Search This Blog

Thursday, 30 January 2025

दिव्यांगाना फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


 

दिव्यांगाना फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Ø  6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 30 : दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने  हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याच्या योजनेला 10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ स्तरावरुन सुरु आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणेदिव्यांग व्यक्तीचे आर्थिकसामाजिक पुनर्वसन करणे तसेच सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

योजनेच्या अटी व शर्ती : अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40 टक्के असावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक/सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे युडीआयडी (UDID) प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. अर्जदार हा 18 ते 55 वयोगटातील असावा. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखापेक्षा अधिक नसावे. लाभार्थी निवड करतांना जास्त दिव्यांगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहिल. अतितीव्र दिंव्यागत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिंव्याग व्यक्तीच्या बाबतीत सोबतच्या Escort सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.

अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहिल. अर्जदार हा शासकीयनिमशासकीयमंडळेमहामंडळे याचा कर्मचारी नसावा. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा. राज्यातील इतर कोणत्याही योजनेंतर्गत मोफत ई-व्हेईकल प्राप्त झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांस सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात येईल.

सदर योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी पोर्टल दि. 22 जानेवारी 2025 रोजी सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्जासाठी https://register.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 6 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. या योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment