुग्णालये व विविध सामाजिक संस्था या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी होणार आहे.

तळागाळातील नागरिकांसाठी मोठा दिलासा

नेत्ररोग उपचाराचा खर्च गरीब नागरिकांच्या खिशाला परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळण्याचा मार्ग या उपक्रमातून खुला होणार आहे.

या उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहचण्याकरिता सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. यामुळे लाखो रूग्णांवर मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रियेसह औषधोपचार केले जाणार आहेत.  या शिबिराचा लाभ राज्यातील गरजू रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment