वर्षभरात जिल्ह्यात 271 कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
Ø जिल्हा विधी सेवा प्राधिकरणची उल्लेखनीय कामगिरी
Ø 635 व्यक्तींना मोफत विधी सहाय्य
चंद्रपूर, दि 04 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार किमान समान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समितीमार्फत जिल्ह्यात गतवर्षी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत एकूण 271 कायदेविषयक जनजागृती चे कार्यक्रम घेण्यात आले. यापैकी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर कार्यालयामार्फत 161 कार्यक्रमांचा समावेश होता. तसेच जिल्ह्यातील एकूण 635 व्यक्तींना मोफत विधी सहाय्य देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूरच्या अध्यक्षा एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर कार्यालय व सर्व तालुका विधी सेवा समिती कार्यरत आहेत. या कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
लोक अभिरक्षक कार्यालय : दिनांक 13 मार्च 2023 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालयाची स्थापना करण्यात आली. या कार्यालयामार्फत फौजदारी प्रकरणातील न्यायालयीन बंदींना मोफत विधी सहाय्य देण्यात येते. यानुसार आतापर्यंत एकूण 187 अर्ज प्राप्त झाले असून त्यांना मोफत विधी सेवा सल्ला व मोफत वकील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मनोधैर्य योजना : लैंगिक अत्याचारग्रस्त पात्र पिडीतांना मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. सन 2024 या एक वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 111 अर्ज प्राप्त झाले. यात पिडीतांना अंतरिम रक्कम 29 लक्ष रुपये अदा करण्यात आली आहे. तर अंतिम रक्कम मुदत ठेव स्वरूपात 1 कोटी 90 लक्ष 2 हजार 500 रुपये अदा करण्यात आले. या योजनेंतर्गत सन 2024 मध्ये एकूण प्रलंबित 486 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
राष्ट्रीय लोक अदालत : गतवर्षी जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका न्यायालयात चार राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आल्या. यात एकूण 2554 दाखलपूर्व प्रकरणे तर 3285 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. मोटर वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे एकूण 74 निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई 6 कोटी 86 लक्ष 31 हजार 880 अदा करण्यात आले आहे. धनादेश अनादरीत झाल्याची एकूण 413 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
मध्यस्थी केंद्रातील प्रकरणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर व तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे मध्यस्थीसाठी पाठवले जातात. सन 2024 मध्ये एकूण 1953 प्रकरणे पाठविण्यात आली व त्यापैकी 414 प्रकरणी यशस्वीपणे मध्यस्थीने निकाली काढण्यात आली.
नालसा टोल फ्री प्रकरणे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या नालसा टोल फ्री नंबर 15100 द्वारे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत एकूण 91 व्यक्तींना कायदेशीर मार्गदर्शन व विधी सेवा सल्ला देण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना निराधार योजनेचा लाभ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत देवाडा येथील देबू सावली वृद्धाश्रमात एकूण 16 वृद्धांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ चंद्रपूर तहसील कार्यालयाच्या समन्वयाने मिळवून देण्यात आला.
विशेष लोक अदालत : दिनांक 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे विशेष लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तीन प्रकरणे यशस्वीपणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. तसेच मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2024 या कालावधी विशेष लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. यात चंद्रपूर जिल्ह्यातील पाच प्रकरणे यशस्वी तडजोडीने निकाली काढण्यात आल्याचे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment