Search This Blog

Wednesday 15 December 2021

कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांचे शेतावरील प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण कार्यक्रम


कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांचे शेतावरील प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण कार्यक्रम

Ø नागभीड उपविभागांतर्गत 60 शेतकऱ्यांचा सहभाग

चंद्रपूर दि. 15 डिसेंबर: कृषी विभागाच्यावतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, नागभीड मार्फत, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीरामपूर जि. अहमदनगर यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे शेतकऱ्यांसाठी 5 दिवसीय प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. नागभिड उपविभागातील नागभीड,ब्रह्मपुरी तसेच सिंदेवाही तालुक्यातील प्रति तालुका 20 प्रगतशील शेतकरी याप्रमाणे एकूण 60 प्रगतशील शेतकऱ्यांनी प्रक्षेत्र भेट प्रशिक्षणाकरिता सहभाग नोदंविला.

त्याप्रमाणे दौऱ्याचे नियोजन उपविभागीय कृषी अधिकारी सोनाली गजबे यांच्या मार्गदर्शनात दि. 6  ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीत करण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, औरंगाबाद येथील प्रगतशील शेतकरी  गोरखनाथ गोरे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. सदर दौऱ्यादरम्यान कृषी पर्यवेक्षक श्री. जाधव, पथक प्रमुख व सहाय्यक पथक प्रमुख श्री. कोल्हापूरे, कृषी सहाय्यक श्री. बंगाळे व श्री. घुगे उपस्थित होते. या दौऱ्याच्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, येथे शेतकऱ्यांनी भेट दिली. यावेळी डॉ. नितीन पतके, डॉ. प्रकाश घाटोळे, डॉ. प्रितम चिरडे या कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, पिकावर फवारणीकरीता दशपर्णी अर्क तयार करणे, निंबोळी अर्क तयार करणे, जैविक औषधी तयार करणे, गांडूळ खत तयार करणे तसेच गांडूळ खताचे महत्त्व, रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करण्याविषयीची इत्यंभूत माहिती प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी गोरखनाथ गोरे यांच्या शेतातील गांडुळखत युनिट, डाळिंब लागवड, शेवगा लागवड तसेच त्यांच्या शेतातील सामूहिक शेततळ्यास भेट दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. गोरे यांनी शेतकऱ्यांना बाजारभाव पडण्याची कारणे, पीकपद्धती पॅटर्न, गटशेती, उत्पादित मालाचे मार्केटिंग विषयी महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. श्रीकृष्ण खळेकर व डॉ. संदीप पवार यांनी शेळीच्या विविध जाती प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवून त्यासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच हायड्रोफोनिक्‍स तंत्रज्ञानाचा वापर करून खत तयार करण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली. कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे शास्त्रज्ञ डॉ.संभाजी नलकर यांनी मुरघास तयार करणे, भात लागवड, फुलशेती, फळशेती, परसबाग आदी प्रकल्पाविषयी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. दि.10 डिसेंबर 2021 रोजी  शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा परत आला. या दौऱ्यादरम्यान विभागातील सहभागी प्रगतशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शेतात राबवून आर्थिक उन्नती साधू शकतील. असा विश्वास उपविभागीय कृषी अधिकारी सोनाली गजबे यांनी व्यक्त केला. दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक महेंद्र ठिकरे यांनी परीश्रम घेतले.

00000

No comments:

Post a Comment