Search This Blog

Tuesday, 15 April 2025

वन अकादमीचा इंग्लड येथील विद्यापिठाशी सामंजस्य करार

 



वन अकादमीचा इंग्लड येथील विद्यापिठाशी सामंजस्य करार

चंद्रपूर, दि. 15 एप्रिल : शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवून शैक्षणिक देवाण-घेवाण आणि आंतरराष्ट्रीय समज दृढ करण्यासाठी चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी, (वन अकादमी) आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड (UWE) ब्रिस्टल यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या अनुषंगाने युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टल येथील इकोसिस्टम सर्व्हिसेसचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मार्क एव्हरार्ड यांनी 13 ते 15 एप्रिल दरम्यान चंद्रपूर वन अकादमीला भेट दिली. त्यांच्या या भेटीवेळी "Wildlife & Wetland Protection Foundation" चे शिवाजी चव्हाण सोबत होते. या भेटीचे समन्वयक म्हणून अकादमीतील प्राध्यापक एस. के. गवळी यांनी जबाबदारी पार पाडली. भेटीदरम्यान डॉ. मार्क एव्हरार्ड यांनी वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी आणि अकादमीच्या प्राध्यापकांशी सविस्तर चर्चा केली. खालील क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याचे मुद्दे निश्चित करण्यात आले.

1. ऑनलाईन व्याख्यानांचे आदानप्रदान : युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टल येथील प्राध्यापकांकडून चंद्रपूर वन अकादमीतील प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन व्याख्याने दिली जातील. तसेच चंद्रपूर वन अकादमीचे प्राध्यापक ब्रिस्टल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्याख्याने घेतील.

2. संयुक्त अल्पकालीन अभ्यासक्रम : दोन्ही संस्थांच्या सहभागाने संयुक्तपणे अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम चंद्रपूर वन अकादमीमध्ये आयोजित करण्यात येतील.

3. आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळा : चंद्रपूर वन अकादमीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टलच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा व परिसंवाद आयोजित केले जातील.

4. संशोधन सहकार्य : महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या संदर्भात महत्त्वाच्या संशोधन क्षेत्रांची ओळख पटवून, त्यामध्ये ब्रिस्टलच्या संशोधकांचे तांत्रिक व शैक्षणिक सहकार्य घेण्यात येईल.

5. अभ्यासक्रम मान्यता : चंद्रपूर वन अकादमीमध्ये घेतल्या जाणाऱ्या निवडक अभ्यासक्रमांना ब्रिस्टलकडून मान्यता मिळविण्याची शक्यता तपासण्यात येईल.

डॉ. मार्क एव्हरार्ड यांनी चंद्रपूर वन अकादमीतील प्रशिक्षण अभ्यासक्रमांची गुणवत्ता, अद्ययावत प्रशिक्षण सुविधा आणि वातावरण यांची प्रशंसा केली आणि दोन्ही संस्थांमधील भविष्यातील सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या करारामुळे चंद्रपूर वन अकादमीतील शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्यक्षमता वाढीस लागेल आणि प्रशिक्षणार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्ञान व अनुभव प्राप्त होण्यास मदत होईल, असे वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment