Search This Blog

Tuesday 28 December 2021

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार स्वाधार योजनेचा लाभ


ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार स्वाधार योजनेचा लाभ

चंद्रपूर दि. 28 डिसेंबर: अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे,यासाठी भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदि सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.

कोरोनामुळे सन 2020-21 मध्ये सर्व महाविद्यालये बंद होती. शिक्षण ऑनलाईन सुरु होते, अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ द्यायचा किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याने विद्यार्थ्यांकडून सदर योजनेचे अर्जच भरुन घेण्यात आले नव्हते. कारण या योजनेसाठी 75 टक्के उपस्थिती ग्राह्य धरली जाते. नुकतीच ही अडचण शासनामार्फत दूर करण्यात आली असून ऑनलाईन शिक्षण असले तरी विद्यार्थ्यांची ऑनलाईन 75 टक्के उपस्थिती ग्राह्य धरुन सन 2020-21 या वर्षातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे सन 2021-22 या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2020-21 व सन 2021-22 या शैक्षणिक सत्राकरीता विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांचेकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन नागपूर,समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment