संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी विशेष परिषदेचे ताडोबातर्फे आयोजन
चंद्रपूर, दि. 08 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे ‘संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर स्थानिक पातळीवरील तृणभक्षी आणि मांसभक्षी वन्यप्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना’ या विषयावर एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर वन अकादमी येथे आज या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या चर्चेत आजी-माजी तसेच वरिष्ठ वन अधिकारी, वन्यजीव अभ्यासक, शास्त्रज्ञ, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर, व्ही. क्लेमेंट बेन, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पूर्व), डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक, डब्ल्यूआरटीसी, गोरेवाडा, शोभा फडणवीस, आमदार देवराव भोंगळे, तसेच डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी परिषदेच्या विषयाशी संबंधित संशोधनात्मक पोस्टर्सचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले.
परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘संरक्षित क्षेत्रांबाहेरील वन्यजीव मुबलकता आणि पर्यावरणीय संदर्भ’ या विषयावरील चर्चेत पर्यावरणीय व सामाजिक मुद्दयांचा परामर्ष घेण्यात आला. यावेळी बिबट्या, माकड, निलगाय, आणि रानडुक्कर यांसारख्या प्रजातींशी संबंधित विशिष्ट आव्हानांचे विवेचन करताना, त्यांचे शेती आणि मानवी वस्तीवर होणारे परिणाम स्पष्ट केले गेले. या सत्रातील चर्चेत जयकुमार, उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, डॉ. बिलाल हबीब, डब्ल्यूआयआय, डेहराडून, डॉ. सिंदुरा गणपथी, फेलो, प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांचे कार्यालय, भारत सरकार, अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर, एम. रामानुजन, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर, रजनीश सिंग, उपसंचालक, पेंच, मध्य प्रदेश, कार्तिकेय सिंग, वन्यजीव आणि वन सेवा संस्था व डॉ. जितेंद्र एस. रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे सहभागी झाले.
परिषदेच्या दुस-या सत्रात ‘वन्यजीव लोकसंख्येच्या व्यवस्थापनासाठी धोरण आणि कायदेशीर बाबी’ या विषयावरील चर्चेत संरक्षित क्षेत्रांबाहेरील वन्यजीव लोकसंख्या व्यवस्थापनासाठी अस्तित्वातील कायदे आणि धोरणात्मक चौकट तसेच नवीन कायदेशीर व समाजमान्य पद्धतींची गरज यावर विचारविनिमय करण्यात आला. या सत्रात सुनील लिमये, माजी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव), विवेक खांडेकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), एच. एस. पाब्ला, माजी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव), मध्य प्रदेश, डॉ. सेन्थिल कुमार, विभागीय कार्यालय, पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, नागपूर, डॉ. वैभव माथूर, उपमहानिरीक्षक, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरण, श्री. दिपांकर घोष, वरिष्ठ संचालक, डब्ल्यूडब्ल्यूएफ-भारत यांनी सहभाग घेतला.
तिस-या सत्रात ‘वनक्षेत्रातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांचे मानकीकरण’ या विषयावर चर्चा झाली. यावेळी प्रभावी वन्यजीव आरोग्य सेवा, रोग व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी व्याघ्र अभयारण्यांमधील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांचे मानकीकरण करण्यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पूर्व), डॉ. बहार बाविस्कर, वाईल्ड सीईआर, डॉ. शिरिष उपाध्ये, संचालक, डब्ल्यूआरटीसी, गोरेवाडा, नागपूर, श्रीमती नेहा पंचमिया, आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. अखिलेश मिश्रा, ज्येष्ठ वन्यजीव पशुवैद्यक, मध्य प्रदेश, वनविभाग, डॉ. शशिकांत जाधव, डब्ल्यूव्हीएस, डॉ. शैलेश पेठे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग यांनी आपले विचार व्यक्त केले.
00000000
No comments:
Post a Comment