Search This Blog

Monday, 6 January 2025

एचआयव्ही सह जगणा-या व अतिजोखीम गटातील समुहाला शासकीय योजनांचा लाभ द्या - सीईओ विवेक जॉन्सन

 


एचआयव्ही सह जगणा-या व अतिजोखीम गटातील समुहाला शासकीय योजनांचा लाभ द्या - सीईओ विवेक जॉन्सन

Ø राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा सर्वकष आढावा

चंद्रपूर दि. 06 : जिल्ह्यात एचआयव्हीसह जगणारे तसेच अतिजोखीम गटातील समुदायाला सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अशासकीय संस्थांची मदत घेऊन त्यादिशेने कार्य करावे. तसेच एड्सग्रस्त नागरिकांसाठी शासनाची मोफत बस पास योजना आहे. त्याचा लाभ प्रत्येक एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तीला मिळण्यासाठी परिवहन महामंडळाला सुचना करण्यात येणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचा त्रैमासिक आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे,  अधिष्ठाता डॉ . मिलिंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुलेश चांदेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले,  एस.एम. मेगदेलवार, महानगर पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, एआरटी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, डॉ. श्रीकांत जोशी, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर, नसीमा शेख अनवर, देवेंद्र लांजे उपस्थित होते.

जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांसाठी विविध आरोग्य योजना सुरू आहेत. या योजना रुग्णांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना विवेक जॉन्सन यांनी दिल्या. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सादर करतांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी सुविधा मोफत पुरविण्यात येत असल्याची माहिती दिली. गतवर्षी 2023-24 मध्ये जिल्हयात सामान्य 1 लक्ष 915 एचआयव्ही चाचण्या झाल्या. त्यामध्ये 297 सामान्य संक्रमित आढळले व त्यांना उपचारावर घेण्यात आले. तसेच 46 हजार 996 गरोदर मातांची एचआयव्ही चाचणी झाली. त्यात 32 माता संक्रमित आढळल्या. एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत 71 हजार 376 सामान्य एचआयव्ही तपासण्या करण्यात आल्या. त्यात सामान्य संक्रमित 212 आढळले. तसेच 25 हजार 467 गरोदर माता यांची एचआयव्ही तपासणी केली त्यात 33 माता संक्रमित आढळल्या.   

अतिजोखीम गटात असणाऱ्या टीजी, एमएसएम, एफएसडब्ल्यु यांना राशनकार्ड, आधारकार्ड, तसेच संजय गांधी निराधार योजनेचा पाठपुरावा व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा समुदाय संसाधन समूह (D-CRG) स्थापन करण्यात आले आहे. शासकीय योजनासंदर्भात येणाऱ्या कागदपत्राच्या अडचणी बाबत यावेळी चर्चा करून त्यावर उपाय काढण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्या.

बैठकीला संबोधन ट्रस्टचे राज काचोळे, संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था, लिंक वर्कर प्रकल्पाचे रोशन आकुलवार, मायग्रट प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक देवेंद्र पिंपळकर, ट्रकर्स प्रकल्प नोबल शिक्षण संस्थेचे समुपदेशक मयूर जवादे, मायग्रंट प्रकल्प नोबल शिक्षण संस्थेचे समुपदेशक प्रवीण नायर, विहान प्रकल्पाच्या संगिता देवाळकर, वन स्टॉप सेंटरचे समन्वयक विद्या धोबे आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment