Search This Blog

Tuesday, 19 May 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना; स्वयंपूर्ण रोजगाराला चालना

 

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना; स्वयंपूर्ण रोजगाराला चालना

चंद्रपूर, दि. 19 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींचा सर्वांगीण विकास तसेच त्यांना स्वयंपूर्ण रोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याकरीता बीज भांडवल योजना' राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेद्वारे तृतीयपंथीयांना विविध लघुउद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यावरही भर दिला जाणार आहे.

या योजनेत 25 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असून निधी संरचनेत 45 टक्के शासन अनुदान, 50 टक्के बँक कर्ज आणि 5 टक्के लाभार्थी हिस्सा यांचा समावेश आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजात 3 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या जामिनदाराची किंवा तारणाची आवश्यकता नसल्यामुळे अधिकाधिक लाभार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो.

पात्रता : योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. तो/तो महाराष्ट्र राज्याचा किमान 10 वर्षाचा रहिवासी असावा. तसेच समाज कल्याण विभागाने दिलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra gov. in संकेतस्तळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

येथे करा संपर्क : इच्छुक लाभार्थ्यांनी  आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपुर येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment