Search This Blog

Thursday 23 December 2021

महाज्योती संस्थेमार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण योजना

 


महाज्योती संस्थेमार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण योजना

चंद्रपूर दि.23 डिसेंबर: राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांची संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) पुरस्कृत परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण इतर समाज घटकांच्या तुलनेत कमी आहे. या प्रवर्गातील विद्यार्थी हे दुर्गम भागात राहत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. अशा परिस्थितीतसुद्धा ते विद्यार्थी शिक्षण घेऊन शिक्षित होतात. परंतु, योग्य प्रशिक्षणाअभावी भारतीय प्रशासकीय सेवा तसेच राज्यसेवा परीक्षांमध्ये ते पात्र ठरू शकत नाही. त्यामुळे आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरिता भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी पूर्व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

6 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयान्वये भटक्या जमाती -क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या युवक व युवतींना परीक्षेत यश संपादन करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करणे, आवश्यक अभ्यास साहित्य व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देणे, मूलभूत निवासी प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.

इच्‍छूक व पात्र उमेदवारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahajyoti.org.in या संकेत स्थळावर अर्ज करावा. काही अडचण भासल्यास  8956775376, 8956775677, 8956775678 व 8956775680 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा  महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment