Search This Blog

Tuesday 6 August 2024

जिल्ह्यातील 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता


 

जिल्ह्यातील 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता

Ø 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी

चंद्रपूर, दि. 6 : जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी करण्यात आली असून कॅन्सरग्रस्त आढळलेल्या 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता झाली आहे.

टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशन चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी 2020 पासून आरोग्य विभागासोबत कॅन्सर या गंभीर आजारावर ग्रामीण व शहरी भागात काम करत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांमध्ये 30 ते 65 वयोगटातील नागरिकांची तपासणी करण्यात येते. जानेवारी 2020 ते जुलै 2024 या कालावधीत आतापर्यंत 62 हजार नागरिकांची तोंडाचा कॅन्सर, स्तन कॅन्सर आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सरची तपासणी करण्यात आली.

 

 

तपासणी झालेल्या नागरिकांपैकी 1542 नागरिक कॅन्सर संशयित आढळले आणि त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले.

त्यापैकी 95 रुग्ण कॅन्सरने ग्रस्त आढळले. या कॅन्सर रुग्णांवर टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशनने स्थापन केलेल्या केमो थेरपी विभागात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत आणि यशस्वीपणे उपचार करण्यात आले व या रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता झाली, असे टाटा कॅन्सर फाउंडेशन चे जिल्हा प्रमुख डॉ. आशिष बारब्दे यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात यशस्वीपणे सुरू असल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment