शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेकरीता आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक
Ø मयत खातेदारांच्या बाबतीत बँकेत वारस लावण्याची प्रक्रिया पुर्ण करण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि.3 नोव्हेंबर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनाची अंमलबजावणी सुरू असून पात्र लाभार्थ्याची पहिली यादी शासनाचे पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्या पात्र शेतक-यांची नावे यादीत आहेत, त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मय्यत खातेदारांच्या बाबतीत त्यांच्या वारसांनी संबंधित संस्थेत/बँकेत वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, प्रशांत धोटे यांनी केले आहे.
सदर योजनेच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यत बँकामार्फत योजनेच्या पोर्टलवर याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. एकूण 67811 शेतक-यांपैकी 13845 लाभार्थ्यांची पहिली यादी शासनाने पोर्टलवर
प्रसिध्द केली आहे. यातील 12970 शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण पुर्ण केले असून 11205 शेतकऱ्यांच्या खात्यात 47.62 कोटी रूपये जमा करण्यात आले आहे. तसेच 515 शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नसल्यामुळे त्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही. यात प्रामुख्याने बँकनिहाय बँक ऑफ इंडिया -60, बँक ऑफ महाराष्ट्र-19, सेंट्रल बँक ऑफ इंडिया -2, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक-365, एसडीएफसी-5, आयडीबीआय-7, इंडियन बँक-6, स्टेट बँक ऑफ इंडिया-27, पंजाब नॅशनल बँक -1, विदर्भ कोकण ग्रामीण बँक-21, यवतमाळ जिमस बँक-1 इतक्या बँक खातेदाराचा समावेश आहे.
सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक असून शेतक-यांना संबंधित बँकामार्फत सदर प्रोत्साहनपर योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही शक्य होणार आहे. याकरीता त्वरीत सीएससी केंद्रे / महाऑनलाईन केंद्रे / संग्राम केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. पात्र लाभार्थ्यांच्या यादीत ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण शक्य नाही, असा पर्याय निवडून तक्रार केली असेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्डची स्वसाक्षांकीत छायाप्रत, तक्रार नोंदणीच्या पावती व बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायाकिंत प्रतीसह संबंधित तहसिल कार्यालय अथवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयास संपर्क करून तक्रार निवारण संबंधित तालुकास्तरीय समितीकडून करून घ्यावे.
ज्या शेतकऱ्यांनी आधार क्रमांक अमान्य अशी तक्रार नोंदवलेली असेल तर त्यांनी आपल्या आधार कार्डची स्वसाक्षांकीत छायाप्रत, तक्रार नोंदणीच्या पावती व बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायाकिंत प्रतीसह संबंधित बँकेच्या शाखेत किंवा संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयास जमा करावेत. त्याचप्रमाणे पोर्टलवरील प्रसिध्द केलेल्या पहिल्या यादीत मयत खातेदाराचे नाव असल्यास मयत खातेदाराच्या नातेवाईक अथवा कायदेशीर वारसांने आधार प्रमाणीकरण न करता प्रथम कायदेशीर वारसाने त्याची संपूर्ण माहिती संबंधित संस्थेस, बँक शाखेस पुरवावी व बँकेच्या नियमाप्रमाणे वारस लावण्याची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून वारसाची नोंद करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment