Search This Blog

Friday, 9 May 2025

सफाई कर्मचा-यांचे प्रश्न संवेदनशीलपणे सोडवा - शेरसिंग डागोर



 सफाई कर्मचा-यांचे प्रश्न संवेदनशीलपणे सोडवा - शेरसिंग डागोर

चंद्रपूर, दि. 9 मे : सफाई कर्मचारी हा अतिशय गरीब वर्ग आहे. शहर स्वच्छतेत त्याची मोलाची भुमिका असते. तो आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करतो. या कामाच्या भरोश्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छतेचे पुरस्कार मिळतात. त्यामुळे सफाई कर्मचा-यांच्या कामाची जाणीव ठेवून अधिका-यांनी त्यांच्या अडीअडचणी सकारत्मकतेने आणि संवेदनशीलपणे सोडवाव्यात, अशा सुचना राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग डागोर यांनी केल्या.

सफाई कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांबाबत नियोजन सभागृह येथे आज (दि.9) घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, आदी उपस्थित होते.

कोरोना काळात जीवावर उदार होऊन सफाई कर्मचा-यांनी अहोरात्र काम केले, असे सांगून श्री. डागोर म्हणाले, विविध आस्थापनांमध्ये वारसान तत्वावर सफाई कर्मचा-यांच्या नोकरी संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन त्यांना रुजू करून घ्यावे. शासन निर्णयानुसार नियुक्तीची जी मुदत आहे, त्या कालावधीत सफाई कर्मचा-यांना नियुक्ती देणे बंधनकारक आहे. श्रमसाफल्य योजनेंतर्गत सफाई कर्मचा-यांच्या घरकुलासाठी प्रस्ताव घेऊन त्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत. तसेच जमिनीचे पट्टेसुध्दा देण्यात यावे.

पुढे ते म्हणाले, सफाई कर्मचा-यांची नियमितपणे आरोग्य तपासणी करावी. त्यासाठी महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ देऊन त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शासनाच्या इतरही योजनांचा लाभ सफाई कर्मचा-यांना द्यावा. एखाद कर्मचारी निवृत्त झाला तर त्याचे सर्व लाभ वेळेवर मिळाले पाहिजे, उगाच यात अडचणी निर्माण करू नये. सफाई कामगारांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी जिल्हास्तरावर एक समितीचे गठन करावे. तसेच यात अशासकीय सदस्यांचा समावेश असावा, अशा सुचना अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केल्या.

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, नुतन सावंत यांच्यासह सर्व नगर पालिका नगर पंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

००००००

मान्सुनपूर्व तयारी अतिशय गांभिर्याने करा

 



मान्सुनपूर्व तयारी अतिशय गांभिर्याने करा

Ø जिल्हाधिका-यांचे संबंधित यंत्रणेला निर्देश

चंद्रपूर, दि. 9 मे : आगामी काही दिवसांत मान्सुनला सुरवात होणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीसाठी सध्या आपल्याजवळ 15 ते 20 दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत सर्व यंत्रणांनी मान्सुनपूर्व तयारी अतिशय गांभिर्याने करून घ्यावी. तसेच आपापल्या कार्यक्षेत्रात सर्वांनी अलर्ट राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

नियोजन भवन येथे गुरुवारी मान्सुनपूर्व बाबींचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद / नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व इतर यंत्रणेचे विभागप्रमुख उपस्थित होते.

मान्सुनपूर्व तयारीचा भाग म्हणून सर्व तहसीलदारांनी तालुका यंत्रणेच्या अधिका-यांसोबत पूरप्रवण भागाचे योग्य नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आपल्या परिसरात कोणतीही अनुचित घटना घडली तर आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तसेच सर्व यंत्रणेचे दूरध्वनी क्रमांक अपडेड ठेवावे. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आपापल्या तालुक्यात असलेल्या साधनसामुग्रीची आताच दुरुस्ती करून घ्यावी. तालुका यंत्रणेने जिल्हा नियंत्रण कक्षासोबत नियमित संपर्क ठेवावा. पूरप्रवण गावात आत्तापासूनच आश्रयस्थाने शोधून ठेवावी व त्याची दुरुस्ती करून सर्व मूलभूत सुविधा राहील याची काळजी घ्यावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी पूर पिडीतांना ठेवण्यात येणा-या आश्रय ठिकाणांची आताच पाहणी करून तेथे पिण्याचे स्वच्छ पाणी, लाईट, पंखे, शौचालय आदी व्यवस्था चांगल्या ठेवाव्यात.

पूर परिस्थितीमध्ये सात रोग पसरणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने घ्यावी. त्यासाठी औषधीसाठा तसेच सर्पदंशाच्या औषधी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध ठेवावा. पुराच्या वेळी किंवा सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर नागरिकांना पर्यटन स्थळ जाण्यासाठी बंदी घालावी. त्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावावे. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची, काळजी घ्यावी. पुढील एक महिन्यात सर्व अपदा मित्रांचे प्रशिक्षण घ्यावे.

पूरामुळे किंवा आपत्तीमुळे स्थानिक स्तरावर कोणतेही नुकसान झाले तर कृषी, महसूल व संबंधित विभागाने त्याची त्वरित रिपोर्टिंग जिल्हा मुख्यालय करणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करावे. तालुका स्तरावरील नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवावा. तसेच सर्व नगरपालिका /नगरपंचायतींनी अग्निशमन सेवा चोख ठेवावी. तालुकास्तरावरील सर्व यंत्रणांची तहसीलदार यांनी बैठक घ्यावी. पूर परिस्थितीमध्ये पुराची दैनंदिन माहिती, धरणाची पातळी, पाणीसाठा व इतर गोष्टी अतिशय काटेकोरपणे जिल्हा मुख्यालय कळवणे आवश्यक आहे. त्यासाठी एक जबाबदार नोडल अधिकारी नियुक्त करावा, अशाही सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागांचे प्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.

०००००

शेतक-यांना मोफत गाळ वाटप सुरू


 शेतक-यांना मोफत गाळ वाटप सुरू

Ø इरई नदी खोलीकरण अभियान

चंद्रपूर, दि. 9 मे : इरई नदी ही चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी आहे. शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या या नदीच्या खोलीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. निरंतर 45 दिवस सुरू राहणा-या या अभियानसाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असून नदीच्या खोलीकरणातून निघणारा गाळ शेतक-यांना मोफत देण्यात येत आहे.

ज्या शेतक-यांनी गाळासाठी नोंदणी केली आहे, त्यांना मोफत गाळ वाटपाचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. ऑनलाईन पध्दतीने 24 शेतक-यांची नोंदणी झाली आज शेतक-यांना 70 ब्रास गाळ मोफत उपलब्ध करून देण्यात आला. सदर गाळ नेण्याकरीता वाहनाची व्यवस्था शेतक-यांना स्वत: करायची आहे.  सद्यस्थितीत अम्युझमेंट पार्क जवळ आणि महर्षी विद्या मंदीर शाळेमागे खोलीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी विविध विभाग आणि खाजगी असे एकूण 21 ट्रॅक्टर, 17 हायवा / टिप्पर, 7 पोकलेन मशीन आणि 1 जेसीबी कार्यरत आहेत. ही यंत्रसामुग्री वाढविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.

चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या 17 कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल, या उद्देशाने 25 एप्रिल 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.

इरई नदी खोलीकरण मोहिमेत शासनाच्या जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन,वन विभाग,चंद्रपूर महानगरपालिका,कृषी विभाग,पाटबंधारे विभाग,भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा खनिकर्म, प्रादेशिक परिवहन विभाग,पाटबंधारे विभाग,महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ ही सर्व शासकीय कार्यालये, सीटीपीएस व डब्ल्युसीएल या खाजगी आस्थापना भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे.

००००००

ब्लॅकआऊट किंवा युध्दासंदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका

 


ब्लॅकआऊट किंवा युध्दासंदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका

Ø जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 9 मे : सद्यस्थितीत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण बघता विविध माध्यमातून ब्लॅकआऊट किंवा युध्दासंदर्भात येणा-या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना केले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार या संदर्भातील अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नागरिकांना आश्वस्त केले.

युध्दजन्य परिस्थिती, मॉक ड्रील, ब्लॅकआऊट संदर्भात वृत्तांकन करणारे विविध प्रसारमाध्यमे किंवा सोशल मिडीयातून विविध प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ प्रसारीत करण्यात येतात. सदर बाबी अधिकृतच असेल याची खात्री देता येत नाही, किंबहुना ते पूर्वीचेसुध्दा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे युध्द किंवा ब्लॅकआऊट संदर्भातील प्रशासनाकडून आलेली माहितीच अधिकृत समजावी. तसेच या संवेदनशील काळात सोशल मिडीया हाताळतांना जबाबदारीचेसुध्दा भान ठेवावे. आपल्याकडून अफवा पसरणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

००००००

10 मे रोजी पालकमंत्री यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

10 मे रोजी पालकमंत्री यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 9 मे : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 10 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

10 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजता मुल येथे शोभाताई फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट, सकाळी 10 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव, सकाळी 11 ते 1 नियोजन भवन येथे खरीप हंगामपुर्व आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 1 वाजता राखीव, दुपारी 1.30 वाजता वन अकादमी येथे ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमाला उपस्थिती, दुपारी 2.30 वाजता वन अकादमी येथे जलसंपदा / पाटबंधारे विभागाच्या आढावा बैठकीला उपस्थिती, दुपारी 3 वाजता स्व. कन्नमवार सभागृह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे पुस्तक प्रकाशन सोहळा व कवी संमेलनास उपस्थिती, दुपारी 3.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

००००००