मूल-मरोडा कृषी महाविद्यालयासाठी कृषीमंत्र्यांकडून 25.55 कोटी मंजूर
Ø वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश
Ø कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीतच घेतला तात्काळ निर्णय !
मुंबई / चंद्रपूर, दि.3 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मूल-मरोडा (चंद्रपूर ) येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या निर्मितीकरीता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज 25.55 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिले. वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांच्या विकसात्मक कार्याचे हे मोठे यश आहे.
मुंबई येथे मंत्रालयात गुरुवारी कृषी मंत्री श्री. सत्तार यांच्यासोबत मूल कृषी महाविद्यालयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. कृषी मंत्री श्री.सत्तार यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन, कार्यतत्परतेचा परिचय देत तातडीने स्वाक्षरी करून निधी मंजूर केला. मुल-मारोडा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात 64.59 कोटी रू. किंमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. शासनाच्या कृषी व पदूम विभागाच्या 16 मार्च 2022 च्या शासन निर्णयान्वये सदर कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी 64.59 कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला होता.
श्री. मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुल-मारोडा येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात आले. या महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत रू.133.35 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची छाननी करून 64.59 कोटीच्या प्रस्तावाला गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सदर कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा, यासाठी श्री.मुनगंटीवार यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.
निधी मंजूर केल्याबद्दल कृषी मंत्री श्री. सत्तार यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आभार मानले.
००००००
No comments:
Post a Comment