Search This Blog

Saturday, 3 June 2023

वृक्ष लागवड व संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य -अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे





वृक्ष लागवड व संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य -अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे

वटवृक्ष लागवड मोहिमेचे उद्घाटन

चंद्रपूर, दि.03: लोकसंख्या वाढीमुळे लोकांच्या गरजा वाढत आहे. निसर्गात उपलब्ध साहित्यातून मनुष्य नवीन वस्तूंची निर्मिती करीत असतो. त्यामुळे अपरिहार्य असा ताण निसर्गावर आहे. हा ताण कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करुन संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी केले.

वटपौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन, चंद्रपूर शहर महानगरपालिका व नटराज निकेतन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल, बाबूपेठ येथे वटवृक्ष लागवड ‌कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मनपा आयुक्त विपिन पालिवाल, उपजिल्हाधिकारी(रोहयो) पल्लवी घाटगे, मनपा उपायुक्त अशोक गराटे, तहसीलदार कांचन जगताप, विभागीय वन अधिकारी शुभांगी चव्हाण, नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा मंगला पात्रीकर, सचिव मुकुंद पात्रीकर, प्राध्यापिका डॉ. भावना कुळसंगे, अभिनेत्री स्नेहल रॉय, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पेनके, इको-प्रोचे बंडू धोत्रे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे पुढे म्हणाले, पाणी अमूल्य आहे, तर हवा निसर्गाने मुबलकपणे दिलेली आहे. वडाच्या झाडाचे अपरिमित व अमर्याद फायदे आहे. वडाच्या झाडाची लागवड सहजपणे करता येऊ शकते. या वृक्ष लागवडीच्या मोहिमेमुळे निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. दशलक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्यात आहे. नागरिकांचे सहकार्य व सहभागाशिवाय हे उद्दिष्ट गाठणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक, विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्थानी या वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन मोहिमेत सक्रिय सहभागी होवून निसर्गाचा समतोल राखण्यात योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी केले.

मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी सांगितले की वृक्ष लागवडीच्या कार्यात जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन व नटराज संस्थेसारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची जोड मिळाली आहे. झाडे लावण्याचा विचार सर्वांनी मनात रुजवावा. जिल्ह्यात दहा लक्ष वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली असून सर्व नागरिकांचा सहभाग यामध्ये महत्त्वाचा आहे. शहरातील सामाजिक संस्थांच्या मदतीने व सहकार्याने  शहरात वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी करू. झाडे लावण्यासोबतच त्याच्या संवर्धनाची जबाबदारी पार पाडावी, असे ते म्हणाले.

यावेळी विविध सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते वटवृक्षाची लागवड करण्यात आली.तदनंतर, जल प्रतिज्ञा करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नटराज निकेतन संस्थेचे सचिव मुकुंद पात्रीकर यांनी तर संचालन व आभार मधुरा व्यास यांनी केले.

000000

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरणमार्फत विविध कार्यक्रम


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरणमार्फत विविध कार्यक्रम

 चंद्रपूर दि. 3 : जागतिक पर्यावरण दिनाच्या (05 जुन) औचित्याने  सामाजिक वनीकरण विभागामार्फत 1 जुन  ते  5 जुन 2023 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  या कार्यक्रमात नागरिका़नी सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने  केले आहे.

कार्यक्रमांतर्गत 1 जुन रोजी मूल परिक्षेत्रातील महात्मा ज्योतीबाराव फुले, विद्यालय चिरोली, येथील शालेय विद्यार्थ्यांकडून प्लॅस्टिक पिशव्याऐवजी कापडी पिशव्याचा वापर करणे, रेन वाटर हार्वेस्टींग स्ट्रक्चर बांधणे, परिसर प्लॅस्टिक पिशवी मुक्त करणेबाबत रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच नागभिड परी क्षेत्रांतर्गत धर्मराव कन्या विद्यालय, नवेगांव पांडव गावांमधून प्लास्टिकच्या वापरावर आळा घालणेबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. राजुरा परिक्षेत्रांतर्गत नैसर्गिक पर्यावरण, मानवता विकास संस्था, शाखा राजुरा व सामाजिक वनीकरण, परिक्षेत्र राजुरा यांचे संयुक्त विद्यमानाने सहकार कार्यालय येथे प्लॅस्टिक मुक्त घोषीत करणारी जनजागृती मोहिम राबविणे व आदर्श हॉयस्कुल राजुरा या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक मुक्त मोहिम राबविण्यात आली. दिनांक 2 जुन रोजी वरोरा सामाजिक वनीकरण परिक्षेत्रांतर्गत चेतना विद्यालय, माजरा येथील शालेय विद्यार्थीकडून बि-बियाने गोळा करुन सिडबँक तयार करणे, प्लास्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या वापरणे बाबत जनजागृती करण्यात आली.

तसेच दिनांक 03 जुन रोजी चिमुर परिक्षेत्रामधील नेहरु विद्यालय शंकरपूर या शाळेतील विद्यार्थ्यांकडून वापरलेल्या वहिचे शिल्लक पानांपासून नवीन वह्या तयार करुन त्या गरजु विद्यार्थ्यांना वाटप करणे, ग्रामदर्शन विद्यालय, चिमुर येथील शालेय विद्यार्थ्यांकडून गावातील वर्दळीच्या ठिकाणी बॅनर लावून पर्यावरणबाबत जनजागृती करणेबाबत नियोजन केलेले आहे. तसेच सिंदेवाही परिक्षेत्रामधील भारत विद्यालय नवरगांव येथील विद्यार्थ्यांमार्फत पर्यावरण दिनानिमित्य वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले आहे. 4 जुन रोजी भारत विद्यालय, पळसगांव जाट येथील विद्यार्थ्यांमार्फत वनराई बंधारा बांधण्यात येणार आहे. मातोश्री विद्यालय, नवरगांव येथील विद्यार्थ्यांकडून पर्यावरण व स्वच्छता याबाबत प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात येणार आहे. दिनांक 05 जुन 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्य चंद्रपूर विभागीय कार्यालय तसेच परिक्षेत्र स्तरावर विविध सामाजिक संस्था, शालेय शिक्षण संस्था यांचे सहाय्याने सिडबँक तयार करणे, कापडी पिशव्याचे वाटप करणे, चंद्रपूर परिक्षेत्रामधील अशासकीय संस्था आणि शालेय विद्यार्थी यांचे मदतीने रामाळा तलाव प्लॅस्टीक निर्मूलन व स्वच्छता कामे करणे, ईकोप्रो अशासकीय संस्था यांचे मदतीने परकोट किल्ला स्वच्छता अभियान राबविणे, वरोरा परिक्षेत्रामधील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय टेंभुर्डा वृक्षारोपवन करुन वृक्ष संवर्धन करणे, प्लॅस्टिक मुक्त परिसर करणेबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. तरी जागतिक पर्यावरण दिनानिमित्य होणाऱ्या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात आले आहे.

०००

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आकाशवाणीवरून देणार 'वनवार्ता'

 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आकाशवाणीवरून देणार 'वनवार्ता'

• 5 जून पासून प्रसारण

चंद्रपूर दि.३ : राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे  आकाशवाणीच्या  माध्यमातून "वनवार्ता" या कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.

वनमंत्री मुनगंटीवार वनांविषयीचे कुतूहल, गमतीजमती, रंजक गोष्टींपासुन ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पर्यावरण विषयक चर्चा व महत्वाच्या बाबी, त्यावरील उपाय, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव पर्यटन, हरित सेना ( ईको क्लब), वृक्ष लागवड यासंदर्भात आपले मनोगत 'वनवार्ता' या कार्यकमात व्यक्त करतील.

दिनांक ५ जुन या जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी आकाशवाणीवरुन सकाळी ८.४० वाजता 'वनवार्ता' या कार्यक्रमाची सुरूवात होणार असून पुढे दर १५ दिवसांनी एका रविवारी सकाळी ७.२५ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून १५ मिनिटांचा हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी एस.डी. चव्हाण यांनी केले आहे.

000

Friday, 2 June 2023

जिल्ह्याची आर्थिक प्रगती वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करा

 



जिल्ह्याची आर्थिक प्रगती वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करा

Ø ‘जिल्हा विकास आराखडा’ आढाव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Ø क्षेत्रनिहाय नियोजनाचा आढावा घेणार

चंद्रपूर, दि. 2:  एकंदर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने शासनाने ठरविलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनात जिल्ह्याची आर्थिक प्रगती वाढविणाऱ्या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात आयोजित ‘जिल्हा विकास आराखडा’ आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की विकसित जिल्हा बनण्यास सक्षम करणाऱ्या विकासाभिमुख दृष्टीकोनाची रूपरेषा तयार करावी. जिल्ह्यातील इको सिस्टम सपोर्टवर आधारित वृद्धीची उपक्षेत्रे ओळखून ती मजबूत करण्यासाठी कालबद्ध कृती योजना विकसित करण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सद्यस्थितीवरून भविष्यातील अपेक्षित स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक विभागाकडून क्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजनाचा नियमित आढावा घेण्यात येईल, त्यानुसार प्रत्येक विभागाने नियोजन सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला विविध विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

00000

परदेशात शिक्षणासाठी मिळवा शिष्यवृत्ती

 


परदेशात शिक्षणासाठी मिळवा शिष्यवृत्ती

Ø अनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींना 8 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत

चंद्रपूर, दि. 2:  आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित (आदिवासी) जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.

त्यानूसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर कार्यालयांतर्गत चिमूर, ब्रम्हपुरी, नागभिड, वरोरा व भद्रावती या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या मुलां-मुलींनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षणासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर कार्यालयातर्फे संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक प्रवेश घेण्यासाठी दिनांक 8 जून 2013 पर्यंत अर्ज सादर करावे, तसेच अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी निलेय राठोड यांनी कळविले आहे.

00000