Search This Blog

Tuesday, 19 May 2026

जिल्हाधिका-यांनी घेतला नवतेजस्विनी प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा


 

जिल्हाधिका-यांनी घेतला नवतेजस्विनी प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा

चंद्रपूर, दि. 19 : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), द्वारे महिला बचतगटाकरिता जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नवतेजस्विनी -महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि 19) आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काढोळे, सहायक आयुक्त (समाजकल्याण) विनोद मोहतुरे, अनिसा तडवी (कौशल्य विकास), महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, नाबार्डचे महाव्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम जिल्हाधिकारी पंत यांनी आर्थिक वर्ष 2025-26 मधील माविमद्वारे जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा व सध्यास्थिती जाणून घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. बचत गटातील महिलांद्वारे सुरू कार्पेट निर्मिती प्रकल्प, बांबू वस्तू निर्मिती प्रकल्प व अगरबत्ती प्रकल्प यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता विक्री केंद्राची व्यवस्था उमेद व माविम यांच्या संयुक्त विद्यमातून करण्यात यावी. तसेच उमेदच्या धर्तीवर माविमच्या बचत गटांना फिरता निधी उपलब्ध व्हावा, याकरिता नियोजन विभागास सविस्तर प्रस्ताव सादर करावा. सदर बैठकीचे त्रैमासिक आयोजन करण्यात यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

वर्ष 2026-27 या कालावधीत मशरूम कल्टीवेशन, शेवगा उत्पादक क्लस्टर निर्मिती व कोठार निर्मिती इत्यादी उपप्रकल्प राबविणार येणार आहे. याकरिता जिल्हा नियोजन समिती, खनिज क्षेत्र विकास व इतर विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्या जाईल. तसेच विविध विभागांनी माविमच्या बचत गटांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी जिल्हाधिका-यांना जिल्ह्यात बचत गटातील महिलांसाठी सुरू असलेल्या प्रकल्पांबद्दल तसेच नवतेजस्विनी प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यात सुरू 42 उपप्रकल्प व त्या माध्यमातून एकूण 7,755 महिलांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मिळत असलेल्या रोजगाराविषयी माहिती दिली.

०००००००

No comments:

Post a Comment