मोफत विधी सेवा व सहाय्याबाबत मिळणार माहिती
Ø विधी सेवा व सहाय्याबाबत माहिती देणाऱ्या फलकाचे अनावरण
Ø जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा स्तुत्य उपक्रम
चंद्रपूर, दि. 31 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत मोफत विधी सेवा व सहाय्याबाबत माहिती देणाऱ्या फलकाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच सर्व नागरिकांना माहिती सहज उपलब्ध व्हावी, या हेतूने तयार करण्यात आलेल्या माहिती पत्रिकेचे देखील अनावरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.जी. भोसले, जिल्हा न्यायाधीश ईशरत शेख, दिवाणी न्यायाधीश प्रवीण शिंदे, मुख्य न्यायदंडाधिकारी शेखर गोडसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, जिल्हा सरकारी वकील पी.जी. घट्टुवार तसेच चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष, सर्व न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
भारताच्या संविधानातील अनुच्छेद 39 प्रमाणे समाजातील गरीब व दुर्बल घटकांना मोफत विधी सहाय्य पुरवण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर आणि सर्व तालुका विधी सेवा समितीमार्फत मोफत विधी सेवा सहाय्य दिले जाते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म म्हणाल्या, मोफत विधी सेवेबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माहिती व जनजागृती व्हावी या उद्देशाने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायत कार्यालयात सदर सेवेविषयीची माहिती बॅनर्स आणि पोम्प्लेट स्वरूपात पुरविली जाणार आहे. त्याचे अनावरण देखील जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आले आहे.
2025 या वर्षात आयोजित केल्या जाणाऱ्या लोक अदालतीच्या तारखांबाबतची माहिती, भांडण, तडजोड याबाबत मध्यस्थांची भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकास टोल-फ्री क्रमांक 15100 द्वारे मोफत विधी सल्ला मिळू शकतो, याबाबतची माहिती दिली जाणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी म्हणाले.
०००००००
No comments:
Post a Comment