Search This Blog

Friday 24 July 2020

शेती नियोजनामध्ये हवामान सल्ला उपयुक्त : डॉ.उदय पाटील

शेती नियोजनामध्ये हवामान सल्ला उपयुक्त : डॉ.उदय पाटील
शेतकऱ्यांनी अवलंब करावा हवामान आधारित कृषी सल्ला
चंद्रपूर,दि. 24 जुलै: कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सविस्तर हवामानाचा अंदाज आणि हवामान आधारीत पीकनिहाय कृषी सल्ला देण्यात येतो. दैनंदिन शेतीचे काम करताना हवामान आधारित कृषी सल्ला शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान आधारित कृषी सल्ला अंमलात आणून पुढिल शेतीची कामे करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवसात सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांची भात रोपे 21 ते 25 दिवसांची झाले असल्यास त्यांनी भात पिकाच्या रोवणीस सुरुवात करावी.
धान- रोपवाटिका ते पुर्नलागवड :
पुर्नलागवड झालेल्या धान पिक वाढीच्या प्राथमिक अवस्थेत 2 ते 3 सेंमी व फुटवे फुटण्याच्या अवस्थेत 3 ते 5 सेंमी पाण्याची पातळी ठेवावी. धान पिकात रोपवाटिके वर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास डायक्लोरोवास 76 ई.सी. 12.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोपवाटीकेवर फवारणी करावी.
धान रोपवाटीकेवर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळण्याची शक्यता आहे. तरी त्याच्या व्यवस्थापनासाठी कार्बनडेन्झीम 50 टक्के डब्ल्यू पी 10 ग्रॅम किंवा म्यान्कोझेब 75 टक्के प्रवाही यांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी 10 लिटर पाण्यात मिसळून लागवडीनंतर 10 दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
 ज्या शेतकऱ्यांची भात रोपे 21 ते 25 दिवसांची झाली असल्यास त्यांनी भात पिकाच्या रोवणीस सुरुवात करावी. त्यासाठी रोपे काढण्याच्या दोन दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडी वाढवावी. त्यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे काढण्यास मदत होते. रोपांची लावणी 20 सें.मी.× 15 सें.मी अंतरावर प्रत्येक चुडात 2 ते 3 रोपे सरळ व उथळ म्हणजेच 2 ते 4 सेंटीमीटर खोलवर लावावीत. पूर्व मशागत केलेल्या धानाच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करावी. चिखलणी केल्यानंतर शेत समपातळीत येण्यासाठी पाटी फिरवावी. चिखलणी करताना स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खताची शिफारस केलेली पूर्ण मात्रा 50 किलो स्फुरद म्हणजेच डीएपी 110 किलो + 50 किलो पालाश म्हणजेच एमओपी 85 किलो प्रति हेक्‍टरी व नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा  50 किलो नत्र म्हणजेच  किलो युरिया प्रति हेक्‍टरी शेतात मिसळावी व शेतातील पाणी बांधून ठेवावे.
तूर वाढीच्या अवस्था :
पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यांच्या निरीक्षणासाठी कामगंध सापळे लावावेत व नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. धान बांधीच्या धुऱ्यावर तूर पिकातील आंतरमशागतीची कामे पूर्ण करून घ्यावे.

कापूस वाढीच्या अवस्था:
रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अॅसिटामीप्रीड 20 टक्के एसपी 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. शेंदरी बोंडअळीच्या निरीक्षणासाठी प्रति हेक्‍टरी 8 कामगंध सापळे लावावेत. कपाशी पिकामध्ये पहिले 9 आठवडे तणविरहित ठेवावे.
सोयाबीन वाढीच्या अवस्था:
सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा किंवा पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यांच्या निरीक्षणासाठी हेक्‍टरी 8 कामगंध सापळे लावावेत. नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा ट्रायझोफोस 40 टक्के 12.5 मि.ली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मिरची पुर्नलागवड:
मिरची रोपांच्या लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे डायमेथोएट 30 टक्के 10 मि.लि अधिक पाण्यात मिसळणारे गंधक (80 टक्के) 3 ग्रॅम अधिक मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम एक लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लावावे. रोपांची लागवड कोरडवाहू पिकासाठी 60×45 सेमी व ओलिताच्या पिकासाठी 60×60 सेमी अंतरावर करावी. संकरित जातीसाठी 90×60 सेमी अंतर ठेवावे.
खते शेतात जमिनीवर फेकून न देता पेरून द्यावेजेणेकरून ते योग्य पद्धतीने पिकांना लागेल व पिकांना त्याचा फायदा होईल. खतांचा मर्यादित वापर होईल त्यासोबतच कीटकनाशकाची फवारणी करताना नोझलने पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करावी, कारण कीड ही पानाच्या खालच्या बाजूने राहत असते. 
00000

No comments:

Post a Comment