खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा
Ø जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 17 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्व. खाशाबा जाधव राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. यावेळी खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात खेळाडूंची भव्य रॅली काढण्यात आली. तालुका क्रीडा अधिकारी जयश्री देवकर व बार्टीच्या संचालिका अलका मोटघरे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी रॅलीतील उपस्थित खेळाडूंना संबोधित केले.
यावेळी व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, ॲथलेटिक्स, स्केटिंग, कुस्ती, रस्सीखेच, बॅडमिंटन, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो आणि जलतरण यासारख्या विविध खेळांमध्ये खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, क्रीडा मंडळामध्ये विविध उपक्रमाद्वारे राज्य क्रीडा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून विविध क्रीडा स्थळांना भेटी देण्यात आल्या. यावेळी उत्कृष्ट खेळाडूंशी ऑनलाईन संवाद देखील साधण्यात आला.
त्यासोबतच, खाशाबा जाधव यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा विशेष कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र व व्याख्यानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आहारतज्ञ श्रीमती लीना यांनी संतुलित आहाराबद्दल मार्गदर्शन केले. क्रीडा संस्कृती लोकांमध्ये रुजविण्यासाठी तसेच जिल्ह्यामध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी क्रीडा विभागाकडून प्रयत्न केले जात आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी खेळाडूंना सांगितले. तसेच तालुका क्रीडा अधिकारी जयश्री देवकर यांनी खेलेंगे तो खिलेंगे हा मंत्र दिला.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक प्राप्त, व्हॉलीबॉल खेळाडू, तसेच महाराष्ट्राचे प्रतिनिधी मॅनेजर म्हणून लखनऊ येथे राष्ट्रीय वयोगट 17 करिता गेलेले रामू नागापूरे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी केले. संचालन क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड तर आभार क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके यांनी मानले.
००००००
No comments:
Post a Comment