Search This Blog

Sunday, 2 May 2021

कोविड लसिकरण बहुमाध्यमी जनजागृती व्हॅन चंद्रपूरात दाखल

 


कोविड लसिकरण बहुमाध्यमी जनजागृती व्हॅन चंद्रपूरात दाखल

Ø  कोरोना लसिकरण व आत्मनिर्भर भारत अभियान जनजागृती मोहिमेला आज पासून सुरूवात

Ø  माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेच्या अधिनस्त क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरचा उपक्रम

चंद्रपूर, दि.2: कोविड-19 लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅन चंद्रपूर जिल्ह्य़ात दाखल झाली आहे. या फिरते प्रदर्शन आणि कलापथकाच्या माध्यमातून उद्या सोमवार (दि.३ मे) पासून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील गावांमध्ये नागरीकांमध्ये कोरोना लसिकरण विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. 

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्हयात १६ व्हॅन्स द्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड-19 लसिकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये २० दिवस व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.  

या उपक्रमांतर्गत लसिकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड-19 विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे, हा या मागील उद्देश आहे. लसिकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.

यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्‍हा माहिती कार्यालय यांचे सहकार्य लाभले आहे.

या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे संचालक प्रकाश मकदुम यांच्या मार्गदर्शनात सहायक संचालक निखील देशमुख, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, तकनीकी सहायक संजय तिवारी, श्रीमती संजीवनी निमखेडकर,जी नरेश आणि सुभेदार रामजी बहुउद्देशिय संस्था, चंद्रपूर, श्रीकृष्ण बहुउद्देशिय संस्था, यवतमाळ, नवचैतन्य बहुउद्देशिय संस्था परिश्रम घेत आहेत.  

*************

Saturday, 1 May 2021

चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित




 

चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले पोर्टलचे उद्घाटन

 

Ø  ऑनलाईन बेड अलॉटमेंट प्रणालीमुळे रुग्णांची गैरसोय टळणार

Ø  गरजू रुग्णांना विहित वेळेत बेड उपलब्ध होण्यास मदत.

Ø  आय.सी.यु., व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड च्या तीन स्वतंत्र प्रतीक्षा याद्या होणार

Ø  प्रतिक्षा यादी डावलून कोवीड हॉस्पिटलला परस्पर रुग्ण भरती करता येणार नाही

Ø  रिक्त बेड असतांना बेड उपलब्ध नसल्याची सबब सांगता येणार नाही

Ø  ऑनलाईन बेड अलॉटमेंट प्रणाली चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम कार्यान्वित

 

चंद्रपूर दि. 2 मे :  जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, बरेचदा गंभीर रुग्णांना अनेक ठिकाणी बेड उपलब्ध असूनही त्याची माहिती उपलब्ध होत नाही व त्यांना हॉस्पिटलसाठी वणवण फिरावे लागूनही उपचारासाठी वेळेवर बेड मिळत नाही, या आशयाच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेवून रुग्णांना त्यांच्या प्राथमिकतेनुसार आय.सी.यु., व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळावे यासाठी चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित केलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या पोर्टलचे उद्घाटन 1 मे रोजी  करण्यात आले. गंभीर रुग्णांना वेळेवर बेड मिळण्यासाठी या प्रणालीचा निश्चितच उपयोग होणार असून रूग्णांची याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, प्रामुख्याने उपस्थित होते.

या पोर्टल च्या माध्यमातून कोविड रुग्णांना चंद्रपूर शहरातील सर्व कोवीड रुग्णालयात आय.सी.यु., व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड च्या तीन स्वतंत्र प्रतीक्षा यादी नुसार बेड उपलब्ध होतील. यासाठी सर्वप्रथम रुग्ण जवळच्या कोवीड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात गेल्यावर तिथे रुग्णांचे ऑक्सिजन लेवल व इतर बाबींची तपासणी करून त्याची नोंदणी सदर पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. नोंदणीनंतर प्रत्येक रुग्णांना एक टोकन नंबर देण्यात येईल. सदर पोर्टलवर नोंदणी केलेल्या रुग्णांची बेड निहाय प्रतीक्षा यादी तयार होईल.  रुग्णाची गंभीर स्थिती पाहून केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार रुग्णाला चंद्रपूर शहरातील आवश्यक सुविधा युक्त हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होईल व त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू होईल.

सोमवार पासून शहरातील सर्व कोवीड हॉस्पिटल रुग्णांना परस्पर दाखल करून न घेता या प्रणालीवर नोंदणी केलेल्या प्रतिक्षा यादीतीलच रूग्णांना भरती करून घेतील. ऑनलाईन प्रणालीमुळे जुन्या रूग्णाला सुटी मिळाल्यावर हॉस्पीटलमध्ये रिक्त होणाऱ्या बेडची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व कोवीड केअर सेंटरला लगेच उपलब्ध होईल. हा रिक्त झालेला बेड प्रतिक्षायादीतील रूग्णाचे नावे लगेचच उपलब्ध होईल. बेड मिळाल्याची  माहिती  संबंधित रुग्णालय तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे रुग्णाला दूरध्वनीद्वारे देण्यात येईल. या प्रणालीच्या माध्यमातून बेड उपलब्ध करून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण थेट जाऊन उपचार घेतील. यामुळे प्रतीक्षा यादीतील गरजू रुग्णाला तात्काळ बेड उपलब्ध होईल. बेड उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची इतरत्र बेड शोधण्यासाठी फरपट होणार नाही तसेच हॉस्पिटल प्रशसनालादेखील बेड रिक्त नसल्याची सबब यामुळे आता सांगता येणार नाही.

चंद्रपूर शहराच्या बाहेरील कोविड हॉस्पिटलचा समावेश सध्या या पोर्टलमध्ये करण्यात आलेला नाही. या पोर्टलमध्ये हॉस्पिटलला दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची माहिती, कोविड हॉस्पिटल, डॉक्टर व त्यांचे नोडल अधिकारी यांची माहिती व मोबाईल क्रमांक उपलब्ध असणार आहे.

 या पोर्टलद्वारे प्रत्येक रुग्णाला त्याच्या आवश्यकतेप्रमाणे हॉस्पिटल व बेड उपलब्ध होऊ शकेल. नोंदणी करताना रुग्णाचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, रुग्णाच्या शरीरातील ऑक्सीजन पातळी, आरटीपिसीआर तपासणी अहवाल आवश्यक आहे. तसेच नोंदणी करताना चार रुग्णांच्या नोंदणीसाठी एका मोबाइल क्रमांकाचा वापर करता येऊ शकेल, बेड उपलब्धतेची माहिती मोबाइलवर देण्यात येणार असल्याने नोंदणीच्या वेळी योग्य मोबाईल क्रमांक नोंदवावा. रुग्णांना प्रतिक्षा यादीतील आपले स्थान कंट्रोल रूमच्या 07172-274161 व 07172-274162 या क्रमांकावरून देखील माहिती करून घेता येईल. प्रणलीवर वैद्यकीय तपासणीची वसतुनिष्ठ माहिती भरावयाची असल्याने रूग्णांना वैयक्तिक नोंदणी करता येणार नाही.

कोवीड रूग्णांसाठी वरीलप्रमाणे ऑनलाईन बेड अलॉटमेंट प्रणाली चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम कार्यान्वित करण्यात येत आहे. रूग्णांना शासकीय व खाजगी कोविड रूग्णालयात अतिदक्षता, व्हेंटीलेटर व ऑक्सीजन बेड मिळण्यासाठी याचा थेट लाभ होणार असून रूग्णांनी खाली दिलेल्या कोविड केअर सेंटर व हॉस्पीटलमध्ये नोंदणी करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

*या ठिकाणी होणार नोंदणी-* चंद्रपूर शहर- वन ॲकॅडमी होस्टेल तसेच सर्व कोवीड हॉस्पीटल; ब्रम्हपुरी-  कोविड केअर सेंटर, पॉलीटेक्नीक कॉलेज; चिमूर- मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह, कोर्टासमोर; गोंडपिपरी- आदिवासी मुलींचे वस्तीगृह; कोरपना- मुलींचे वस्तीगृह, भाऊराव पाटील चटप आश्रमशाळा, आदिलाबाद रोड; सावली- राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय वस्तीगृह; सिंदेवाही- मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह, पथारी रोड; राजुरा- समाजकल्याण मुलांचे वस्तीगृह, इंदिरा नगर; गडचांदूर- होली फॅमेली स्कुल; भद्रावती- जैन मंदिर; मुल- उपजिल्हा रूग्णालय क्वॉर्टर, वरोरा- 1. आदिवासी मुलींचे वस्तीगृह, 2.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृह,3. आदिवासी मुलांचे वस्तीगृह;  बल्लारपूर- 1. सैनिक शाळा बल्लारपूर, 2. समाजकल्याण वस्तीगृह; नागभिड- जी.डब्ल्यु. कॉलेज; पोंभूर्णा- ग्रामीण रूग्णालय; या कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पीटलमधून रूग्णांची नोंदणी करण्यात येईल.

सदर पोर्टल कार्यान्वित करण्यासाठी नागपूर येथील लॉज त्रिमूर्ती  या संस्थेचे सहकार्य लाभले आहे.

00000

18 वर्षावरील नागरिकांचे होणार लसीकरण

 18 वर्षावरील नागरिकांचे होणार लसीकरण

Ø  नागरिकांनी  लस घेण्याचे  जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Ø  2 मे पासून मिळणार कोरोनावरील लस

Ø  पुर्व नोंदणी ( रजिस्ट्रेशन) करणे बंधनकारक

Ø  18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे जिल्ह्यातील 7 केंद्रावर होणार लसीकरण

Ø  प्रत्येक केंद्रावर दररोज 200 डोज देणार

Ø  स्पॉट रजिस्ट्रेशन ची सोय नसल्याने केंद्रावर गर्दी करू नये

Ø  पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

 चंद्रपूर दि.1 मे : जिल्ह्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरीकांना कोरोना आजारावरील कोविशिल्ड  ही लस दिनांक ०२ मे २०२१ पासून सात केंद्रावर प्रायोगिक तत्वावर देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी या ठिकाणी जाऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 

या ठिकाणी मिळेल लस:

 प्राथमिक शाळा, पोलिस स्टेशन समोर, ब्रम्हपूरी, रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, रामनगर, चंद्रपूर, पंजाबी सेवा समिती, तुकुम, चंद्रपूर,  नाट्य सभागृह, बल्लारपूर, समाज मंदीर रामनगर राजुरा, बुद्ध लेणी विजासन भद्रावती, जनता कन्या विद्यालय, नागभिड या केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात येईल. दर दिवशी २०० याप्रमाणे प्रत्येक केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.

 कोविन अॅपवर नोंद केल्यानंतर जवळच्या १८ ते ४४ वर्षासाठी राखीव असलेल्या लसीकरण केंद्रावरच लस दिल्या जाईल. सर्व केंद्रावर पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध असल्याने नागरीकांनी गर्दी करु नये.  ज्या नागरीकांना लसीकरण सत्र उपलब्ध झाले आहे त्याच नागरीकांनी लसीकरणासाठी यावे. सदर केंद्रावर स्पॉट रजिस्ट्रेशन ची सोय नसल्याने केंद्रावर जावून गर्दी करु नये.

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण केंद्र राखीव असल्याने इतर वयोगटातील नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरणासाठी आग्रह करु नये. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत असल्याने केंद्रावर विनाकारण

गर्दी न करता लसीकरण करणा-या टिमला सहकार्य करावे. सदर राखीव लसीकरण केंद्रावर ४५ वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरीकांना लस दिल्या जाणार नसल्याने या वयोगटातील नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरणाचा आग्रह धरु नये असे जिल्हा प्रशासनामार्फत सूचित करण्यात आलेले आहे.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र शासनाने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला असून लसच्या उपलब्धतेनुसार सर्वांचे लसिकरण करण्यात येईल. जिल्ह्यात सुरू होणाऱ्या या लसीकरण मोहिमेला माझ्या शुभेच्छा आहेत. मी

 आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे  लस घेतली आहे, आपणही लस घ्यावी. लस सुरक्षित व प्रभावी असून कोरोना विरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोरे येऊन लस टोचून घ्यावी असे आवाहन  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

लस घेतल्यावरही नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्क लावणे व सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले

 

.000000

गत 24 तासात 1265 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 1265 कोरोनामुक्त,

1125  पॉझिटिव्ह तर 24 मृत्यू

Ø  आतापर्यंत 44,088 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,420

चंद्रपूर, दि. 1 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1265 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1125 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 24 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 61 हजार 437 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 44 हजार 88  झाली आहे. सध्या 16 हजार 420  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 81 हजार 53 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 14 हजार 491नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील दुर्गापूर येथील 83 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 45 वर्षीय महिला, नगीना बाग परिसरातील 49 वर्षीय पुरुष, 56 व 65 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 58 वर्षीय पुरुष, सुमित्रा नगर परिसरातील 45 वर्षीय महिला, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 54 वर्षीय पुरुष,38 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 26 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथील 60 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील 53,65 व 70 वर्षीय महिला,वरोरा तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील 46 वर्षीय पुरुष, भिसी येथील 64 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील कन्हाळगाव येथील 65 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 29 वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील 44 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 33 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 56 वर्षीय पुरुष, तर गडचिरोली जिल्ह्यातील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 929 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 859, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 28, यवतमाळ 27, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1125 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 442, चंद्रपूर तालुका 96, बल्लारपूर 86, भद्रावती 12, ब्रम्हपुरी 63, नागभिड 89, सिंदेवाही 03 , मूल 49, सावली 34, पोंभूर्णा 06, गोंडपिपरी 57, राजूरा 40, चिमूर 41, वरोरा 31, कोरपना 30,  जिवती 20 व इतर ठिकाणच्या 26 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

नियोजनबद्ध पद्धतीने कोरोनावर मात करणे शक्य - पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार






 

नियोजनबद्ध पद्धतीने कोरोनावर मात करणे शक्य

                             - पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार

Ø  महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा

Ø  चंद्रपूर बेड मॅनेजमेंट पोर्टलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

Ø  पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस.

चंद्रपूर दि.1मे : कोरोनाचे हे संकट अधिक तीव्र आहे. त्यामुळे पुढचे नियोजन करताना ऑक्सिजन व मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.तसेच या संकटावर यशस्वीपणे मात करण्यासाठी नागरिकांनी संचारबंदीचे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस दलाकडून देण्यात आलेली मानवंदना पालकमंत्र्यांनी स्विकारली.

कोरोना आजाराच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मर्यादित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले,

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते,उपविभागीय अधिकारी रोहन घुगे,अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात कोरोना उपाययोजनांचे पालन करून आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील समस्त जनतेला  महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार  म्हणाले की, कोरोना विरुद्धच्या लढ्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका अविरत कार्य करत आहे त्यांचे कौतुक केले तेवढे कमीच आहे.

कोविडचे संकट संवेदनशीलतेने हाताळताना मोठ्या प्रमाणात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 11 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, 19 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, तर 18 कोविड केअर सेंटर कोविडचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत आहे. 1400 बेडचे नियोजन पूर्ण झालेले असून त्यासोबतच, चंद्रपूर जिल्ह्यात 500 बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यास मान्यता मिळाली आहे. रुग्णांना गावातच आयसोलेशन करता यावे या करिता आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी तसेच रुग्णांच्या आरोग्य सोयी सुविधेसाठी 850 ग्रामपंचायतींना 1 कोटी 80 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. लवकरच महाराष्ट्र कोरोना मुक्त होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, वारंवार हात धुवा, मास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा.  कोविड त्रिसुत्रीच्या आधारेच कोरोनावर मात करता येईल,असे आवाहन त्यांनी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात चंद्रपूर बेड मॅनेजमेंट पोर्टलचे रीतसर उद्घाटन केले या माध्यमातून रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी मदत मिळणार आहे.

वन अकादमी येथे 100 ऑक्सीजन बेड कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व विहित वेळेत काम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी  केल्या.

पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे  कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. स्टाफ नर्स सावी मानकर यांनी लस दिली. तसेच नागरिकांनी लस घ्यावी, लस सुरक्षित व प्रभावी आहे. तसेच लस ही कोरोना विरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोरे येऊन लस घ्यावी असे आवाहन  त्यांनी यावेळी केले.

0000000