कर्मवीर दादासाहेबांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचवा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ø कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा
चंद्रपूर, दि. 09 : तुलनेने अतिशय मागास असलेल्या कष्टकरी समाजात दादासाहेब कन्नमवार यांनी जन्म घेतला, मात्र स्वत:च्या मेहनतीवर त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. दादासाहेब हे ध्येयवादी नेते होते. राज्याचा आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन ते संपूर्ण जीवन जगले. अशा नेत्यांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे मनोगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे बेलार समाज संघटना व रौप्य महोत्सव समितीच्या वतीने आयेाजित कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, सुधाकर अडबाले, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, आयोजन समितीचे राहुल कन्नमवार, सुर्यकांत खनके आदी उपस्थित होते.
लोकनेते दादासाहेब कन्नमवारांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज येथे उपस्थित राहता आले, याचा अतिशय आनंद आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दादासाहेब यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. भारत – चीन युध्दाच्या वेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना देशाच्या संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा.सा. कन्नमवार यांनी राज्याची सुत्रे सांभाळली. या पदावर ते 1 वर्ष 4 महिने होते. युध्दाचा तो काळ होता. अशा परिस्थितीत आर्थिक सहाय्य करण्यासाठी दादासाहेबांनी जनतेला आवाहन केले. त्याकाळात चंद्रपूर जिल्ह्याने तसेच महाराष्ट्राने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशासाठी सोने-नाणे, आर्थिक मदत दान केली.
शिक्षण आणि आरोग्य हे अतिशय महत्वाचे विषय आहेत. प्रत्येक गावात आरोग्य केंद्र असावे, असा सर्वप्रथम विचार कर्मवीर दादासाहेबांनी मांडला. तसेच शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी अनेकांना प्रेरीत केले. या राज्याच्या प्रगतीसाठी अतिशय मोठे योगदान दादासाहेबांनी दिले आहे. विधानसभेच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात येईल.
पुढे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सामान्य माणसांचा विकास करणे, हेच आपल्या सरकारचे सुध्दा ध्येय आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे. त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भात सर्व अडचणी सोडविण्यात येईल. तसेच ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्यासुध्दा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मा.सा. कन्नमवार यांच्याकडे विकासाची दृष्टी : सर्वसाधारण कुटुंबात जन्म घेतलेल्या मा.सा. कन्नमवार यांनी आपल्या कर्तृत्वाने शिखर गाठले. कर्मवीर दादासाहेबांना विकासाची दृष्टी होती. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन मुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्याने दिले आहे. अनेक बाबतीत दादासाहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात साम्य असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुध्दा दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच समृध्दी महामार्गाचा विस्तार चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
तसेच चंद्रपूर येथे होत असलेल्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कॅन्सर रुग्णालयाकरीता 100 कोटींची आवश्यकता असून राज्य शासनाने सदर निधी द्यावा. जिल्ह्यातील धानोरा बॅरेज पूर्ण करावा. कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांची जयंती शासकीय स्तरावर जाहीर करावी. तसेच चंद्रपूरात 400 एकरवर 287 कोटी रुपये खर्च करून होत असलेला टायगर सफारी प्रकल्प मार्गी लावावा, अशा मागण्यासुध्दा आमदार श्री. जोरगेवार यांनी केल्या.
अध्यक्षीय भाषणात आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, विहिरी आणि घरे बांधणा-या कष्टकरी समाजातून आलेले दादासाहेब हे राज्याच्या सर्वोच्च पदी पोहचले. चंद्रपूर आणि गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यात त्यांनी अनेक विकासकामांची पायाभरणी केली. चंद्रपूर येथे होत असलेल्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे नाव द्यावे तसेच अल्प असलेल्या या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे, अशी मागणी त्यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मा.सा. कन्नमवार गौरव स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे समाजातील डॉ. गजानन कोटेवार, प्रभा चिलखे, रुपेश कोकावार, देवराव कासटवार, गजानन चंदावार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी घेतले माता महाकालीचे दर्शन : चंद्रपूर दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेतले व मंदिरात महाआरती केली. मंदिर विकासासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, ठरविल्याप्रमाणे निश्चितपणे मंदिर परिसराच्या विकासाचे चांगले काम याठिकाणी होईल. तसेच पाठपुरावा करून मंदिर परिसर विकासाचा कार्यक्रम करण्यात येईल.
०००००००
No comments:
Post a Comment