Search This Blog

Friday, 2 June 2023

जिल्ह्यात कलम 37 नुसार जमावबंदी आदेश लागू


जिल्ह्यात कलम 37 नुसार जमावबंदी आदेश लागू

चंद्रपूर, दि. 02: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी  दि. 1 ते 15 जुन 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3)नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे.

या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाहीत. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी  विनय गौडा जी. सी. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

00000

 

Thursday, 1 June 2023

राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत 91 गुन्ह्यांची नोंद

 राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत 91 गुन्ह्यांची नोंद

चंद्रपूर दि. 1 , जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व हातभट्टीदारु निर्मीती, विक्री, वाहतुक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत माहे मे महिन्यात विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. यात भद्रावती, वरोरा, चिमुर, चंद्रपुर, सिंदेवाही, राजुरा, मुल, बल्लारपुर, ब्रम्हपुरी, नागभीड या तालुक्यात धाडी टाकुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत एकुण 91 गुन्हे नोंदविण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये एकुण 68 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवुन संपुर्ण कार्यवाहीमध्ये चार

वाहनांसह एकुण रुपये पाच लाख 70 हजार 60 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वरोरा भागात दोन देशी दारु किरकोळ विक्री दुकानांवर नियमभंग प्रकरणे नोंदविण्यात आले आणि मुंबई दारुबंदी कायद्याचे कलम ९३ अंतर्गत एकुण १३ इसमांवर प्रतीबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले. सदर कामगिरी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाद्वारे पार पाडली.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी  केली आनंद वाईन शॉपची अनुज्ञप्ती 15 दिवसांकरिता निलंबित :

अनुज्ञप्ती नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूरच्या सराई वार्ड, जटपुरा गेटजवळील आनंद वाईन शॉपची अनुज्ञप्ती 15 दिवसांकरिता निलंबित केली असल्याचे आदेश काल (दि.31 मे) निर्गमित केले.

जिल्ह्यात 2 व 3 जून रोजी उष्णतेच्या लाटेची शक्यता

 जिल्ह्यात 2 व 3 जून रोजी उष्णतेच्या लाटेची शक्यता

विशेष काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

चंद्रपूर दि. 1 जून : भारतीय हवामान खात्‍याने चंद्रपूर जिल्‍ह्यात दिनांक 2 व 3 जून, 2023 रोजी उष्‍णतेच्‍या लाटेची शक्‍यता वर्तविलेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी पुढीलप्रमाणे विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता (काय करावे ?)

पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.    घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा, सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्‍यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्‍यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा. अशक्‍तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्‍हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.  गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.         घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. अधिक उपाययोजनेसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या @SDMAMaharashtra या ट्विटर, फेसबुक व कु अॅपवरील सूचना पहाव्यात.

 

उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता(काय करु नये ?) :

उन्हात अतिकष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.           बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

            उन्हापासून बचावासाठी वरिल सुचनांचे पालन करावे.

0000

वटवृक्षारोपण महोत्सव 3 जून रोजी

 वटवृक्षारोपण महोत्सव 3 जून रोजी

चंद्रपूर दि.1, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व खाजगी संस्थांच्या मदतीने जिल्ह्यात 3 जून रोजी वटवृक्ष वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षरोपणाचा कार्यक्रम सकाळी 9 वाजता अटलबिहारी वाजपेयी क्रीडासंकुल, बायपास रोड जुनाना चौक येथे होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन तसेच अभिनेत्री स्नेहल राय उपस्थित राहणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो) पल्लवी घाटगे यांनी कळविले आहे.

000

5 जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 


5 जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 1 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे आयोजन  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

माहे, जून  महिन्याचा पहिला सोमवार, दिनांक 5 जून  रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे  आयोजन  करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका  लोकशाही  दिनातील  टोकन क्रमांकाची  प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी 2 प्रतीत सादर करावा.  तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल,  लोकशाही  दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.

00000