Search This Blog

Friday 31 December 2021

जिल्हा अन्न तसेच निरोगी आहार समिती तथा जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक

 

जिल्हा अन्न तसेच निरोगी आहार समिती तथा जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक

चंद्रपूर दि. 31 डिसेंबर :  शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांचेमार्फत राज्य व जिल्हा स्तरावर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 ची प्रभावी अंमलजबजावणी, नियंत्रण व समस्यांचे निराकरण करण्याकरीता गठीत समित्यांची पुनर्रचना करुन सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. 

अन्न व औषध प्रशासनाने सन 2021-22 मध्ये एकूण 135 नमुने विश्लेषणासाठी घेतले. त्यापैकी 81 नमुने प्रमाणित तर 3 नमुने कमी दर्जाचे घोषित झाले आहे. तसेच 15 नमुने (प्रतिबंधित अन्न पदार्थ) असुरक्षित घोषित असून 36 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत एकूण 6 परवाना व नोंदणीचे कॅम्प घेवून 700 नवीन अन्न परवाना व नोंदणी अर्ज प्राप्त करुन घेतले. रिपर्पज युज्ड कुकिंग ऑइल मोहिमेअंतर्गत एकूण 50 आस्थापनांच्या तपासण्या करण्यात येवून कोणत्याही अन्न आस्थापनेत टोटल पोलार कम्पाऊंड 25 पेक्षा जास्त नसल्याचे श्री.मोहिते यांनी बैठकीत सांगितले.

प्रशासनामार्फत विविध अन्न आस्थापना यांना केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे मार्फत मानांकित ऑडीटर्सद्वारे एकूण 250 अन्न व्यवसायीकांना अन्न पदार्थ हाताळणीचे, स्वच्छतेचे तसेच कोवीड संक्रमण काळात घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या बैठकीमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रिपर्पज युज्ड कुकिंग ऑईलची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात यावी याकरिता नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्याकरीता जिल्हा नियोजन समितीअंतर्गत प्रस्ताव सादर करावा. शासकीय, निमशासकीय रेशन दुकान यांनी अन्न परवाना व नोंदणी प्राप्त करुण घेणे बंधनकारक असल्याने त्यांनी परवाना व नोंदणी करुन घ्यावी. याकरीता जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन यांनी कार्यवाही करावी, तसेच ईट राईट इंडिया मोहिमेअंतर्गत ज्या कंपन्यांमध्ये कॅन्टीन अथवा उपहारगृह आहे, अशा कंपन्यांनी केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण यांचेकडील हायजीन रेटींग तसेच कॅम्पस सर्टिफिकेशन घ्यावे. याकरीता जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक, अन्न व औषध प्रशासन यांनी सदर कंपन्यांना उद्युक्त करावे, असे निर्देश  अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले.

सदर बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक स्वप्नील राठोड, जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी,सुरेंद्र दांडेकर, सचिन वालकर, डॉ. सचिन भगत,सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) नितीन मोहिते, अन्न सुरक्षा अधिकारी, प्र. भा. टोपले, प्र.अ. उमप प्रामुख्याने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment