Search This Blog

Thursday, 9 November 2017

चंद्रपूर महानगरात जिल्हा रूग्णालय परिसरात लवकरच अमृत दीनदयाल जेनेरीक फार्मसी सुरू होणार - ना. हंसराज अहीर


चंद्रपूर दि.9 नोव्हेंबर-  स्वस्थ भारताची संकल्पना साकार करण्यासाठी, लोकांच्या जीवनात आनंद व चेह-यावर हसू आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून नवा उपक्रम हाती घेण्यात आला असून ‘अमृत दीनदयाल वैद्यकीय शॉपच्या माध्यमातून जनसामान्यांना अल्पदरात औषधी उपलब्ध करण्यासाठी देशभरात 84 औषधी दुकाने सुरू करण्यात आली असून चंद्रपूर महानगरात येत्या 25 डिसेंबर रोजी या औषधी दुकानाचा शुभारंभ करण्याचा मानस होत असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री  हंसराज अहीर यांनी शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये  दिली. 
सदर बैठकीस भारत सरकार अंगीकृत एचएलएल लाईफ केअर लिमी.चे वरीष्ठ प्रबंधक रेजी क्रिष्णा यु., चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. एम.जे. खान यांची उपस्थिती होती. 
या बैठकीत ना. हंसराज अहीर यांनी सांगितले की, सदर मेडिकल स्टोअर्स 24 तास रूग्णसेवेत उघडी राहणार असून या स्टोअर्समधून सर्वच आजावरील औषधी अल्प दरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात सुरू होत असलेल्या अमृत दीनदयाल मेडिकल्समध्ये एकूण 5 काऊंटर्स असणार आहेत. ज्यात 10 तज्ज्ञ केमिस्टांची नियुक्ती केली जाणार आहे. या मेडिकल शॉपमध्ये कंपनीद्वारा थेट जेनेरिक औषधींचा पुरवठा केला जाणार आहे. आपातकालिन परिस्थितीत रूग्णांना तातडीने औषधी पुरवठा होईल या अनुषंगाने सुध्दा या मेडिकल स्टोअर्समधून दक्षता घेतली जाणार आहे. 
अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर्स 18 राज्यात केंद्र शासित प्रदेशांसह स्थापित झाले असून गुजरातमध्ये या स्टोअर्सची संख्या 52 आहे. महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी हे जेनेरीक औषधी केंद्र सुरू असून राज्य सरकार या केंद्राची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. दिल्लीत 4, चंदिगड 5, आसामात 7 व अन्यत्र मोठया प्रमाणात अमृत दीनदयाल मेडिकल्स सुरू असून या मेडिकल स्टोअर्समुळे सुलभ व अत्यल्प दरात औषधी उपलब्ध करण्यात येत आहे, अशी माहितीही ना. अहीर यांनी या बैठकीमध्ये दिली. 
31 जुलै 2017 पर्यंत देशातील सुमारे 30 लाख 68 हजार रूग्णांना अमृत अंतर्गत सेवा देण्यात आली आहे. 123 करोड 76 लाख रूपयांची औषधी या तारखेपर्यंत खरेदी करण्यात आले असून या औषधांमुळे 164 करोड 10 लाख रूपयांची बचत झाली असल्याचेही या बैठकीमध्ये सांगण्यात आले.
000

Monday, 6 November 2017

शेतक-यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा ठरतेय आधार चंद्रपूर जिल्हयात 44 शेतक-यांना 88 लाखांचे वाटप

चंद्रपूर, दि.3 नोव्हेंबर- राज्य सरकारने शेतक-यांच्या उत्पन्न वाढ, कर्जमाफी, शाश्वत शेती या विविध योजनांसोबत त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अघटीतांमध्येही साथ देण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना सुरु केली आहे. या योजनेतून जिल्हयातील 44 शेतकरी कुटुंबाला 88 लाखांची मदत झाली आहे.
शेतकरी कुटुंबावर झालेल्या कुठल्याही नैसर्गिक आघातामध्ये शासनाच्या कृषी विभागाकडून ही मदत मिळते. यासाठी शेतक-यांनी नजीकच्या तालुका कृषी अधिका-यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. आपल्या असपासच्या शेतकरी कुटुंबात अपघात किंवा नैसर्गिक आघात झाल्यास त्यांना मदतीसाठी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हयात 88 लाखाची मदत 
दुर्दैवाने अपघात होवून बळीराज्याच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. अशावेळी कुटूंबप्रमुख बळीराजा जर दगावला किंवा अपंग झाला, तर कुटूंब आर्थिक संकटात सापडते. या परिस्थितीत शेतक-यांच्या कुटूंबाला मोठ्या हिंमतीने सावरावे लागते.  दुर्दैवाने अपघात झाल्यास राज्य शासनातर्फे स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतंर्गत विम्याची मदत दिली जात आहे. त्यासाठी शासनाने सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा उतरविला आहे. त्यामुळे शेतकरी कुटूंबाला अशा प्रसंगी विम्याची हमखास मदत मिळणार आहे. जिल्ह्यात सन 2016 मध्ये 93 मृत शेतक-यांचे प्रकरण या प्राप्त झाले होते. त्या 44 मृत शेतकऱ्यांच्या वारसांना योजनेतंर्गत 88  लक्ष रूपयांची मदत देण्यात आली आहे. तर 10 प्रकरणे नामंजूर करण्यात आले असून 39 प्रकरणे शेतक-यांकडून कागदपत्राची पूर्तता होण्यासाठी प्रलंबित आहे.

कसा मिळतो लाभ !
या योजनेतंर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लक्ष रूपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी  झाल्यास एक लक्ष रूपये मदत  दिल्या जाणार आहे. या लाभासाठी लाभार्थ्यांकडे सात बारा प्रमाणपत्र, 6 क, 6 ड (फेरफार) आदी पात्रता असावी.  
विमा संरक्षणासाठी रस्ता/रेल्वे अपघात, उंचावरून पडणे, बुडून मृत्यू, सर्पदंश, प्राणीदंश, खून, जनावराचा हल्ला, दंगल, वीज पडणे, विषबाधा, नक्षलवादी हल्ला व इतर अपघात आदींमधील अपघातांचा समावेश आहे. विम्याचा दावा करण्यासाठी दावा पत्र, वारसा नोंद, शेतकऱ्याचा वयाचा पुरावा, पोलीस (एफ आय आर) किंवा जवाब, बँक पासबुक प्रत, सातबारा उतारा, तलाठी प्रमाणपत्र, 6 ड (फेरफार), उतारा 6 क, शव विच्छेदन अहवाल, पोलीस स्थळ पंचनामा, अपंगत्व आल्यास टक्केवारी प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, मृत्यू प्रमाणपत्र व पोलीस मरणोत्तर पंचनामा आदी कागदपत्रे आवश्यक आहे. राज्यातील जवळपास 1.37 कोटी खातेदार शेतकऱ्यांचा विमा शासनाने उतरविला आहे. विम्याचा हप्ताही कंपनीकडे सुपूर्द करण्यात आला  आहे. दुर्देवाने अपघात झाल्यास अशा संकटसमयी केवळ कृषि कार्यालयात अर्ज भरून अपघातग्रस्त शेतकरी कुंटूंबीय विम्याची मदत मिळवू शकतात. एवढी सुटसुटीत लाभाची ही योजना आहे.  या योजेनंतर्गत जिल्हयात सन 2017 मध्ये आतापर्यंत 39 मृत शेतक-यांचे प्रकरणे प्राप्त झाले आहे. त्यामध्ये एक प्रकरण मंजूर करण्यात आला असून 17 परिपूर्ण प्रकरणे विमा कंपनीकडे पाठविण्यात आले आहे. तर 21 शेतक-यांची प्रकरणे त्यांच्याकडून कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.

कुठून मिळते मदत
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातानंतर लवकरात लवकर संबंधित जिल्हा/तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसहीत अर्जासह दावा दाखल करण्यात यावा. याकरिता कोणताही वकील किंवा एजंट नेमण्याची आवश्यकता नाही. तरी अपघातग्रस्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येते. या योजनेमुळे घरातील कर्ता पुरूष शेतकरी गेल्यामुळे हवालदील झालेल्या शेतकरी कुटूंबाला ही आर्थिक मदत जगण्याचे बळ देवून जाते.

0000

डिजीटल प्रमाणपत्र वाटप करण्यात चंद्रपूर विभागात पहिले ‘आपले सरकार’ ऑनलाईन वेबपोर्टला नागरिकांची पसंती

चंद्रपूर, दि.3 नोव्हेंबर- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शी शासन व्यवस्थेच्या आवाहानाला प्रतिसाद देत राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने सुरु केलेल्या ‘आपले सरकार’ वेबपोर्टलला चंद्रपूर जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पुढे आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकीकडे डिजीटल शाळा, हॅलो चांदा अशा पारदर्शी संपर्क यंत्रनांना बळकटी देणे सुरु केले असतानाच जिल्हयात महसूल विभागाने ऑनलाईन वेबपोर्टलच्या मार्फत    1 लाख 69 हजार डिजीटल प्रमाणपत्राचे वाटप केले आहे.
महाराष्ट्रामध्ये डिजीटल प्रमाणपत्राचे वाटप करण्यात ऑक्टोंबर महिन्यात यवतमाळ पहिल्या क्रमांकावर असून नाशिक पाठोपाठ चंद्रपूरने तीसरा क्रमांक पटकावला आहे. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा प्रथम ठरला आहे. नागरिकांनी ऑनलाईन सेवेचा अधिकाधिक फायदा घेऊन पारदर्शी प्रक्रियेला बळकट करावे, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे. चंद्रपूर जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात डिजीटल व्यवहाराला राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चालना दिली आहे. नव्या पिढीला संगणकाच्या माध्यमातून डिजीटल युगात सक्षम करण्यासाठी त्यांनी शाळांना पालकमंत्री संगणक प्रशिक्षण प्रयोग शाळेमार्फत बळकट करण्याचे धोरण अंवलबले आहे.
जिल्हयात डीजीटल इंडिया, डीजीटल महाराष्ट्र ह्या संकल्पनेची कास धरून चंद्रपूर जिल्ह्यातही महसूल विभागाने प्रगतीचे पाउल उचलले आहे. 2015 च्या महाराष्ट्र शासनाच्या सेवा हमी कायद्यानुसार आता नागरिकांना निर्धारित वेळेत सेवा देणे संबंधित विभागास बंधनकारक आहे. जर विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अर्जदार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे संबंधित सेवेसाठी अपील करू शकतात. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या वेबपोर्टलवर एकूण 39 विभागाच्या 399 सेवा प्रत्येक विभागाने सेवा अधिनियमानुसार अधिसूचित केलेल्या आहेत. त्यात महसूल विभाग, गृह विभाग, समाजकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, पंचायत राजविभाग, कामगार विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उर्जा विभाग, नगर विकास विभाग, सहकार विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग इत्यादींचा समावेश आहे. यातील महसूल विभागातील सेवांची अंमलबजावणी म्हणून नागरिकांना विविध सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचे मार्गदर्शनाखाली आपले सरकार पोर्टलचा जिल्ह्यात वापर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महसूल विभाग नागरिक सेवा उत्पन्न प्रमाणपत्र, वय, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, ऐपत प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असे 18 प्रकारचे प्रमाणपत्र संपूर्णतः ऑनलाइन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पूर्णपणे आपले सरकार या पोर्टलचा वापर करण्यात येत आहे. यामुळे नागरिक घरबसल्या आपल्या सोयीनुसार आपली विविध प्रकरणे, अर्ज ऑनलाईन सादर करू शकतात व आवश्यक त्या शुल्काचा भरणा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होतो. यात त्यांना कार्यालयात जायची गरज पडत नाही. यामुळे नागरिकांचा वेळ त्रास व पैसा वाचतो आहे. ऑनलाईनमुळे प्रकरणावर होणारी कार्यवाही व प्रलंबित अर्ज, निकाली अर्ज, त्रुटीतील अर्ज यांची माहिती मिळणे शक्य झाले आहे. संबंधित अर्जाचा सर्व प्रवास हा ऑनलाईनच होतो. यात अर्ज सादर करणे त्यावर संबंधित लिपीकाने पडताळणी करणे, सक्षम अधिकारी यांनी डिजिटल स्वाक्षरी करणे हे सर्व ऑनलाईन होत असल्यामुळे वेळ वाचून सर्व काम पेपरलेस होण्यास मदत होत आहे. या प्रत्येक टप्प्यावर अर्जदारास मोबईल वर एसएमएस संदेश जातो. त्यामुळे अर्जदारास त्याच्या अर्जाची माहिती मिळते जिल्यातील सर्व महसूल अधिकारी यांच्या एचएसएस बेस बायोम्याट्रिक स्वाक्षरी तयार करण्यात आल्या असून एकाच वेळी अनेक दाखल्यावर स्वाक्षरी करणे शक्य होऊन सर्व महसुली सेवा या नागरिकांना केवळ ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीने वेळेवर त्यांच्या लॉगीन मध्ये प्रमाणपत्र प्रत देण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील अतिदुर्गम अश्या जिवती तालुक्याचाही समावेश आहे. जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील तहसील सेतूचा सुध्दा यात समावेश आहे. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्याने 1 लाख 69 हजाराचेवर डिजिटल प्रमाणपत्रे नागरिकांना देऊन नागपूर विभागात प्रथम क्रमांकावर तर ऑक्टोबर महिन्यात 31 हजार 492 प्रमाणपत्रे देऊन राज्यात तीस-या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यातील वरोरा तालुका आतापर्यंत 34 हजार प्रमाणपत्र देऊन अग्रस्थानी आहे.
विविध नागरिक सेवा प्रमाणपत्रासाठी नागरिकांनी शासनाच्या आपले सरकार  https://aaplesarkar.mahaonline.gov.in/  या पोर्टलचा वापर करावा व हव्या असलेल्या प्रत्येक विभागाने सेवा अधिनियम 2015 व्दारे अधिसूचित केलेल्या नागरिक सेवा प्राप्त कराव्या. तसेच इतर सर्व विभागाच्या उर्वरित सेवा लवकरच ऑनलाईन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी  आशुतोष सलिल यांनी दिली आहे.
000

Wednesday, 1 November 2017

चंद्रपूर जिल्हयात पालकमंत्री संगणक प्रयोगशाळेच्या प्रशिक्षणाला प्रारंभ महाराष्ट्रातील पहिली ‘ऑनव्हील संगणक चळवळीला 6 तालुक्यातून सुरुवात



चंद्रपूर, दि.1 नोव्हेंबर- चंद्रपूरजिल्हयातील जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पंचायती, नगर परिषदांच्या शाळांची खासगी शाळांशी सुरु असलेल्या स्पर्धेला आणखी गती आली आहे. राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केलेल्या पालकमंत्री संगणक प्रशिक्षण प्रयोग शाळेला आजपासून सुरुवात झाली आहे. मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रशिक्षणाच्या बस रवाना करण्यात आल्या आहेत.
यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राम गारकर, सीएमफेलो निकीता निंबाळकर, ज्युबिली हायस्कुलचे प्राचार्य श्री.काळे उपस्थित होते. राज्यातील ही पहिली ऑनव्हील संगणक प्रशिक्षण चळवळ आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने शाळाशाळांमधील मुलांना याचा लाभ मिळणार आहे.
आज सकाळी 11 वाजता स्थानिक ज्युबिली हायस्कुलमध्ये या योजनेचा प्रत्यक्ष प्रारंभ झाला. टाटा ट्रस्टच्या वतीने यासंदर्भातील करार करण्यात आला असून विद्या प्रतिष्ठान पुणे या संगणक तंत्रज्ञान संस्थेकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या बसमधील संगणकाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतीच्या 951 शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणक हाताळण्याच्या प्राथमिक बाबी शिकविण्यात येणार असून प्रत्येक शाळेत एक तास हे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक शाळेमध्ये चार भेटी दिल्या जाणार आहेत. या मुलांना डिजीटल शाळेअंतर्गत यापूर्वीच संगणकाची तोंड ओळख झाली असून त्यांना संगणकासंदर्भातील अधिक माहिती या प्रशिक्षणातून दिली जाणार आहे. सुरुवातीला चार तालुक्यांमध्ये हा उपक्रम 1 नोव्हेंबरपासून पहिल्या 6 तालुक्यात हे प्रशिक्षण सुरु होणार आहे. यामध्ये चंद्रपूर, बल्लारपूर, जिवती, मुल, पोंभूर्णा व गोंडपिपरी तालुक्याचा समावेश आहे.                             
                                             पालकमंत्र्यांकडून शुभेच्छा !
दरम्यान आजच्या या पालकमंत्री संगणक प्रयोगशाळेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झाल्याबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळा दर्जेदार व्हाव्यात यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय असून उदयाचे संगणक अभियंते आणि संगणकासंदर्भातील ज्ञान असणारे कुशल मनुष्यबळ निर्मितीला यातून सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हा उपक्रम जिल्हा परिषद, महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
      0000

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा - ना.हंसराज अहीर


कृषी, मत्स्य उमेद,आत्मा आदी विभागाची घेतली बैठक

चंद्रपूर दि.31 ऑक्टोंबर- चंद्रपूर जिल्हृयातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबाच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शेतकऱ्यासाठी असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी  करण्यात यावी, तसेच बियाणे वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी,असे निर्देश  केंद्रीय  गृहराज्य मंत्री  हंसराज अहीर यांनी आज येथे दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीमध्ये त्यांनी आज कृषी, मत्स्यविभाग,आत्मा,उमेद आदी विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून शाश्वत शेतीचे महत्व सांगीतले आहे.त्यामुळे दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या योजनांच्या संदर्भात जागरुकतेने लक्ष घालवण्याचे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवार,शेततळे,विविध योजनेतून बंधारे,नाला खोलीकरण आदी योजना शेतकऱ्यांना कायम मदत करणाऱ्या असून याकडे आवर्जून लक्ष वेधावे,असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रपूर जिल्हयात फवारणी करताना विषबाधा झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत.या घटनाक्रमांची चौकशी करुन ज्यांना जीवीनहाणी झाली असेल अशांना शासकीय मदत तातडीने मिळेल,याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हयात शेतकत्यांसाठी भाजीपाला,दुग्ध उत्पादन,मत्स्यपालन आदी व्यवसायात शेतकरी येथील यासाठी त्यांना आत्मा,मार्फत योग्य प्रशिक्षण मिळावे,जोडधंदयात त्यांना आवड निर्माण व्हावी व प्रत्यक्षात या सर्वाची रोजगार निर्मितीत भर पडावी यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्ड व्हीजीट,वर भर दयावी,असे आवाहन त्यांनी केले.
औषधी व बियाणे विकी करतांना बंदी घातलेल्या व चुकीच्या बियाण्यांची विक्री होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवा.कठोर कारवाई करा.शेतकऱ्यांना यासाठी भुर्दड बसता कामा नये,असे आवाहन अहीर यांनी केले.
बचत गटामध्ये जिल्हयातील महिलांनी मोठया प्रमाणात कार्य केले आहे.बॅकॉची देणी वेळेवर चुकवली आहे.त्यामुळे महिला बचत गटांना बँक पतपुरवठा करण्यास तयार आहे.शेतीला पूरक असणाऱ्या अनेक योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढवावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीला आमदार नानाभाऊ शामकुळे, सभापती अर्चना जीवतोडे, दक्षाता समितीचे सदस्य खुशाल बोंडे,जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे शिवदास ,जिल्हा कृषी अधीक्षक हसनाबादे साहायक संचालक मगर, जिल्हा मत्स्य अधिकारी जांबुळे,यांच्यासह पं.स.सदस्य महेश टोंगे,प्रवीण ठेंगणे,राहुल सराफ, विजय वानखेडे,नरेंद्र जीवतोडे आदी  उपस्थित होते.
000000