Search This Blog

Tuesday, 15 April 2025

वनविकास महामंडळाकडून सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे भेट

 


वनविकास महामंडळाकडून सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे भेट

चंद्रपूर, दि. 15 एप्रिल : महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे देण्यात आली.

महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या सी.एस.आर. निधी अंतर्गत 13  लक्ष रुपये किमतीचे स्ट्रेचर, वाटर कुलर  व ईसीजी मशीन कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला नुकतेच प्राप्त झाले. यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळ विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, अधिसेविका श्रीमती टेंभुर्णे, जे.सी.आय. इलाईटचे ज्ञानेश कंचर्लावार मंचावर उपस्थित होते. 

यावेळी गणेश मोटकर यांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून रुग्णालयाला वस्तूच्या रूपात मदत केल्याने आनंद होत असून भविष्यात रुग्णालयाला रुग्णसेवेकरिता आणखी वस्तूंचे दान करण्याचे आश्वासन दिले. अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी आपल्या मनोगतनातून रुग्णहित समोर ठेवून सी.एस.आर. च्या माध्यमातून रुग्णालयाला वस्तू व वाटर कुलर देणगी रूपात दिल्याबद्दल वनविकास महामंडळाचे आभार मानले. आरोग्य सेवा देताना वैद्यकीय उपकरणे खूपच महत्त्वाचे असून भविष्यात अशीच मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समन्वय अधिकारी भास्कर झळके यांनी सी.एस.आर. निधीतून वस्तू मिळवण्यासाठी केलेला पाठपुरावा व रुग्णालयात छोट्या छोट्या वस्तूंचे असलेले महत्त्व विशद केले. देणगी स्वरूपातील स्ट्रेचर, वाटर कुलर व ईसीजी मशीन प्राप्त करण्याची संपूर्ण प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने, डॉ. कुलेश चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एफ. डी. सी. एम. येथील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून करण्यात आली. यासाठी समाजसेवा अधीक्षक हेमंत भोयर, राकेश शेंडे यांचे देणगी वस्तू प्राप्त करून देण्यात मोलाचे सहकार्य लाभले. शहरातील दानशूर संस्था व दानशूर व्यक्तिंनी रुग्ण हित समोर ठेवून सामाजिक उत्तरदायित्वासाठी पुढे यावे, असे आवाहन याप्रसंगी समाजसेवा विभागाकडून करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन समाजसेवा अधिक्षक हेमंत भोयर यांनी तर आभार उमेश आडे यांनी मानले. यावेळी राकेश शेंडे, भूषण बारापात्रे, तानाजी शिंदे, हेमा नगरकर, प्राजक्ता पेठे, योगिता माळी, मिलिंद मुन तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी अधीपरिचारिका, परिसेविका उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment