Search This Blog

Wednesday, 3 May 2023

वन प्रबोधिनीतर्फे ग्रामीण युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

 



वन प्रबोधिनीतर्फे ग्रामीण युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 3 : चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी आणि नागपूर येथील सिंबॉयसीस कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील युवकांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 15 दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात युवकांना मोबाईल, सीसीटीव्ही व लॅपटॉप दुरूस्तीबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे चंद्रपूर वन प्रबोधिनीतर्फे ग्रामीण युवकांना कौशल्य सुधारणेचे प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे सध्या सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या वन विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना विविध प्रकारचे पायाभूत तसेच उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. कौशल्य विकास प्रशिक्षणाचा उद्देश, पंतप्रधान यांच्या कौशल्य भारत कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार दुर्गम आदिवासी भागातील युवक/युवतींना रोजगार आणि कुशल कार्यशक्ती प्रदान करणे हा आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये देखील वाढ होईल. सदर प्रशिक्षणाकरीता वनविभागाच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने अंतर्गत निधीची उपलब्धता करून देण्यात आली.  15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या आदिवासी बेरोजगार तरुणांची यादी संबंधीत वनवृत्तांकडून मागविण्यात आली होती. सदर प्रशिक्षणासाठी नागपूर वनवृत्तातील ग्रामीण भागातून एकूण 10 प्रशिक्षणार्थी व चंद्रपूर वनवृत्तातील एकूण 28 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.

            प्रशिक्षणादरम्यान संगणकाचा परिचय, संगणकाचे विविध भाग जोडणे, लॅपटॉपच्या विविध भागांची माहिती, सॉफ्टवेअरचा परिचय, संगणक प्रणालीची जोडणी, त्यातील घटकांचा उपयोग व समस्या निवारण, सीसीटीव्ही बसवणे, मोबाईलचा परिचय, मोबाईलचे विविध भाग जोडणे, मोबाईल सॉफ्टवेअरचा परिचय, त्यातील घटकांचा वापर व समस्या निवारण यासारख्या विषयांबद्दल सविस्तर माहिती व प्रात्यक्षिके याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाकरीता सिंबॉयसीस कौशल्य विकास केंद्र, नागपूर येथील तज्ज्ञ व्याख्यात्यांना पाचारण करण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान मोबाईल, सीसीटीव्ही व लॅपटॉप दुरूस्ती करीता आवश्यक साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.

            प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमाकरीता अध्यक्ष म्हणून वन प्रबोधिनीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सेवानिवृत्त वनसंरक्षक एस. एस. दहिवले, सिंबॉयसीस कौशल्य विकास केंद्राचे संचालक जयप्रकाश पालीवाल, सत्र संचालक मनिषा भिंगे, , उपसंचालक (शिक्षण – 1) शितल नांगरे उपस्थित होते.

०००००००

सामाजिक न्याय पर्व उपक्रमातंर्गत दिव्यांग हक्क अधिनियम व दिव्यांग शाळा संहिता विषयावर कार्यशाळा


 

सामाजिक न्याय पर्व उपक्रमातंर्गत दिव्यांग हक्क अधिनियम व दिव्यांग शाळा संहिता विषयावर कार्यशाळा

चंद्रपूर,दि. 03 :  समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रेरणेतून दि. 1 एप्रिल ते 1 मे 2023 पर्यंत सामाजिक न्याय पर्व उपक्रम साजरा करण्यात आला. याअंतर्गत दिव्यांग हक्क अधिनियम 2016 व दिव्यांग शाळा संहिता 2018 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा राबविण्यात आली.

                  यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपील कलोडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, नागपूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुडकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी कार्यशाळेत उपस्थित दिव्यांग शाळा कर्मचारी व दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेतील दिव्यांग व्यक्तींना 4 टक्के आरक्षणाबाबत तसेच 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत व शासकीय योजनांचा लाभ दिला जाईल व दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण संगणकीय प्रणाली विकसीत करुन करण्याबाबत मार्गदर्शन केले.  

नागपूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत यांनी दिव्यांग हक्क अधिनियम  2016  मधील कायदे व अधिकार संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. त्यासोबतच शासनाच्या दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले विविध कायदे व धोरणांसंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर संजय पेचे यांनी  दिव्यांग शाळा संहिता 2018 मधील तरतुदी, नियम व शासन निर्णयाबाबत सविस्तर माहिती  दिली.

सदर कार्यशाळेला जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागातील कर्मचारी, जिल्हयातील दिव्यांग शाळेतील कर्मचारी व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रस्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी तर आभार आनंद मुकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भसारकर यांनी मानले.

००००००

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी

 

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी

Ø कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर,दि. 03: कृषी उत्पादन वाढीमध्ये बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाणातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्यांची उगवणक्षमता व रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते.

बीजप्रक्रियेचे फायदे : जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची उगवणक्षमता वाढते. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. पिकाच्या उत्पादनात वाढ होते. बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो, त्यामुळे ही कीड-रोग नियंत्रणाची किफायतशीर पद्धत आहे.

जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया : नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबिअम 250 ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू 250 ग्रॅम या जिवाणू संवर्धकाचे पाकिट प्रति 10 किलो सोयाबीन बियाण्यास वापरावे. 1 लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे. सोयाबीन बियाणे ओलसर करून घ्यावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जिवाणू संवर्धक टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे किंवा जिवाणू संवर्धकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात बसेल व बियाण्यांचा पृष्ठभाग खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी. नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे. अशा बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी. याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही.जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजवून जमीन सुधारण्यास मदत होते.

जिवाणू संवर्धक बीजप्रक्रियेबाबतची दक्षता : जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांची प्रक्रिया केल्यानंतर करण्यात यावी. जिवाणू संवर्धक लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके इ. लावलेले असतील तर जिवाणू संवर्धक नेहमीपेक्षा दीडपट जास्त प्रमाणात लावावे.

जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे : सोयाबीन पिकावरील अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा वापरावे. ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशी असून ती पिकांना हानीकारक नसते. उलटपक्षी बियाण्यांवर वरील रोग पसरविणाऱ्या बुरशींची वाढ न होऊ देता जमिनीमध्ये रोगकारक बुरशींचा नायनाट करून पिकांचे संरक्षण करते. ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया करताना बियाणे स्वच्छ फरशी, प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून ट्रायकोडर्मा ओलसर करून शिंपडावे. नंतर हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रिया केलेले बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी.

ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेबाबतची दक्षता : ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक खतांसोबत किंवा रासायनिक बुरशीनाशकांचा सोबत शक्यतो करू नये. ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या व थंड जागेत साठवावे.

रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे : सोयाबीन पिकावरील अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम वापरावे. सोयाबीन बियाणे ओलसर करून घ्यावे. अशी प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. प्रति 10 किलो बियाण्यास 100 मिली पाणी वापरून बुरशी नाशकाचे घट्टसर द्रावण करून ते सोयाबीन बियाण्यास घोळसावे, जेणेकरुन बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिकटेल, त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

 शेतकरी बंधूनी सोयाबीन बियाणे बीजप्रक्रीया करूनच बियाणे पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

००००००००

सामाजिक न्याय पर्व उपक्रमातंर्गत नागरी हक्क संरक्षण व ॲट्रॉसिटी कायदा कार्यशाळा

 

सामाजिक न्याय पर्व उपक्रमातंर्गत नागरी हक्क संरक्षण व ॲट्रॉसिटी कायदा कार्यशाळा

            चंद्रपूर,दि. 03 : समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अभिनव संकल्पनेतून संपुर्ण जिल्हयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, चंद्रपूर तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यावतीने सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमाने साजरा करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांसाठी नागरी हक्क संरक्षण कायदा, अनुसूचित जाती व अनिसुचीत जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला सहायक आयुक्त अमोल यावलीकर, अॅड. प्रिया पाटील, आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. राजेश दहेगावकर, सह.प्राध्यापक मिलिंद भगत, ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव झाडे आदींची उपस्थिती होती. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी अध्यक्ष म्हणून बोलताना ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पिडीत लाभार्थ्याला व पिडीत कुटुंबाला समाजकल्याण विभागातर्फे प्रदान करण्यात येणारे विशेष सहाय्य, त्याचे स्वरूप याबाबत मार्गदर्शन केले. 

अॅड. प्रिया पाटील यांनी “ॲट्रॉसिटी कायदा हे संरक्षणाचे अस्त्र ते जपून वापरा” तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अर्थात ॲट्रॉसिटी कायदा हा अनुसूचित जाती-जमातीचे संरक्षणासाठीचे शासनाने दिलेले अस्त्र असून त्याचा योग्य वापर केला जावा असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या समतापर्व अंतर्गतच्या ॲट्रॉसिटी कार्यशाळेत केले तसेच ॲट्रॉसिटी कायद्यातल्या तरतुदी व त्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन सचीन फुलजले व आभार समाज कल्याण निरीक्षक पुनम आसेगावकर यांनी मानले.

००००००

शेतकऱ्यांनी जैविक कीटकनाशकांचा वापर वाढवून उत्पादन खर्च कमी करावा

 


शेतकऱ्यांनी जैविक कीटकनाशकांचा वापर वाढवून उत्पादन खर्च कमी करावा 

Ø कृषी विभागाचे आवाहन

            चंद्रपूर, दि. 03 : पिकामध्ये किड व रोग नियंत्रणासाठी जैविक निविष्ठाचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होवून उत्पन्न वाढते. रायझोबियम जिवाणू प्रति हेक्टरी प्रति वर्ष 50 ते 100 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोटोबॅक्टर जिवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो नत्र स्थिर करतात, पीएसबी प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद मुक्त करतात. निळे हिरवे शेवाळ प्रति हेक्टरी प्रति वर्ष 25 ते 30 किलो नत्र स्थिरीकरण करतात.  तूर, कापूस व हरभरा 4 ग्रॅम प्रति किलो पेरणीच्या वेळी बियाण्यास ट्रायकोडर्मा बिजप्रक्रीया केल्यास मर रोगावर नियंत्रण ठेवता येते. नत्र स्थिरीकरणामुळे उत्पादनात वाढ होवून रासायनिक खताचा वापर कमी होणार आहे. निसर्गामध्ये सर्वसाधारपणे 97 टक्के मित्रकिडी असुन 3 टक्के शत्रुकिडी आहेत. पिकांच्या विविध किडीवर उपजिवीका करणारे मित्रकिडी रासायनिक किटकनाशकांच्या अती वापरामुळे नष्ट होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक किटकनाशकांचा वापर वाढवुन उत्पादन खर्च कमी करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

रासायनिक खत 50 किलोच्या 1 युरीया बॅगमध्ये 23 किलो नायट्रोजनचे प्रमाण असते. 1 हेक्टर भात पिक लागवड केलेल्या जमीनीकरीता 100 किलो नत्राची आवश्यकता असते, त्याकरिता युरिया खताचे कमीत कमी 4 बॅग खरेदी कराव्या लागतात. याकरीता रू. 1064 खर्च येतो. जिवाणू खत ॲझोटोबॅक्टर वापरल्यास रू. 200 ते 250 खर्च येतो. त्यामुळे जैविक खताचा वापर केल्यास 25 ते 30 टक्के खर्चात बचत होते. जैविक खताच्या वापरामुळे जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपिकता टिकून राहते, पर्यावरणाचा समतोल राखला जातो. उपयुक्त जीवजंतू व मित्रकिडींना अपाय होत नाही. सेंद्रीय पदार्थ कुजण्यास मदत होते व जमिनीचा पोत सुधारतो. नैसर्गिक पध्दतीने अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. पिकाच्या उत्पादनात वाढ होते. जमिनीत सोडलेल्या प्रतिजैविकांमुळे पिकाची रोग व किड प्रतिकारशक्ती वाढते.

जैविक खतांमध्ये जमीन, पाणी व पिकांसाठी यासाठी अपायकारक अशी रसायने नसतात. जैविक खते तुलनेत स्वस्त असतात त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. जैविक खताचा शेतक-यांनी वापर करावा. त्यासाठी शेतक-यांनी जैविक निविष्ठा शासन मान्यता प्राप्त दुकान, कृषी विदयापीठे, शासकीय प्रयोगशाळा, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून खरेदी करून पक्के देयक प्राप्त करून घ्यावे. कोणत्याही कंपनीकडून ऑनलाईन पध्दतीने जैविक निविष्ठा खरेदी करू नये. यामध्ये शेतक-यांची फसवणूक होवू शकते.

तरी, शेतकऱ्यांनी खरीप हंगामात जैविक निविष्ठाचा जास्तीत जास्त वापर करून उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

००००००