आश्रम शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी अनुभवला विज्ञान प्रदर्शनीचा अनुभव
प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन
चंद्रपूर, दि. 12 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा बोर्डा येथे 10 जानेवारी रोजी प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये सामाजिक, पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन विषय निर्धारित करण्यात आले होते. यामध्ये कचरा व्यवस्थापन, शेतीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणाचे संतुलन आणि व्यवस्थापन, अन्न आरोग्य व स्वच्छता, संगणकीय वापर, वाहतूक व दळणवळण, गणितीय विचार आणि विज्ञान व तंत्रज्ञान आदी विषयांचा समावेश होता.
या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी डि.के. टिंगूसले, आर. धोटकर, आर. बोंगीरवार, सहाय्यक लेखाधिकारी शेखर पाटील, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदींची उपस्थिती होती.
दिलेल्या निर्धारित विषयावर आधारित उच्च प्राथमिक स्तर (6 वी ते 8 वी पर्यंत), माध्यमिक स्तर (9वी ते 10वीपर्यंत), उच्च माध्यमिक स्तर (11 वी ते 12 वी पर्यंत) शालेय विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनीय वस्तू, प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प तयार करणे याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि खेळण्यांमधील नवसंकल्पनांचा समावेश असलेली प्रदर्शनीय वस्तू विकसित करण्याचे स्वातंत्र्य होते. शिक्षकांचे शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार उच्च प्राथमिक गटातून 27, माध्यमिक गटातून 26 आणि उच्च माध्यमिक गटातून 12 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. तसेच शिक्षकांच्या खुल्या गटामधून एकूण 37 शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीमध्ये सहभाग घेतला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, प्रकल्पात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग हा कौतुकास्पद होता. सर्व विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे व उपयोगी वैज्ञानिक प्रकल्प तयार करून प्रदर्शनीमध्ये सहभाग घेतला. शिक्षकांनी सुद्धा शैक्षणिक साहित्य तयार करून आणल्याचे दिसून आले. आदिवासी विद्यार्थी कोणत्याही बाबतीत मागे राहता कामा नये. जगाच्या स्पर्धेत इतर विद्यार्थ्यांसोबत टिकण्याकरिता त्यांना सुद्धा विशेष मार्गदर्शनाची गरज आहे. आताचे युग हे विज्ञानाचे युग असून ही गरज लक्षात घेता अशाप्रकारच्या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा उपयोग भावी जीवनात विद्यार्थ्यांना परिपूर्ण होण्यास निश्चितच फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची संशोधक वृत्ती जागृत व्हावी आणि त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, हा मुख्य हेतू समोर ठेवून या प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही प्रकल्प अधिकारी राचेलवार म्हणाले.
मान्यवरांच्या हस्ते विजेते विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार : उच्च प्राथमिक गटातील प्रथम क्रमांक प्राप्त आश्रमशाळा सरडपार येथील विद्यार्थ्यांनी डिम्पल सोयाम, द्वितीय क्रमांक प्राप्त शासकीय आश्रमशाळा पाटण येथील विद्यार्थी रुद्राक्ष काठमोडे, माध्यमिक गटातील प्रथम क्रमांक प्राप्त शासकीय आश्रम शाळा बोर्डा येथील विद्यार्थिनी राणी पेंदोर, द्वितीय क्रमांक प्राप्त शासकीय आश्रमशाळा मरेगाव येथील विद्यार्थिनी ऋतुजा चौधरी, उच्च माध्यमिक गटातील प्रथम क्रमांक प्राप्त शासकीय आश्रम शाळा जिवती येथील विद्यार्थिनी दीक्षा कोराम, द्वितीय क्रमांक प्राप्त आश्रम शाळा सरडपार येथील विद्यार्थी तेजस मेश्राम, शिक्षक गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त शासकीय आश्रम शाळा बोर्डा येथील शिक्षक श्री. अलोणे, द्वितीय क्रमांक प्राप्त आश्रम शाळा गडचांदूर येथील शिक्षक श्री. खान यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
00000000
No comments:
Post a Comment