चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनी व सरस महोत्सव
चंद्रपूर, दि. 31 : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने 1 फेब्रुवारीपासून जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी व सरस महोत्सव चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आला आहे.
तीन दिवसीय या पुशपक्षी प्रदर्शनीमध्ये जातीवंत गाय वर्गातील देवणी, डांगी, खिल्लार, लाल कंधारी, गवळावू, कठाणी तसेच भारतीय गोवंशाच्या गीर, थारपारकर या देशी गायी / वळू तसेच विदेशी जातीच्या संकरीत एच.एफ. व संकरीत जर्सीचे गायी / वळू, त्याचप्रमाणे म्हैस वर्गात नागपूरी, जाफ्राबादी, पंढरपुरी, मु-हा जातीच्या म्हशी / रेडा, शेळी गटात तोतापारी, उस्मानाबादी, बेरारी, बिटल, काठिकयावाडी / कच्छी, बारबेरी, आफ्रिकन बोएर जातीच्या शेळ्या / बोकड, मेंढी गटात दख्खनी मेंढी, कुक्कुट व कुक्कुटादी पक्षीगटात कडकनाथ, कावेरी, सातपुडा, असील, सोनारी, गावरान जातीचे कुक्कुट पक्षी व खाकी कॅम्पबेल बदक सहभागी होणार आहेत.
सदर पशुप्रदर्शनात शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती, संशोधित पशुसंवर्धन तंत्रज्ञान, बाजारपेठ व्यवस्थापन तसेच विविध पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांनी पशुप्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment