Search This Blog

Wednesday, 3 May 2023

शेतकऱ्यांनी तेलबिया पिकाची लागवड करण्याचे कृषी विभागाचे आवाहन


शेतकऱ्यांनी तेलबिया पिकाची लागवड करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

            चंद्रपूर, दि. 03 : भारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून जागतिक पातळीचा विचार करता लागवडही 14-15 टक्के इतकी आहे. मात्र, खाद्य तेल उत्पादनात केवळ 6-7 टक्के इतकाच वाटा आहे. पर्यायाने दरवर्षी खाद्यतेल आयातीचे प्रमाण वाढत असून, त्याचा ताण अर्थव्यवस्थेवर येत आहे. तेलबिया जसे सोयाबीन, करडई, जवस, मोहरी या अपारंपारीक पिकाच्या क्षेत्रात वाढ केल्याने जी 70 हजार ते 1 लाख कोटी रूपयाच्या तेलाची बाहेर देशातुन आयात करावी लागते, त्याचप्रमाणे आयात कमी होवून तेलावरील बाहेरील देशावरचे अवलंबत्व कमी होईल. तसेच रब्बी हंगामाचे क्षेत्र सुध्दा वाढेल. अशावेळी करडईसारखे कोरडवाहू पीक महत्त्वाचे ठरू शकते. भारतात खाद्यतेलाची मागणी व पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. सुमारे 60 टक्के तेल आयात करावे लागते.

              तेलबिया उत्पादनांपैकी 85 टक्के वाटा भुईमूग, सोयाबीन आणि मोहरी यांचा एकत्रितपणे आहे. कोरडवाहू क्षेत्रातही चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या करडईसारख्या पिकाला प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे कोरडवाहू क्षेत्रातही तेलबियांचे उत्पादन शक्य होईल. त्यातून खाद्य तेलाबाबतची स्वयंपूर्णता गाठणे शक्य होईल.

              त्यामुळे शेतकऱ्यांपी जास्तीत जास्त प्रमाणात खादयतेलाची लागवड करावी व रब्बी क्षेत्रात वाढ करावी. असे आवाहन  कृषी  विभागामार्फत करण्यात येत आहे.

०००००

15 मे रोजी महिला लोकशाही दिन

 


15 मे रोजी महिला लोकशाही दिन

चंद्रपूर, दि. 03 : जिल्हास्तरावर  प्रत्येक महिन्याच्या  तिसऱ्या सोमवारी  महिला  लोकशाही  दिन  तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय  महिला  लोकशाही  दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे, मे महिन्याचा  लोकशाही  दिन  15 मे 2023 रोजी  सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात येत आहे.

या महिला लोकशाही दिनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाबी आणि विहित अर्जात नसलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी, ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन  वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा  महिलांचे अर्ज महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसापूर्वी विहित नमुण्यात असलेले अर्ज,  दोन  प्रतीत जिल्हा  महिला  व बालविकास अधिकारी कार्यालयात सादर करावेत. जेणेकरुन, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनास तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबधित विभागाला सदर तक्रार अर्ज पाठविण्यात येईल. विहित अर्जाचा नमूना मिळविण्यासाठी कार्यालयास भेट द्यावी, असे जिल्हा  महिला  व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

Tuesday, 2 May 2023

राष्ट्रीय लोक अदालतीत न्यायालयीन प्रलंबित 936 तर दाखलपूर्व 434 प्रकरणे निकाली

 


राष्ट्रीय लोक अदालतीत न्यायालयीन प्रलंबित 936 तर दाखलपूर्व 434 प्रकरणे निकाली

Ø भूसंपादन प्रकरणात 5 कोटी रक्कम लोक अदालतीत वसूल

चंद्रपूर, दि. 02 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात दि. 30 एप्रिल 2023 रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

या लोक अदालतीमध्ये प्रलंबित न्यायालयीन 6 हजार 917 प्रकरणे, दाखलपूर्व 8 हजार 696 अशी एकूण 15 हजार 613 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 936 प्रकरणे तर दाखल पूर्व प्रकरणांपैकी 434 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यानुसार 22 लक्ष 85 हजार 916 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. न्यायालयातील भूसंपादनाची एकूण 158 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 82 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून मोबदल्याची एकूण रक्कम 5 कोटी 28 लक्ष 87 हजार 805 अदा करण्यात आली. तसेच मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण 13 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाईची 65 लक्ष 35 हजार रक्कम वसूल करण्यात आली.

कौटुंबिक वाद व घटस्फोटाच्या प्रकरणांपैकी 30 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी 10 प्रकरणांमध्ये पक्षकांरानी एकत्र राहण्याच्या समजूतीने निर्णय घेतला. धनादेश प्रकरणापैकी 87 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच औद्योगिक व कामगार न्यायालयातील 6 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.

०००००

22 ते 31 मे कालावधीत जिल्हास्तरावर क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर

 


22 ते 31 मे कालावधीत जिल्हास्तरावर क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर

Ø तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर,(विसापूर) येथे आयोजन

चंद्रपूर, दि. 02 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने जिल्हास्तरावर 100 उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक क्रीडा शिक्षकांचे 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण शिबिर 22 ते 31 मे 2023 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर, (विसापूर) येथे पार पडणार आहे.

 खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, खेळांमधील कौशल्ये, नवीन खेळांची ओळख व खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना करून देणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानामध्ये भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रामध्ये होणारे बदल अवगत करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध खेळाचे तज्ञ, क्रीडा प्रशिक्षक किंवा संघटनेचे तांत्रिक पदाधिकारी, आहारतज्ञ, शरीर विज्ञानतज्ञ, क्रीडा मानसोपचार तज्ञ यांचे मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी झालेल्या क्रीडा शिक्षकांना लाभणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खो-खो, धनुर्विद्या, बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, मैदानी, बॅडमिंटन, हँडबॉल, जिम्नॅस्टिक, टेबल टेनिस, कुस्ती, फुटबॉल, बॉक्सिंग, शूटिंग, लॉनटेनिस, हॉकी, जलतरण व सायकलींग आदी खेळांचे क्रीडा मार्गदर्शकाद्वारा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये क्रीडा शिक्षकांना निवास, भोजन, तज्ञांचे मार्गदर्शन, ट्रॅकसूट, टी-शर्ट, शॉर्ट व शासन निर्णयान्वये प्रवास भत्ता देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीकरीता क्रीडा अधिकारी श्री. वडते 9975591175 यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

००००००

Monday, 1 May 2023

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन










 

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल -         पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

Ø पोलीस मुख्यालयात ६३ वा महाराष्ट्र दिन साजरा

Ø चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात योगदान देण्याचे ना.मुनगंटीवार यांचे आवाहन

चंद्रपूर,दि.१ - जगातील १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत. त्यातील ६५ टक्के वाघ भारतात आहेत. पण संपूर्ण जगात सर्वाधिक वाघ असलेला चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. ही आनंदाची बाब आहेच, पण आता महाराष्ट्राच्या विकासासाठी वाघासारखा पराक्रम गाजविण्याची जबाबदारी देखील चंद्रपूर जिल्ह्यावर आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पोलीस मुख्यालय येथे ६३ व्या महाराष्ट्र दिनानिमीत्त आयोजित ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. झेंडावंदन व परेडचे निरीक्षण झाल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, डॉ. मंगेश गुलवाडे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक रिना जनबंधू, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीला महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. ते म्हणाले, ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा… या महाराष्ट्र गितातील ओळींप्रमाणे जबाबदारी पूर्ण करण्याचा संकल्प सोडणे म्हणजे महाराष्ट्र दिन साजरा करणे होय. महाराष्ट्राच्या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी देशाच्या प्रगतीमध्ये मोठी जबाबदारी पार पाडली. पण त्यांचे फक्त स्मरण करून होणार नाही. त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.’ संविधानातील नागरिकांच्या कर्तव्यांची त्यांनी आठवण करून दिली. संविधानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकांची कर्तव्ये देखील नमूद केलेली आहेत. दुर्दैवाने आज देशात ते संविधानातील मूलभूत कर्तव्य वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. चंद्रपूरकरांनी ही जबाबदारी पार पाडणे हाच खरा महाराष्ट्र दिनाचा संकल्प ठरेल,’ असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

येत्या पाच वर्षांत शेतीच्या संदर्भातील योजनांमध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहील असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ग्रामीण व शहरातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी ‘हर घर जल’ या माध्यमातून १ हजार ३०२ योजनांना परवानगी दिली, असेही ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेत पूर्वी १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतच अनुदान मिळायचे. आता ते ५ लाख रुपये करण्यात आले. तसेच निराधार, परितक्त्या यांचे अनुदान १५०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने हा उत्सव भामरागड ते रायगड मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.

दरम्यान, रेडक्रॉस सोसायटीद्वारे तयार करण्यात आलेल्या मोबाईल टेस्टिंग व्हॅनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केले. गावपातळीवर महिला सक्षमीकरणाच्या कामात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर जिल्हा स्तरावर आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

महाराष्ट्राला अभिमान

राज्याचा अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रेव्हेन्यू सरप्लस ११ हजार ७५ कोटी केला. आज देशाच्या जीडीपीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचे योगदान १५ टक्के आहे. चंद्रपूरचा नागरिक म्हणून मला याचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

चंद्रपूरच्या विकासाची २०५ कामे

चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी २०५ कामांचे नियोजन केले. वन अकादमी, बॉटनिकल गार्डन, सैनिक शाळा यासोबत आता टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचे काम सुरू आहे. टाटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी ९० गावे दत्तक घेऊन कृषी उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘मिशन जय किसान’ या योजनेतून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा संकल्प केला आहे, असेही ते म्हणाले.

अडिच लाख शेतकऱ्यांना लाभ

नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा चंद्रपूर जिल्ह्यातील अडिच लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. स्व. गोपिनाथ मुंडे पिक विमा योजनेतील सानुग्रह अनुदान २ लाख रुपये करण्यात आला असून २०१८ पासून १० कोटी २९ लाख शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. फक्त १ रुपयांत पिक विमा योजना आणल्याचेही ते म्हणाले.

अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र

राज्यातील उत्तम आरोग्य सेवा चंद्रपुरात मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची उभारल्या जात आहेत. १४ नवीन इमारतींचे काम झाले असून इतर इमारतींचे लवकरच पूर्णत्वास येईल. जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देत अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र अस्तित्वात येतील, असा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. यासोबतच आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या योजनेअंतर्गत १५ ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आणि नागरी आरोग्य केंद्र आजपासून नागरिकांच्या सेवेत येत असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

००००००००