Search This Blog

Wednesday 28 August 2024

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन


 कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन

            चंद्रपूरदि. 28 : कापूस पीक हे सध्या 50 ते 60 दिवसांचे झाले असून बऱ्याच ठिकाणी फुलावर येत आहे. गुलाबी  बोंडअळीचा प्रादुर्भाव डोमकळयाच्या स्वरुपात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयापासुनच दिसून येत आहे. किटकशास्त्र विभागाच्या चमूने शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या असताकपाशी जेथे फुलावस्थेत आहे अशा ठिकाणी डोमकळया आढळून आल्या आहेत. बोंड अळीचा प्रादुर्भाव 5 ते 7 टक्के पेक्षा जास्त आढळून आलेला आहे. सततचे ढगाळ वातावरण पिकावरील किडींना पोषक असते. किडींचे व्यवस्थापन  करण्यास उशीर केल्यास  या किडीचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढण्याची शक्यता असते, म्हणून  सुरुवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन करून या किडीमुळे होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते, असे कृषी विभागाने कळविले आाहे.

या उपाययोजनेचा अवलंब करावा : पिकातील डोमकळया नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढयांची रोकथाम  करता येईल. दर पंधरा दिवसांनी 5 टक्के निंबोळी  अर्काची किंवा ॲझेंडिरेक्टिन 300 पीपीएम 50 मिली किंवा 1500 पीपीएम 25 मिली प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.  कामगंध सापळयाचा वापर करावा. पिकाच्या उंचीनुसार किमान एक फुट उंच  अंतर ठेवावे, जेणेकरुन कामगंध सापळयाचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन कामगंध सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळयामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावावेत.

पिक उगवणी नंतर 55 ते 60 दिवसांनी 12 ते 15 दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॅायडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकाची 1.5 लक्ष अंडी (ट्रायको कार्ड) प्रति हेक्टरी सहा वेळा लावावीत.  गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवडयाला एकरी  शेताचे प्रतिनिधीत्व करतील, अशी 20 झाडे निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुलेपात्या व बोंडांची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंडअळीग्रस्त फुलेपात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी 5 टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली सांगितल्याप्रमाणे रासायनिक‍ किटकनाशकाची  फवारणी करावी.

इंडोक्साकार्ब 14.50 टक्के एससी 10 मिली किंवा स्पिनेटोराम 11.70 टक्के एससी 9 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के इसी 30 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 टक्के एएफ 25 किंवा क्लोरपायारीफॅास 20 टक्के इसी 25 मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्याच्यावर आहे, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून इमामेक्टीन बेन्झोएट 1.5 टक्के, प्रोफेनोफॉस 35 टक्के डब्ल्यूडीजी 14 ग्रॅम किंवा सायंट्रानिलीप्रोल 8 टक्के + डायफेनथ्युरॉन 40 एससी 13 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इमामेक्टीन  बेन्झोएट 1.1 टक्के डायफेनथ्युरॉन 30 एससी 20 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50+ फेनप्रोपेथ्रिन 5 टक्के इसी 30 मिली या पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील प्रकारे कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे नियोजन करण्यात यावे., असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

०००००

No comments:

Post a Comment