Search This Blog

Thursday, 14 August 2025

तिरंगा बाईक रॅलीतून देशभक्तीचा जागर

 






तिरंगा बाईक रॅलीतून देशभक्तीचा जागर

Ø जिल्हा प्रशासन व महानगर पालिकेचे आयोजन

Ø नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग

चंद्रपूर, दि. 14 : नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान, देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा ज्वाजल्य इतिहासाचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे, या उद्देशाने शासनामार्फत हर घर तिरंगाअभियान राबविण्यात येत आहे. तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि महानगर पालिकेच्या वतीने शहरातून तिरंगा बाईक रॅली काढून देशभक्तीचा जागर करण्यात आला.

            यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीला रवाना केले. प्रियदर्शिनी सभागृहापासून सुरू झालेली ही बाईक रॅली शहरातून जनता कॉलेज चौक - सावरकर चौक - बंगाली कॅम्प, बसस्थानक मार्गे परत येऊन प्रियदर्शिनी सभागृह येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

            याप्रसंगी डॉ. व्यवहारे म्हणाले, ‘हर घर तिरंगाअभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, झेंडा रॅली याद्वारे नागरिकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य आणि देशभक्तीची भावना निर्माण करणे, स्वातंत्र्यासाठी आपल्या पुर्वजांनी काय यातना सोसल्या याची जाणीव करून देणे, हे प्रमुख उदिृष्ट आहे. तसेच चंद्रपूर शहरात आज तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात शासकीय अधिकारी कर्मचा-यांसह नागरिकही सहभागी झाले आहेत.

            मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, ‘हर घर तिरंगाअभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. तिरंगा बाईक रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला असल्याचे त्यांनी सांगितले. तर मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, ‘हर घर तिरंगाहा केवळ एका वर्षाचा कार्यक्रम नाही तर जनमानसाने हा उपक्रम नेहमीसाठीच स्वीकारला आहे. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुध्दा तिरंगा बाईक रॅलीतून राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात येत आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावावा तसेच 15 ऑगस्ट रोजी सुर्यास्तापूर्वी हा राष्ट्रध्वज काढावा, असे आवाहन त्यांनी केले.

            सदर रॅलीमध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, युवक-युवती, खेळाडू तसेच  नागरिकांनी सहभाग नोंदविला.

०००००

No comments:

Post a Comment