आकांक्षा उपक्रमाच्या माध्यमातून अमरावती व नागपूर विभागातील युवती व महिलांकरीता निवासी प्रशिक्षण
चंद्रपूर, दि. 2 ऑगस्ट : वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासामुळे औद्योगिक आस्थापनांमध्ये अद्ययावत कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची गरज सतत भासत असते. बदलत्या काळाची ही गरज लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने केंद्र राज्य पुरस्कृत “संकल्प” योजनेअंतर्गत अमरावती व नागपूर या महसूली विभागातील 200 युवती व महिलांकरिता नवगुरुकुल फाउंडेशन फॉर सोशल वेल्फेअर या संस्थेद्वारे ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग चे 18 महिन्यांचे नि:शुल्क निवासी प्रशिक्षण श्री. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी, अमरावती येथे पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यास मान्यता दिली आहे.
या प्रशिक्षणाकरिता कोणत्याही शाखेतून 12 वी, आयटीआय किंवा पॉलिटेक्निकचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अमरावती किंवा नागपूर विभागाच्या जिल्ह्यातील युवती व महिला पात्र असतील. सदर प्रशिक्षण 17 ते 18 वर्ष वयोगटातील महिला व युवतींसाठी राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीची निवड जिल्हाधिकारी व नवगुरुकुल फाउंडेशन यांनी प्रमाणित केलेल्या विहित निवड प्रक्रियेद्वारे करण्यात येणार असून याकरीता सर्वप्रथम चाळणी परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम इयत्ता 6वी पर्यंतचे इंग्लिश व इयत्ता 8वी पर्यंतचे गणित यावर आधारित आहे. विद्यार्थी सदर परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने देऊ शकतात.
ऑफलाइन परीक्षा रविवार दि. 7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत अमरावती व नागपूर विभागातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. यासाठी https://docs.google.com/forms/
उपरोक्त चाळणी परीक्षेत पात्र ठरलेल्या युवती व महिलांची पुढील परीक्षा नवगुरुकुल संस्थेद्वारे दूरध्वनीवरून घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम इंग्लिश मौखिक मुलाखत व 10वी पर्यंतचे गणित असा असेल. शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या आणि पालकांच्या मुलाखती घेतल्या जातील ज्याद्वारे महिला व युवतींची अंतिम निवड करण्यात येईल. प्रशिक्षणार्थीची प्रशिक्षणाची व निवासाची सोय पंजाबराव देशमुख प्रबोधिनी, अमरावती येथे करण्यात येणार आहे.
18 महिन्याच्या निवासी कार्यक्रमांमध्ये महिलांना तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच सॉफ्टवेअर कोडींग आणि प्रोग्रामिंग, इंग्लिश स्पिकिंग आणि नेतृत्व गुण शिकवले जातील. ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व प्रमाणपत्रधारक प्रशिक्षणार्थींना सॉफ्टवेअर कोडर, फॉन्टेड डेव्हलपर यासारख्या महत्त्वकांक्षी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल.
०००००
No comments:
Post a Comment