Search This Blog

Tuesday, 6 May 2025

जमीन खरेदी बाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

जमीन खरेदी बाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Ø कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

 चंद्रपूर, दि. 6 मे : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व नवर्वाद्ध घटकांच्या दारिद्ररेषेखालील भुमिहीन कुटुंबाना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा म्हणून कसण्याकरिता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यायची आहे.

तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडुन शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2025-26 करिता अर्ज मागविण्यात येत आहे. जिरायत जमीन चार एकर व बागायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास सम्मती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज सादर करावेत. जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे : अर्जासोबत जमिनीचा 7/12, गाव नमुना आठ, परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र, अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ, पत्नी, मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी ना-हरकत व सम्मती प्रमाणपत्र.

 

विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. जमिनीच्या खरेदी प्रक्रीयेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीनबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टँप पेपरवर शपथपत्र व हमीपत्र जोडण्यात यावे.

सदर प्रस्ताव 31 मे 2025 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे, असे आवाहन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, यांनी केले आहे.  

००००००

अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी मार्जिन मनी' योजना

 अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी मार्जिन मनी' योजना

चंद्रपूर. दि, 6 मे : केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया' योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरुणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देण्याबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक तरुणांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 'स्टँड अप इंडिया' योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या आहेत. चंद्रपुर जिल्ह्यातील पात्र इच्छूक नवउद्योजक तरुणांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपुर या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.

००००००

Monday, 5 May 2025

वेव्हजच्या पार्श्वभुमीवर ‘ध्वनी चित्र रंजन’ कार्यक्रामाचे आयोजन

 


वेव्हजच्या पार्श्वभुमीवर ‘ध्वनी चित्र रंजन’ कार्यक्रामाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 5 मे : मुंबई येथे जागतिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) 2025 या उपक्रमाच्या अनुषंगाने, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ‘ध्वनी चित्र रंजन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चंद्रपुरातील सावित्रीबाई फुले सभागृह, येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मागदर्शनात कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे यांनी केले.

सदर कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा, मनोरंजन व जाहिरात क्षेत्रातील महाराष्ट्राचे योगदान, महाराष्ट्र गीतांची मेडली, स्थानिक वाद्यांची जुगलबंदी, नाट्यगीते, चित्रपट गीत आणि लोकधारा अशा बहुरंगी सादरीकरणांनी रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ता हरीश सहारे, तेजराज चिकटवार, शैलेश पाटील व प्रदीप यमनूरवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

०००००००

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प व महाबीजमध्ये सामंजस्य करार

 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प व महाबीजमध्ये सामंजस्य करार

            चंद्रपूर, दि. 5 मे : सन 2025 पासून नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-2 अंतर्गत 21 जिल्ह्यांमधील एकूण 6959 गावांमध्ये विविध कृषि विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. टप्पा-1 प्रमाणेच या टप्यातही हवामानास अनुकूल पीक वाणांचे बीजोत्पादन, जमिनीच्या सुपीकतेसाठी उपाययोजना, फळबाग व बांबू लागवड, तसेच जिवाणू खतांची निर्मिती यांसारख्या घटकांचा समावेश असणार आहे. यामुळे बीजोत्पादन क्षेत्राचा विकास होण्यास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास व जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होण्यास निश्चित मदत होणार आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर महाबीज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी टप्पा-2 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली. या करारामुळे 21 जिल्ह्यांतील महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना स्त्रोत बियाणे किंमत आणि बीज प्रमाणीकरण नोंदणी शुल्क परताव्याच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. तसेच महाबीजमार्फत उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा आणि जैविक खतांचा संघ महाजैविक या उत्पादनांचा शेतकरी बंधू व भगिनींना 100 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे.

प्रकल्पातील समाविष्ट् जिल्ह्यांमध्ये गळीतधान्ये व पौष्टिक तृणधान्ये लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिनीकीट्स उपलब्ध करून दिले जातील. तसेच जैविक बुरशीनाशक व खते तयार करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक (Master Trainers) यांना महाबीजमार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तालुका बीज गुणन केंद्रांवर (TSF) बीजोत्पादन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी स्त्रोत बियाणे दर व बीज प्रमाणीकरण शुल्क परतावा दिला जाईल. प्रकल्प गावांमध्ये चारा पिकांचे बियाणे तयार करण्यासाठी बीजोत्पादनास प्रोत्साहन दिले जाईल.

या उपक्रमाच्या अनुषंगाने परिमल सिंह यांनी अकोला येथील महाबीजच्या बीज परीक्षण प्रयोगशाळा, बीज प्रक्रिया केंद्र आणि मुख्यालयास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. या प्रसंगी पोकराचे मृदाविज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर व महाबीजचे सर्व विभाग प्रमुखही उपस्थित होते.

०००००

Friday, 2 May 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा वेव्हज् विशेषांक प्रकाशित

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा वेव्हज् विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि. २ : मुंबईत सुरू असलेल्या 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट' अर्थात 'वेव्हज् २०२५' या जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ आणि ‘महाराष्ट्र अहेड’च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या 'वेव्ह्ज' परिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन , एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, सिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, 'लोकराज्य' चे प्रबंध संपादक तथा संचालक (माहिती) हेमराज बागुल,  संचालक (माहिती) तथा वेव्हजविषयक प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांगुर्डे, संचालक (वृत्त-जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (वृत्त) श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते.

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि 'लोकराज्य'चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या विशेषांकात  'वेव्हज् 'शी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत.

यासोबतच या अंकात सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी राबविलेल्या करण्यात येणाऱ्या उपाययोजना, सिंहस्थ कुंभमेळा, अन्नसुरक्षा, जलसाक्षरतेतून जल व्यवस्थापन अशा विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे.

000000