Search This Blog

Thursday, 3 September 2020

जिल्हा परिषद मुख्यालय निर्जंतुकीकरणासाठी 6 सप्टेंबर पर्यंत बंद


जिल्हा परिषद मुख्यालय निर्जंतुकीकरणासाठी 6 सप्टेंबर पर्यंत बंद

चंद्रपुर,दि. 3 सप्टेंबर: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. अशातच जिल्हा परिषद चंद्रपूर मुख्यालयातील तीन कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव इतर अन्य कर्मचाऱ्यांना होणार नाही. यासाठी जिल्हा परिषद मुख्यालय निर्जंतुकीकरण करण्याकरिता 4 ते 6 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद मुख्यालयातील कामकाज बंद राहणार असल्याने नागरिकांनी त्यांचे कामकाजास्तव संबंधित विभागास ई-मेलद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000


पूरग्रस्तांना भरीव व तातडीने मदत देणार : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार





 

पूरग्रस्तांना भरीव व तातडीने मदत देणार

: मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

Ø पालकमंत्री यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

Ø प्रति कुटुंब 10 हजार रुपये प्रारंभिक तातडीची मदत देण्यात येणार

चंद्रपूर, दि.3 सप्टेंबर: मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे पाच मीटरपर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील हजारो हेक्टर धान शेती सह अनेक गावे पाण्याखाली आल्याने  शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी स्वत: ब्रह्मपुरी व सावली भागाची सतत तीन दिवस बोट व हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच विस्थापित झालेल्या  नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

आपदग्रस्तांना भांडे व कपडेसाठी पाच हजार रुपये व अन्नधान्यासाठी पाच हजार रुपये याप्रमाणे प्रति कुटुंब 10 हजार रुपये प्रारंभिक तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यानी सांगितले. पहिले पाच व नंतर पाच असे एकूण 10 हजार रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहे.

पूरग्रस्तांना ही प्राथमिक मदत असली तरी सर्व्हेअंती भरीव मदत देण्यात येणार आहे. यात 100 टक्के घरे पडलेल्यांना 95 हजार रुपये, घराच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, शेतीच्या नुकसानकरिता प्रति हेक्टर 18 हजार रुपये, जनावरे मरण पावल्यास त्याची वेगळी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी  स्पष्ट केले आहे.

सन 1995 पेक्षाही पुराची पातळी भीषण आहे. ना. वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील बोरगाव, पारडगाव, बेटाळा, कोलारी, भालेश्वर, नवरगाव, बेटगाव, अहेर, रनमोचन तर सावली तालुक्यातील करोली, निमगाव, बोरमाळा या गावांसह पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची, पडलेल्या घरांची पाहणी केली व आपदग्रस्त नागरिकांसोबत, शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधला.

पूरग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून तातडीने प्रत्यक्ष सर्व्हेक्षण व पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. सर्व गावा - गावात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

पुरामुळे गावागावात गाळ साचला असल्याने गाळ तातडीने काढून ब्लिचिंग पावडर टाकण्याचे व आपादग्रस्त गावात तातडीने आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री  ना. विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिलेत.

सर्वेक्षण करीत असतांना कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन प्रत्यक्ष तपासणी व पंचनामे करून अहवाल तयार करावा. या पुरात मत्स्यपालन, कुक्कुटपालन यांचे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून त्यांचासुद्धा उल्लेख करण्यात यावा अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात.

यावेळी सभापती विजय कोरेवार, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसिलदार सागर कांबळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले, तालुका कृषी अधिकारी सिध्देश ढवळे, तालुका कृषी मंडळ अधिकारी रामाराव वाघमारे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावचे सरपंच तसेच खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर, विलास निखार, नितीन उराडे, देवीदास जगनाडे, नानाजी तुपट, हितेंद्र राऊत, दिनेश चिटनूरवार, यशवंत बोरकुटे, उर्मिलाताई तरारे उपस्थित होते.

00000

चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 03 सप्टेंबर , 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता

 चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 03 सप्टेंबर , 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता



Wednesday, 2 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 1381 बाधितांना डिस्चार्ज

 


चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 1381 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 2945;

उपचार सुरु असणारे बाधित 1532

जिल्ह्यात 24 तासात 182 बाधित; तीन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 182 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 हजार 945 झाली आहे. यापैकी 1 हजार 381 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 1 हजार 532 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये 3 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये रामनगर चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे.  या बाधिताला 28 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 1 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यु हा 48 वर्षीय वडसा, गडचिरोली येथील पुरुष बाधिताचा झाला आहे. 1 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते.  1 सप्टेंबरलाच सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त उच्चरक्तदाब तसेच श्वसनाचा आजार होता.

तर, तिसरा मृत्यु हा 65 वर्षीय श्री.साई प्लाझा परीसर कबीर नगर, मुल रोड चंद्रपूर येथील महिला बाधितेचा झाला आहे. 30 ऑगस्टला बाधितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 2 सप्टेंबरला पहाटे बाधितेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधितेला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 32 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 28, तेलंगाणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.

24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 129, नागभीड 3, पोंभूर्णा एक, बल्लारपूर 20, ब्रह्मपुरी, मुल, गोंडपिपरी येथील प्रत्येकी 2, भद्रावती 3, राजुरा 19 असे एकूण 182 बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहरातील शासकिय वैद्यकिय महाविदयालय परीसर, रयतवारी कॉलनी, दादमहल वार्ड, पठाणपुरा वार्ड, जटपुरा गेट परीसर, सराफा लाईन, जिल्हा कारागृह, अंचलेश्वर वार्ड,  मिलिंद चौक, विद्या विहार कॉन्हेंट परीसर, घुटकाळा वार्ड,  एकोरी वार्ड, शांती पार्क कॉलनी परीसर, जेबी नगर, भानापेठ वार्ड, विवेक नगर, बाबुपेठ, पटेल नगर,  मुल रोड परीसर,  तुकुम, बंगाली कॅम्प, रामनगर, विठ्ठल मंदिर वार्ड, समाधी वार्ड, नेहरु नगर, जीवन साफल्य कॉलनी, सिस्टर कॉलनी, क्रिष्णा नगर, महाकाली वार्ड, श्रीराम वार्ड, भिवापूर वार्ड,  सुदामा गल्ली, आझाद वार्ड व कन्नमवार वार्ड परिसरातील तसेच तालुक्यातील दुर्गापूर, घुघुग्स, वाघोली, कोसारा गावातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी दिक्षीत, दिगोरी, बल्लारपूर शहरातील रानी लक्ष्मी वार्ड, संतोषी माता वार्ड, गांधी वार्ड, रेल्वे वार्ड, शिव नगर वार्ड व महाराणा प्रताप वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहेत.

ब्रम्हपूरी तालुक्यातील बेटाळा व देलनवाडीतून बाधित ठरले आहेत. भद्रावती तालुक्यातील माजरी, विजासन व कोकेवाडा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत.

मुल तालुक्यातील चिंचाळा येथुन बाधित पुढे आले आहेत. राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन भागातील व चुनाभट्टी वार्ड परीसरातील बाधीत ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील वाघोली येथील बाधित ठरले आहेत.

000000

चंद्रपूर जिल्ह्यात 3 सप्टेंबर पासून होणारे लॉकडाऊनला सध्या स्थगिती : अजय गुल्हाने



 चंद्रपूर जिल्ह्यात 3 सप्टेंबर पासून होणारे लॉकडाऊनला सध्या स्थगिती: अजय गुल्हाने

चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर: चंद्रपूर जिल्ह्यात 3 सप्टेंबर पासून एक आठवडा लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा 29 ऑगस्टला पालकमंत्री ना. विजय वडडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, त्यानंतर केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार कोणतेही राज्य, जिल्हा यांना केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय लॉकडाऊन करता येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र, त्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे उद्या 3 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणारे लॉकडाऊन सध्या स्थगित करण्यात येत असल्याची  माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाऊन नाही परंतु, 30 सप्टेंबर पर्यंत कलम 144 लागू असणार आहे. याविषयीचा आदेश काढण्यात आलेला आहे. प्रवासासाठी ई-पास परवान्याची आवश्यकता नसणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत चालू राहतील. तथापि मेडिकल औषधाची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहणार आहे.

00000