ओ.बी.सी. प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील युवक-युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना
चंद्रपूर, दि. 22 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि लिंगायत समाजासाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 9 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार झाली आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कार्यान्वित करण्यात आले आहे.
1 लक्ष रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना : इतर मागास प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील व्यक्तींना स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरु करण्याकरीता 1 लक्ष रुपयांची निरंक व्याजदर असलेली थेट कर्ज योजना सुरु केली आहे. सदर योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. कर्ज परतफेडीचा कालावधी हा 4 वर्षापर्यंतचा असून नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल 2085 रुपये परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु, थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे 4 टक्के व्याज आकारण्यात येईल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष रुपयांपर्यंत असावे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : महाराष्ट्र राज्यातील गुरव आणि लिंगायत समाजातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र आदि व्यवसायाकरिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे.
योजनेचे स्वरुप : बँकेमार्फत लाभार्थीना रु. 10 लाखापर्यंत कर्ज वितरीत केले जाईल. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रामाणिकरण नुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. तसेच कुटुंबातील वार्षिक मर्यादा रु. 8 लक्षपर्यंत आहे. ही योजना संपूर्णपणे संगणीकृत असून महामंडळाचे वेबपोर्टल www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.
5 लक्षपर्यंतची 20 टक्के बीज भांडवल योजना : बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कमाल मर्यादा रु. 5 लाखापर्यंतच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तसेच पारंपारिक लघु व सेवा उद्योगासाठी महामंडळामार्फत कर्ज देण्यात येते. नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजूर कर्ज रकमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर 6 टक्के व्याज दर असून बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर लागू राहील. सदर कर्जाची परतफेड 5 वर्षापर्यंत करता येईल. सदर योजनेत अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे व कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1 लक्ष पर्यंत असावे.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना : इतर मागास प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील व विद्यार्थ्यांकरीता उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे.
योजनेचे स्वरूप : राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 10 लक्षपर्यंत, परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 20 लक्ष पर्यंत राहील.
लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती : अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी 'भागाकरीता रु. 8 लक्ष पर्यंत असावी. अर्जदार इयत्ता 12 वीत 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर 0-1 (म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा अधिक असावा.
सदर योजना पुर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobefdc.org या संकेतस्थळावर जावून भरावे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे तसेच संपर्क क्र. 07172-262420 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment