Search This Blog

Tuesday 7 December 2021

ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा





ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा

Ø घुग्घुस येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन

चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : जिल्ह्यातील घुग्घुस हा परिसर अतिप्रदुषित समजला जातो. त्यामुळे येथे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 35 हजार लोकसंख्या असलेल्या शहराला सुसज्ज रुग्णालयाची गरज होती. ती आता पूर्ण होत असून येथे नवनिर्मित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी केल्या.

घुग्घुस येथे ग्रामीण रुग्णालयाच्या भुमिपूजनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, प्रकाश देवतळे, राजू रेड्डी आदी उपस्थित होते.

विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, महामानवाला अभिवादन करण्याचा दिवस आणि घुग्घुसवासियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णालयाचे भुमिपूजन करण्याचा दिवस एकत्र आला आहे. गत दोन वर्षांपासून आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहो. या विषाणुचे नवीन नवीन व्हेरियंट येत आहे. त्यामुळे संपूर्ण जगात एक भीतीदायक वातावरण आहे. या परिसरात वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आयुष्य कमी होत आहे. प्रदुषणामुळे येथील नागरीक रोज मरतो आहे, तरी जगतो आहे. अशा परिस्थितीत घुग्घुस वासियांसाठी येथे ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता होती. 2014 मध्ये या रुग्णालयाला मान्यता व 2018 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र तरीसुध्दा ग्रामीण रुग्णालयाचे काम खोळंबले होते. मात्र आता राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्णत्वास नेतांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला आनंद आहे.

35 ते 40 हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात नागरी सुविधांचा अभाव होता. त्यामुळे येथे नगर परिषद निर्माण करण्याकरीता आपण व्यक्तिश: लक्ष दिले आणि ही नगर परिषद करून घेतली. या शहराच्या विकासासाठी 4 कोटी 28 लक्ष रुपये राज्य शासनाने दिले आहे. येथे निर्माण होणा-या ग्रामीण रुग्णालय व निवास स्थानासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद आहे. विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. फक्त नागरिकांच्या सुविधेसाठी उभारण्यात येत असलेल्या वास्तु दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हाव्यात, याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी आमदार श्री. जोरगेवार म्हणाले, घुग्घुसच्या विकासाकडे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे विशेष लक्ष आहे. त्यांच्याच प्रयत्नातून येथे नगर परिषद निर्माण झाली. औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुसमध्ये रुग्णालयाची आवश्यकता होती. त्यासाठी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला. येथे 60 कोटी रुपये खर्च करून रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) करण्यात येणार आहे. नगर परिषदेमध्ये तीन कोटींची कामे मंजूर आहेत. भविष्यात घुग्घुस नगर परिषदेची इमारत बांधकाम, क्रीडा संकूल, सांस्कृतिक सभागृहासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सोनाली रासपायले यांनी तर आभार डॉ. कन्नाके यांनी मानले. 

ग्रामीण रुग्णालयात या सुविधा मिळणार : येथे उभारण्यात येणारे ग्रामीण रुग्णालय हे 30 खाटांचे असून त्यासाठी 10.55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या परिसराचे क्षेत्रफळ 8829 चौ. मीटर असून तळमजला व पहिला माळा मिळून 1818 चौ. मीटर बांधकाम करण्यात येईल. येथे प्राथमिक स्वरुपाच्या तपासण्या, एक्स रे रिपोर्ट, आंतररुग्ण-बाह्यरुग्ण,एमएलसी / न्यायवैद्यकीय, आवश्यकतेनुसार सोनोग्राफी, शवविच्छेदन गृह, हृदयरोग तपासणी, उच्च रुक्तदाब, मधुमेह, सिकलसेल, डोळे तपासणी, लहान मोठ्या शस्त्रक्रिया, संदर्भ सेवा, प्रसुतीपूर्व तपासणी, रक्तसंकलन आदी सुविधा येथे उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.

00000

No comments:

Post a Comment