Search This Blog

Wednesday, 7 May 2025

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा सन्मानित

 



मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा सन्मानित

Ø 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत राज्यात प्रथम

चंद्रपूर, दि. 7 मे : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. त्या अनुषंगाने आज (दि.7) मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले. यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजी मारली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात 84.29 गुण मिळवत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अद्ययावत संकेतस्थळ, केंद्र शासनासोबत सुसंवाद, कार्यालयीन स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, कामकाजातील सुधारणा, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी, सुकर जीवनमान, कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेले नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India)  मार्फत मूल्यमापन करण्यात आले होते. या सर्व निकषांवर परिपूर्ण उतरून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात सर्वोत्कृष्ठ ठरले.

००००००

बियाणे खरेदी करताना खबरदारी घ्यावी

 

बियाणे खरेदी करताना खबरदारी घ्यावी

Ø कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन

               चंद्रपूर, दि. 7 मे : खरीप हंगामाला आता सुरवात होणार आहे. शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्याकडून बियाणे, खते खरेदी करावेत. विक्रीचा परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठा खरेदी करावी, तसेच गावोगावी फिरणाऱ्या एजंटकडून कोणतेही बियाणे घेऊ नये, असे आवाहन कृषी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

कृषी विभागाने म्हटले की, शेतक-यांनी प्रतीनुसार आणि पिकाच्या गरजेनुसार योग्य बियाण्याची जात निवडावी. याकरिता स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शेतकयांनी बियाण्यांच्या पॅकेटवर कंपनीचे नाव, लॉट नंबर, उत्पादन तारीख, अंतिम तारीख, वाणाचे नाव, उगवण क्षमतेची टक्केवारी आणि पाकिटावर छापलेले लेबल तपासावे. स्थानिक हवामान, बियाणे स्वच्छ, रोगमुक्त आणि एकसमान आकाराचे असावे. कचरा, खराब बियाणे किंवा  कीड नसावी. बियाण्याला बीजप्रक्रिया केली आहे का? असल्यास कोणत्या औषधाची केली आहे ते तपासा, नसल्यास कोणत्या औषधाची बीजप्रक्रिया करावी, याचा सल्ला कृषीतज्ज्ञांकडून घ्या. अंतिम तारीख पूर्ण झालेले बियाणे खरेदी करू नये, कारण त्याची उगवण क्षमता कमी असते. खरेदीचे अधिकृतचे पक्के बिल घ्या, जेणेकरून तक्रार असल्यास पुरावा मिळेल.

              हायब्रिड बियाणे घेतल्यास त्याच्या लागवडीसाठी विशेष काळजी आणि खते याची माहिती घ्या. खरेदी केलेले बियाणे कोरड्या आणि थंड ठिकाणी साठवा, जेणेकरून त्याची गुणवत्ता टिकेल. शक्य असल्यास स्थानिक कृषी अधिकारी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बियाणे निवडा. विकत घेतलेल्या बियाण्याचे पाकीट आणि बिल जपून ठेवावे. विकत घेतलेल्या बियाणांची पाकिटे, अधिकृत बिल आणि थोडेफार बियाणे हंगाम संपेपर्यंत राखून ठेवावे. जेणेकरून तक्रार करावयाची झाल्यास पुरावे म्हणून ग्राह्य मानले जातात. पेरणीच्या वेळेस बियाण्याची पिशवी शिलाई केलेल्या बाजूने न फोडता खालील बाजूने फोडावी. जेणेकरून पिशवीवरील टॅग व लेबल चांगले राहतील व ते टॅग आणि लेबल सांभाळून ठेवावे. या गोष्टींची काळजी घेतल्यास चांगल्या प्रतीचे बियाणे मिळेल आणि पिकाचे उत्पादन वाढेल.

शेतकरी बांधवांनी स्वस्त बियाण्यांच्या अमिषाला बळी न पडता अधिकृत कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करावेत. त्याची पावती घेऊन तो जपून ठेवावी. शेतकऱ्यांच्या बियाणेसंदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी म्हटले आहे.

००००००

Tuesday, 6 May 2025

तक्रार समिती स्थापन करून पोर्टलवर माहिती देणे बंधनकारक

 

तक्रार समिती स्थापन करून पोर्टलवर माहिती देणे बंधनकारक

Ø कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम

चंद्रपूर, दि. 6 मे : जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी आस्थापना जिथे 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी (महिला व पुरूष मिळून) कार्यरत आहे, अशा ठिकाणी, महिलांचे लैंगिक छळापासून सरंक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून याबाबतची माहिती SHE BOX PORTAL वर नोंदविणे बंधनकारक आहे.

प्रत्येक खाजगी आस्थापना, कंपनी, एम.आय.डी.सी. मॉल, शैक्षणिक संस्था, दुकाने, बँक, अशासकीय संस्था, ट्रस्ट, सोसायटी, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री, करमणुक, क्रीडा संकुले, प्रेक्षागृहे, आरोग्य सेवा देणारे आदींनी त्यांच्या आस्थापनेवर तक्रार समितीची स्थापना करावी तसेच व त्याबाबतची माहिती पोर्टलवर नमुद करावी. सदर माहिती नोंदविण्याकरीता https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे Private Head Office Registration या Tab वर click करावे. आवश्यक सर्व माहितीचा तपशील भरून Submit या Tab वर click करून अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविता येईल.

अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखाद्या मालकाने अ) अंतगर्त तक्रास समिती स्थापन केली नाही ब) अधिनियमातील कलम 13, 14 व 22 नुसार कार्यवाही केली नाही क) या अधिनियमातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदाऱ्याचे पालन न केल्यास मालकास 50 हजार रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच हा प्रकार पुन्हा घडल्यास आस्थापनेचा परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतुद आहे.

करीता सर्व, खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापना करून त्याबाबतीची माहिती SHE BOX PORTAL वर भरण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. याबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास दूरध्वनी क्रमांक. 011-23388074  किंवा ई मेल - techsupport-shebox@gov.in येथे संपर्क करावा, असे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती

इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती

चंद्रपूर, दि. 6 मे : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यूएस रँकिंग (जगभरातील 200 च्या आत विद्यापीठांची क्रमवारी) अंतर्गत परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये सन 2025-26 मध्ये प्रवेश घेतलेल्या 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय, अभ्यासक्रमनिहाय जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी www.obcbahujankalyan.maharashtra.gov.in किंवा https://.obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करावा तसेच परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रासह 17 मे 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सक्षम किंवा पोस्टाने सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे दोन प्रतित सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.

००००००

जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक

 




जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक

चंद्रपूर,दि. 6 मे :    चंद्रपूर जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, महानगर पालिकेचे उपायुक्त संदिप चिद्रवार, परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे, पोलीस निरिक्षक (वाहतूक प्रविण पाटील), शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक यांचे प्रतिनिधी, सर्व तालुक्यातील शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य / मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी, स्कूल बस संघटनेचे प्रतिनिधी, ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये सर्व स्कुल बसधारकांना व संबंधित शाळा व्यवस्थापन यांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या.

              स्कूल बस मालकाने सुट्टीच्या कालावधीमध्ये सर्व स्कूल बस वाहनाचे मेन्टनन्स करावे. फिटनेस मुदतीत असेल तरी वाहन तपासणीसाठी आरटीओ कार्यालयाकडे सादर करावे. त्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये तपासणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. प्रत्येक स्कूल बसला सीसीटीव्ही लावावेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिका-यांच्या माध्यमातून पब्लिक ट्रान्सपोर्टने किती विद्यार्थी येतात, याबाबतची माहिती वाहतूक शाखा तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करावी.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता, बस थांब्यावर बस थांबविण्यात यावे, वाहनांचे मेन्टनन्स नियमित करावे, वाहनाचे पार्किंग योग्य ठिकाणी करावे. बस चालकाने मद्यपान करून वाहन चालवु नये, आसनक्षमतेचे उल्लंघन करू नये, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूलबस नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे, मुलींची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये महिला मदतनिस असणे बंधनकारक आहे. सर्व शाळांनी शालेय परिवहन समितीची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेची खात्री करावी. अनाधिकृत ऑटोमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये,

विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयक काही सुचना गोपनियरित्या घ्यावयाच्या असल्यास वाहतूक पोलीस निरिक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधिक्षक यांना देऊ शकतात. अशा व्यक्तिचे नाव गुप्त ठेवण्यात येइल, असे पोलिस अधिक्षक यांनी सांगितले.

००००००