Search This Blog

Wednesday, 2 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दहा हजार रुपयांची तातडीने मदत देणार : ना. विजय वडेट्टीवार मंत्री मदत व पुनर्वसन






 

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दहा हजार रुपयांची तातडीने मदत देणार : ना. विजय वडेट्टीवार मंत्री मदत व पुनर्वसन

Ø  अन्न धान्य, भांडे व कपडे याकरिता दहा हजार रुपये आर्थिक मदत

Ø  ही प्रारंभिक मदत असली तरी सर्वे अंती भरीव मदत देणार

Ø  महाविकास आघाडी सरकार कडून आपातग्रस्ताना तातडीने भरीव मदत मिळणार

चंद्रपूर दि. 2 सप्टेंबर :- गेल्या काही दिवसापासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू होते. अशातच मध्यप्रदेशातील  संजय सरोवर प्रकल्पातील पाणी सोडल्याने  गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे 5 मिटर पर्यंत उघडावे लागले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली तालुक्यातील अनेक गावासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आल्याने हजारो हेक्टर धानाच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. घराघरात पाणी शिरल्याने अन्न धान्य, घरात असलेले साहित्य यांचे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना अन्न धान्य व कपडे साठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची तातडीने प्रारंभिक मदतीचे वाटप आज पासून सुरू करण्यात येणार असून सर्वे अंती भरीव मदत करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना दिली.

मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणी सोडल्याने गोसिखुर्द प्रकल्पाचे पूर्ण दरवाजे 5 मिटर पर्यंत उघडावे लागले. त्यामुळे 1995 पेक्षाही भीषण महापूर पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आल्यामुळे अनेक गावे जलमय झाली. हजारो हेक्टर धानाची शेती पाण्याखाली आल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या महापुरात शेतकऱ्याचे पाळीव जनावरे वाहून गेली तर काही मृत्यमुखी पडले. तर हजारो नागरिकांच्या घराघरात पाणी गेल्याने घरातील अन्न धान्य, कपडे, साहित्य यासह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी स्वतः राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी तालुक्यात तळ ठोकून स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी बोट व हेलिकॉप्टर द्वारे करून या भिषण परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. तसेच ना. वडेट्टीवार यांनी पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी व अन्न धान्य पोचविण्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरफच्या टीम पाचारण केल्यामुळे आपातग्रस्त लोकांना दिलासा देण्याचे काम ना. वडेट्टीवार यांनी केले असून या गंभीर परिस्थिती वर स्वतः जातीने लक्ष ठेऊन आहे. या आपातग्रस्ताना तातडीने मदत मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अन्न धान्य व भांडे यासाठी पाच हजार रुपये व कपड्यांकरिता पाच हजार रुपये या प्रमाणे दहा हजार रुपयांची प्रारंभिक मदतीचे वाटप आज पासून सुरू करण्यात येत आहे अशी माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देऊन त्यांनी पुढे सांगितले की, ही प्रारंभिक मदत असून अधिकाऱ्याकडून प्रत्यक्ष मोका पंचनामे केल्यानंतर भरीव मदत महाविकास आघाडी सरकार कडून करण्यात येणार आहे . यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

00000


चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 02 सप्टेंबर , 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता

 चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 02 सप्टेंबर , 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता



जिल्ह्यात 30 सप्टेंबर पर्यंत कलम 144 लागू : जिल्हाधिकारी


 

जिल्ह्यात 30 सप्टेंबर पर्यंत कलम 144 लागू : जिल्हाधिकारी

प्रवासासाठी  ई पास परवान्याची आवश्यकता नाही

सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू

औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी

चंद्रपूर, दि.2 सप्टेंबर (जिमाका): राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने 31 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार  चंद्रपूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू असणार आहे. जिल्ह्यात दिनांक 1 ते 30 सप्टेंबर पर्यंत आदेश लागू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आता प्रवासासाठी ई पास ची आवश्यकता राहणार नाही. मात्र नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

या बाबींना मनाई असणार :

सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टीट्युट या बंद राहतील. तथापि, ऑनलाईन, अंतराचे शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल्स व मार्केट कॉम्लेक्समधील) बार, सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.

रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसार चालू राहील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.

सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. तथापी तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरू, पुजारी यांना करता येतील. वय वर्षे 65 वरील व्यक्ती,  दुर्धर आजार असणारे नागरिक अर्थात पर्सन विथ कोमोरबिडिटीस वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.

या बाबींना परवानगी राहील:

दिनांक 2 सप्टेंबर पासुन सर्व हॉटेल व लॉजिंग चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि शासनाने निर्धारित केलेली आदर्श कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच, व्यक्ती व वस्तू यांच्या आंतरजिल्हा हालचालींवर कोणतीही बंधने राहणार नाहीत. अशा हालचालींसाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र परवानगी, मान्यता, इत्यादी परवान्याची  आवश्यकता असणार नाही.

दिनांक 2 सप्टेंबर पासून खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेद्वारे प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी राहील. तथापि त्याकरीता परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील. बाह्य शारिरीक क्रियाकलाप (आऊटडोअर फिजिकल अॅक्टिव्हिटी) करण्यास कोणतेही बंधन असणार नाही.

सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूकीतील लोकांच्या हालचाली करण्यास पुढील प्रमाणे परवानगी राहील. यामध्ये टॅक्सी,कॅब,अॅग्रीगेटर फक्त अत्यावश्यक 1 अधिक 3 प्रवासी, रिक्षा फक्त अत्यावश्यक 1 अधिक 2 प्रवासी, चारचाकी फक्त अत्यावश्यक 1 अधिक 3 प्रवासी, दोन चाकी 1 अधिक 1 प्रवासी  मास्क व हेल्मेट्सह तसेच प्रवास करतांना कायम मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.

सर्व मार्केट दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7  यावेळेमध्ये  चालू राहतील. तथापि मेडिकल, औषधाची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. जर 5 पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास सदर दुकाने तात्काळ बंद करावीत.

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कोणतीही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादित लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभाचे आयोजन करणे संबंधित उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 (संपूर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन परवानगी राहील. वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देण्यात येत आहे. (घरपोच वितरणासह) केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच या कार्यालयाकडील यापूर्वी दिलेल्या अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सेतु केंद्र, महा-ई सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडील आदेशामधील अटी व शर्तींन्वये चालू ठेवण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील इंधन पंप, औद्योगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी आहे. अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट, सामान्य आदेशाद्वारे परवानगी देणेत आलेली कृती करणेस परवानगी राहील.

नियमांचे पालन न केल्यास कारवाई होणार:

सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे, तेथे असताना तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 200 रु दंड आकारण्यात येईल. जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकणेस मनाई असून, थुंकल्यास 200 रु दंड आकारण्यात येईल.

दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी. तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु.500/- दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रुपये 1 हजार दंड व ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान 3 दिवसांसाठी बंद ठेवण्याची  कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रुपये 1 हजार दंड व दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रुपये 2 हजार दंड  आकारण्यात येईल. तसेच तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना 3 दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात सदर आदेशाचे काटेकोर पणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत करण्यात येईल.

जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

कामाच्या ठिकाणी पुढील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक :

शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये कामाच्या ठिकाणी, मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्क्रीनिंग, हँडवॉश, सॅनिटायजर यांची एन्ट्री पॉईंट व एक्झिट पॉईंटवर व्यवस्था करावी.

कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाच्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे.औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सट्टीचे वेळी, कामावर येतांना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

आरोग्य सेतु अॅपचा वापर :

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू अॅपचा वापर करणे आवश्यक राहील. तसेच हे अॅप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करावी.

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविण्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी.

सदरचा आदेश दि.1 सप्टेंबर ते दिनांक 30 सप्टेंबर या कालावधीकरिता संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्याचे हद्दीत लागु राहील.

000000

Tuesday, 1 September 2020

ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर परिस्थिती बाबत पालकमंत्र्यांकडून आढावा




 

ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर परिस्थिती बाबत पालकमंत्र्यांकडून आढावा

पूरग्रस्त भागातील गावांना 5 कोटी रुपयाची तात्काळ मदत;

प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपयांची मदत मिळणार

चंद्रपूर दि.1 सप्टेंबर : ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांना पाच कोटी रुपयांची तात्काळ मदत देण्यासोबतच प्रत्येकी पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन  मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, नगर परिषदेचे गटनेते विलास निखार, नगरसेवक नितीन ऊराडे, महेश भरे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, उपविभागीय अभियंता बांधकाम श्री.कुचनकर तसेच खेमराज तिडके, नानाजी तुपर प्रामुख्याने उपस्थित होते.

तालुक्यात आलेली पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला व योग्य त्या दक्षता घेण्याच्या सूचना दिल्यात. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासन आपल्या सोबत आहे. पूर परिस्थितीमध्ये आपणास सहकार्य करण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर आहे अशी हमी  त्यांनी यावेळी दिली.

ब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगाव, बेटाळा व किन्ही गावाला भेट देऊन शेती, पशूधन आणि मालमत्तेची झालेल्या अपरिमित हानीची पाहणी केली व गावातील रस्त्यांची स्थिती जाणून घेतली. कोरोना संसर्गाच्या काळात तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत गावागावात आरोग्य तपासणी कॅम्प लावण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. पुरग्रस्त भागातील नागरिकांना गावातील स्वच्छता व शुद्ध पिण्याचे पाणी नगर परिषदेमार्फत तसेच खाजगी टॅंकरद्वारे गावागावात पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही ना. वडेट्टीवार यांनी  दिलेत.

ग्रामपंचायत व तलाठ्यांमार्फत गावातील पडझड झालेल्या घरांची तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, पंचनामे करताना कोणतेही घर सुटता कामा नये, अशा स्पष्ट सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी व सतर्कता बाळगावी अशा सूचना सुद्धा यावेळी केल्यात.

त्यासोबतच पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय शोध व बचाव पथकातील विजय गुनगुने, सुधाकर आत्राम, राहुल पाटील, राष्ट्रपाल नाईक, अनिल निकेसर, मिथुन मडावी, राजू निंबाळकर, राजू टेकाम तसेच चंद्रपूर पोलीस आपत्ती टीमचे अशोक गर्गेलवार, मंगेश मत्ते, वामन नाक्षीने, गिरीष मरापे, दिलीप चव्हाण समीर चापले विक्की खांडेकर, सुचित मोगरे, अजित बाहे, उमेश बनकर यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

00000

3 सप्टेंबर पासून होणाऱ्या लॉकडाऊनच्या परवानगी बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर : जिल्हाधिकारी



 3 सप्टेंबर पासून होणाऱ्या लॉकडाऊनच्या परवानगी बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर : जिल्हाधिकारी

Ø  चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात नव्या 216 बाधितांची नोंद

Ø  1298 कोरोनातून बरे ; 1436 वर उपचार सुरु

Ø  बाधितांची संख्या पोहचली 2763 वर

चंद्रपूर,दि.1 सप्टेंबर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिनांक 3 सप्टेंबर पासून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या सुचना केलेल्या आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे कडक लॉकडाऊन करण्याच्या परवानगी करिता प्रस्ताव पाठविलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्हिडिओ संदेश जारी करतांना दिली आहे.

दिनांक 3 ते 8 सप्टेंबर 2020 पर्यंत आरोग्य सेवा संदर्भातील आस्थापना वगळून सर्व प्रकारचे दुकाने, किराणा दुकाने, सर्व व्यवसाय, आस्थापना या संपुर्णतः बंद राहतील. दिनांक 8 ते 12 सप्टेंबर पर्यंत सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे दुकाने आणि त्यांचे ठोक विक्रेते जसे किराणा दुकाने, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, मास-मासे विक्री, पशुखाद्य इत्यादींच्या आस्थापना सुरू राहतील. इतर सर्व प्रकारचे दुकाने आणि आस्थापना बंद राहतील अशा परवानगी संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केलेला आहे.

त्यामुळे लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून घ्यावी. या कालावधीमध्ये नागरिकांनी घरातच राहून लॉकडाऊनचे पालन करावे आणि प्रशासनाला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 763 वर पोहोचली आहे. यापैकी, उपचाराअंती 1 हजार 298 कोरोना बाधित बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 1 हजार 436 आहे. गेल्या 24 तासांमध्ये नवे 216 बाधित पुढे आलेले आहेत.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 96,  वरोरा, नागभीड व मुल येथील प्रत्येकी 6, सावली 29, राजुरा 20, बल्लारपूर 30, पोंभूर्णा 2, सिंदेवाही 5,भद्रावती 7, कोरपना, ब्रह्मपुरी व चिमूर येथील प्रत्येकी 3 असे एकूण 216 बाधितांचा समावेश आहे.

वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2 हजार 763 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 56 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 266 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 1 हजार 472 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 718 बाधित, 61 वर्षावरील 201 बाधित आहेत. तसेच 2 हजार 763 बाधितांपैकी 1 हजार 809 पुरुष तर 924 बाधित महिला आहे.

राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:

2 हजार 763 बाधितांपैकी जिल्ह्यातील 2 हजार 650 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 48 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 65 आहे.

00000