Search This Blog

Tuesday, 1 September 2020

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


 

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार

दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पुरग्रस्त भागाची करणार पाहणी

चंद्रपूर दि. 1 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 1 सप्टेंबर मंगळवार व 2 सप्टेंबर बुधवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादिवशी ते ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करुन आढावा घेणार आहेत.

1 सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे पुरपरिस्थिती बाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी 4 वाजता ब्रह्मपुरी तालुक्यातील पुरग्रस्त भागाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार आहेत. शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.

2 सप्टेंबर बुधवार रोजी  सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत ब्रह्मपुरी तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे त्यांचा वेळ राखीव असणार आहे. दुपारी 12:30 ब्रह्मपुरी वरून तालुका सावलीकडे प्रयाण करतील. दुपारी 1:30 वाजता सावली तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत पुरग्रस्त भागाची पाहणी करतील. सायंकाळी 4 वाजता सावली तालुक्यातील व्याहाळ खुर्द येथे काँग्रेस कार्यालय येथे आगमन होणार असून पुर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी 5 वाजता व्याहाळ खुर्द येथुन गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व पुर परिस्थिती बाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. रात्रीला शासकीय विश्रामगृह, रानफुल निवास गडचिरोली येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.

000000

चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 01 सप्टेंबर , 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता

 चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 01 सप्टेंबर , 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता



Monday, 31 August 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2547

 


चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2547

24 तासात आणखी 203 कोरोना बाधितांची नोंद

उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 1269

1249 बाधित कोरोनातून बरे

चंद्रपूर, दि 31 ऑगस्ट: जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 203 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 547 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 1 हजार 269 असून आतापर्यंत 1 हजार 249 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

जिल्ह्यात 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, बाबुपेठ चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 22 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.

45 वर्षीय ऊर्जानगर चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार होता. 30 ऑगस्टलाच सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.

तर तिसरा मृत्यु हा 65 वर्षीय गांधी वार्ड बल्लारपूर येथील पुरुष बाधिताचा झाला आहे. 29 ऑगस्टला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 30 ऑगस्टला बाधिताचा अहवाल पॉझिटीव्ह आला उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 29 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 26, तेलंगाणा, बुलडाणा व गडचिरोली येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 122, राजुरा तालुक्यातील 13 , वरोरा तालुक्यातील 9, बल्लारपूर तालुक्यातील 9 , भद्रावती तालुक्यातील 3 , गोंडपिपरी तालुक्यातील 23, पोंभूर्णा तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील 5,  सावली तालुक्यातील 2,  मूल तालुक्यातील 12,  नागभीड तालुक्यातील 4 बाधित असे एकूण 203 बाधित पुढे आले आहे.

चंद्रपूर शहरातील रेस्ट हाऊस परिसर, पटवारी भवन वार्ड नं. 5, बिनबा वार्ड, ऊर्जानगर, रामनगर कॉलनी परीसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, पठाणपुरा वार्ड, जिल्हा कारागृह, दुर्गापुर सिद्धार्थ नगर वार्ड नं. 4, किरमे प्लॉट बाबुपेठ, चेतन गॅस एजन्सी जवळ रामनगर, आकाशवाणी रोड परिसर, साईबाबा वार्ड सिव्हिल लाईन, दुर्गापुर वार्ड नं.1, देना बँक परिसर बाजार वार्ड, बालाजी वार्ड गोपालपुरी, महाराष्ट्र बँक परिसर तुकूम, हनुमान मंदिर परिसर दादमहल वार्ड, भानापेठ वार्ड विजय टॉकीज परिसर, दिनकर नगर लालगुडा, कन्नमवार वार्ड अंचलेश्वर गेट परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, बाजार वार्ड चौधरी पॅलेस परिसर,  भिवापूर वार्ड ओम नगर, प्लॉट नं.1 सोईतकर हाऊस परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, खत्री कॉलेज परिसर, जीवन साफल्य कॉलनी भागातून बाधित पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील चूनाभट्टी वार्ड, एरिया हॉस्पिटल सास्ती, देशपांडे वाडी, विरुर स्टेशन वॉर्ड नं. 4 परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.वरोरा तालुक्यातील कासमपंजा वॉर्ड, विनायक लेआउट, बोर्डा, नागरी, शेगाव, भागातून बाधित पुढे आले आहे.

बल्लारपूर येथील शांती नगर वार्ड, किल्ला वार्ड, राणी लक्ष्मी वार्ड, मौलाना आजाद वार्ड, कन्नमवार वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, बामणी परिसरातून बाधीत ठरले आहे.

भद्रावती येथील खापरी वार्ड, लुंबिनी नगर विजासन रोड परिसर, कोकेवाडा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील वाढोली, लिखितवाडा, परिसरातून बाधीत पुढे आले आहे.कोरपणा येथील वनसडी, नोकारी पालगाव भागातून बाधीत ठरले आहे. मूल तालुक्यातील वार्ड नं. 15, वार्ड नं. 11, वार्ड नं.14, केळझर, चिरोली, गोवर्धन, भागातून बाधित पुढे आले आहे.

000000

Sunday, 30 August 2020

चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 31 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता

 चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 31 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता



पूरग्रस्त भागात बचाव पथकाद्वारे मदत कार्य सुरू





 पूरग्रस्त भागात बचाव पथकाद्वारे मदत कार्य सुरू

एनडीआरएफ पथक सोमवारला दाखल होणार

ब्रह्मपुरी परिसरातील पूर परिस्थितीची

ना. वडेट्टीवार यांनी केली पहाणी

चंद्रपूर, दि.30 ऑगस्ट: गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीची पातळी सतत वाढत असून ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी असलेले लाडज, पिपळगांव, बेंबाळा, निलज, अहेरगाव, चिखलगाव आदी लगतच्या गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी दाखल करण्यात येत आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. पुरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेऊन त्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पुर परिस्थितीची पहाणी केली. नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्याचे कार्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकाद्वारे सुरू आहे. पुर परिस्थितीवर नियंत्रणासाठी एनडीआरएफचे पथक सोमवारी दाखल होणार आहे.

गोसीखुर्द धरणात पाण्याचा साठा वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. परिणामी वैनगंगा नदीला पूर आला आहे. पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, पिपळगांव, बेंबाळा, निलज, अहेरगाव, चिखलगाव आदी लगतची गावे पाण्याखाली गेली आहेत. लाडज गावातून 72 तर बेलगांव येथून जवळपास 250 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य बोटीद्वारे बचाव पथक सतत करीत आहे.

बचाव कार्य करण्यासाठी पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी हेलिकॉप्टर मागविले होते. उद्या देखील हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करण्यात येणार आहे.

सावली तालुक्यातील बेलगाव, निमगाव आदी गावांत पुराचा फटका बसला आहे. तसेच पोंभूर्णा, गोंडपिंपरी तालुक्यातील वैनगंगा नदी परिसरात असणारे गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

00000