शेतकऱ्यांनो ! ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करा - जिल्हाधिकारी विनय गौडा
Ø 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत भेंडवी येथे पाहणी व संवाद
चंद्रपूर, दि. 30 : राज्य शासनाने निर्देशीत केलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेंडवी (ता. राजुरा) येथे भेट देऊन ऑक्सिजन पार्क, ग्राम ग्रंथालय व अंगणवाडीची पाहणी केली. तसेच शेतक-यांचा एकत्रित डाटाबेस तयार करण्यासाठी राबविण्यात येणा-या ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी सेाडविण्यासाठी शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेंडवी (ता. राजुरा) येथे भेट दिली.
ॲग्रीस्टॅकचे महत्व सांगताना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शेतक-यांचा व त्यांच्या शेतांचा, आधार संलग्न एकत्रित डाटाबेस तयार करणे, तसेच ॲग्रीसॅट योजनेंतर्गत शेतक-यांचा 7/12, नाव व इतर तपशीलाची जोडणी आधार क्रमांकासोबत करायची आहे. यात हंगामी पिकांच्या माहिती संचानुसार शेतकरी आपल्या शेतीमध्ये असलेल्या शेतपिकाची नोंद ॲग्रीसॅट ॲप मध्ये करू शकतील. त्यामुळे शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सीएससी सेंटर, महाऑनलाईन (सेतू) केंद्र या माध्यमातून मोफत नोंदणी करावी किंवा https://mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्वरीत नोंदणी करावी. ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहायक यांच्या मार्फत प्रत्येक गावातील शेतक-यांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये शेतक-यांचे 7/12 व इतर तपशील यांची आधार सोबत जोडणी करून फार्मर आयडी तयार करण्यात येईल. तसेच गावनिहाय शेतकरी मेळाव्यांचे वेळापत्रक लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी भेंडवी येथे ऑक्सिजन पार्क, ग्राम ग्रंथालय व अंगणवाडी ची पाहणी केली. तसेच बचत गटातील महिलांशी संवाद साधला. शालेय पोषण आहारबाबत आढावा घेऊन सर्व संबंधितांना आवश्यक सूचना केल्या व बालकांना वेळेवर पोषण आहार विशेषतः दूध व अंडी देण्याबाबत सूचित केले.
पाहणी दौरा दरम्यान राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, गट शिक्षणाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी इत्यादी उपस्थित होते.
ॲग्रीस्टॅक योजनेचे उद्दिष्ट : 1. शेतक-यांच्या शेतांचा, आधार संलग्न माहिती संच, शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच तसेच शेताचा भुसंदर्भीकृत यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अपडेट करणे. 2. शेतक-यांच्या कल्याणसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ शेतक-यांना सुलभ, पारदर्शक पध्दतीने तसेच वेळेवर उपलब्ध करून देणे. 3. शेतक-यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. 4. शेतक-यांना बाजार पेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे. 5. विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी व शेतक-यांची ओळख पटविण्याची पारदर्शक व सोपी पध्दत विकसीत करणे तसेच प्रमाणीकरणाची सुलभ पध्दत विकसीत करणे. 6. शेतक-यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे आणि 7. उच्च गुणवत्तेचा डेटा व ॲग्री टेकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढविणे.
योजनेचे फायदे : 1. पीएम किसान योजनेंतर्गत आवश्यक अटी पूर्ण करून अनुदान प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल. 2. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ठ करून घेण्यास सहाय्य मिळेल. 3. किसान क्रेडीट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता राहील. 4. पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतक-यांचे नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचे सर्व्हेक्षण करण्यास सुलभता येईल. 5. किमान आधारभुत किमतीवर खरेदी मध्ये शेतक-यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल. शेतक-यांसाठी कृषीकर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणा-या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध होईल.
००००००
No comments:
Post a Comment