Search This Blog

Friday, 13 October 2017

चंद्रपूर सैनिक शाळेचे काम वेगाने पूर्ण करावे सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश



मुंबई, दि. १२ : चंद्रपूर सैनिक शाळेत २०१९ ला पहिली बॅच प्रवेश घेऊ शकेल या पद्धतीने शाळेचे  काम वेगाने पूर्ण करावे, असे आदेश काल चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते चंद्रपूरची सैनिक शाळा ही भारतातील उत्तम सैनिक शाळा व्हावी यासाठी तिथे करण्यात येणारे काम आणि राबविण्यात येणाऱ्या संकल्पना उत्कृष्ट आणि दर्जेदार असाव्यात अशा सूचना देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले,  या शाळेसाठी १२३ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेचा शाळेच्या इमारतीसाठी उपयोग करून घेतांना तो कल्पकतेने तसेच सर्व आवश्यक गरजांचा विचार करून केला जावा. शाळेची इमारत, प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांचे वसतिगृहे, विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सभागृह, मैदाने, स्वीमिंग टँक, त्यांची भोजनाची व्यवस्था,  शैक्षणिक तसेच इतर कर्मचारी वर्गाची राहण्याची व्यवस्था, परेड ग्राऊंड, हॉर्स रायडिंगची जागा, घोड्यांच्या पागा, वाहनतळ,  या सगळ्या व्यवस्था या परस्पर संलग्न आणि सोयीच्या असाव्यात.
युनिक झाडांचे उद्यान तयार केले जावे, बांबू रोपांची लागवड सुनियोजित पद्धतीने केली जावी, वीज वापराच्या दृष्टीने ही शाळा स्वयंपूर्ण होऊ शकते का याचा अभ्यास करावा, यासंबंधीची अधिक माहिती मेडा कडून प्राप्त करून घेण्यात यावी. शाळेमध्ये एक महिन्याचे छोटे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जावेत. शाळेमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात यावी. मिल्ट्री म्युझियम, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठीची दुकाने, याचीही येथे व्यवस्था असावी असेही ते यावेळी म्हणाले.
चंद्रपूर येथे सैनिक शाळा सुरु करण्याचा निर्णय एप्रिल २०१५ मधील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर येथे सैनिक शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावास केंद्र शासनाकडून मान्यता देण्यात आल्यानंतर यासाठी एकूण सुमारे ३०९ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून यावेळी देण्यात आली.
 बैठकीत सैनिक शाळेचा विकास आराखडा श्री. मुनगंटीवार यांच्यासमोर सादर करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
                                                 0 0 0

Friday, 6 October 2017

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाकर्जमाफीचा घेतला आढावा

चंद्रपूर, दि.06 ऑक्टोंबर – चंद्रपूर जिल्हयातील छत्रपती शिवाजी महाराज महाकर्जमाफी अंतर्गत दाखल केलेल्या अर्जाची सद्यास्थिती, बँकांमधील या संदर्भात सुरु असलेली कामे, चावडी वाचनाच्या कार्यक्रमाचा आढावा आदीबाबत आज राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आढावा घेतला.
          आज दुपारी त्यांनी चंद्रपूर जिल्हयाच्या महाकर्जमाफी संदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हयातील विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
          यावेळी अधिका-यांशी चर्चा करतांना त्यांनी ऑनलाईन अर्जाच्या संदर्भातील संपूर्ण डाटा तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे शक्य तेवढया लवकर शेतक-यांना दिलासा मिळेल, यासाठी यंत्रणा वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले. चंद्रपूर जिल्हयामध्ये कर्ज भरणा-या शेतक-यांची संख्या मोठया प्रमाणात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून मोठया संख्येत कर्जाची परतफेड करणा-यांना देखील योजनेतील तरतूदींचा लाभ मिळावा, असे निर्देश त्यांनी दिले.
          यवतमाळ जिल्हयातील शेतकरी फवारणी करतांना विषबाधा होवून मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. कृषी विभागामार्फत या संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. चंद्रपूर जिल्हयामध्ये अशा पध्दतीच्या घटना घडू नये, यासाठी कृषी व आरोग्य विभागाने लक्ष वेधावे असेही त्यांनी सांगितले.
                                                                  000

Wednesday, 4 October 2017

दुसऱ्याला मदतीचा हात देणारा विद्यार्थी घडावा - सुधीर मुनगंटीवार



6 व्या वर्धापन दिनी मुलांचे व मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन संपन्न
गडचिरोली दि.4:- चंद्रपूर- गडचिरोली   जिल्हयातील युवक कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होईल अशी क्षमता असलेला युवक. त्याला संधी मिळाली तर एकलव्यासारखी  कामगिरी केल्याशिवाय रहाणार नाही. याकरीताच  या दोन जिल्हयासाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती  करण्यात आली.   या विद्यापीठातुन मदत मागणारा  विद्यार्थी न घडता दुसऱ्याला मदतीचा हात देणारा विद्यार्थी घडावा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, वने व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी आज येथे केले.
6 व्या वर्धापन दिन सोहळयाचे  औचित्य साधून विद्यापीठ परिसरातील मुलांचे व मुलींचे वसतीगृहाचे उद्घाटन प्रसंगी  ते बोलत होते.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री विनोद तावडे  मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तर मुलांच्या वसतीगृहाचे उद्घाटक म्हणून राज्याचे वित्त, वन व नियोजन मंत्री सुधीर मुनंगटीवार उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर  होते.  प्रमुख उपस्थितीत प्र. कुलगुरु डॉ. चंद्रशेखर भुसारी हे होते.  या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम होते.  
याप्रसंगी विशेष उपस्थिती  खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, नगराध्यक्षा योगिता पिपरे, डॉ. विकास आमटे, कुलसचिव जुनघरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी  सर्व आयुधांचा वापर करुन  गोंडवाना विद्यापीठाची गडचिरोली येथे  आदिवासी बहूल जिल्हयात  स्थापना करण्यात आली.  येथे जंगल, पाणी , जमीन, खनिज   विपुल प्रमाणात आहे.  या  सर्व बाबींचा अभ्यास करुन  येथील युवकांना  या विद्यापीठानी  रोजगाराभिमूख, उद्योपती, कुशल कारागिर कसा बनेल याचा विचार करुन  अभ्यासक्रम राबवावा अशी  सुचना यावेळी त्यांनी केली.  आता ज्ञान संपादन करण्याची व्याख्या बदलली आहे.  तेव्हा  विविधांगी अभ्यासक्रमातून  असा विद्यार्थी तयार करा की जेणे करुन  या विद्यापीठाच्या अनुरोधाने शासनाचे उत्पन्न वाढेल असे ते म्हणाले.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे उद्घाटनपर भाषणात म्हणाले की,  विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा करण्यासाठी  संपुर्ण शक्ती खर्च करुन येथील कामे  करण्यात येतील.  लवकर राज्यपाल विद्यासागर राव यांनी यासंदर्भात बैठक  आयोजित करीत आहेत. या बैठकीत विचार विनिमय करुन , सर्व स्तरावर पाठपुरावा करुन  तातडीने 200 एकर जमीन खरेदी  करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.   विद्यापीठात  सर्वंकष अभ्यासक्रमासोबतच  बांबुवर आधारीत प्रकल्प, आयुर्वेद, लोककला यावर आधारीत पदवी अभ्यासक्रम  सुरु करण्याचा   प्रयत्न करावा. तसेच कुशल खेळाडू तयार करण्यासाठीसुध्दा अभ्यासक्रमात  सिल्याबस तयार करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी केल्या
याप्रसंगी  विद्यापीठातर्फे  सुप्रसिध्द समाजसेवक  डॉ. विकास बाबा आमटे यांना जीवन साधना गौरव पुरस्कार अध्यक्ष, प्रमख अतिथी, विशेष अतिथी यांच्या हस्ते प्रदान करुन  सन्मानीत करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्कार राशी धनादेश रुपये 25 हजार  देऊन गौरव करण्यात आला.
तसेच  सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरला  उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, प्राचार्य डॉ. नामदेव एस. कोकोडे यांचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील डॉ. सुधीर आकोजवार  यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, असिस्टंट प्रोगामर प्रमोद किसन बोरकर यांना  उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कार,  निवड श्रेणी लिपीक विपीन कालीदास राऊत  यांना उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार, संजय पिरु राठोड यांना उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार,  शिवाजी महाविद्यालयाचे  संजय नामदेव संतोषवार यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार,  कुणाल बाबा खणके  यांना उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, कुमारी जयश्री प्रभाकर नाकाडे हिला उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्कार प्रदान करुन यावेळी गौरविण्यात आले.
कुलगुरु डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांनी   प्रास्ताविक करतांना विद्यापिठानी या सहा वर्षात केलेल्या कामाची  तसेच पुढील नियोजनाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक नरेंद्र आरेकर यांनी केले तर आभार  कुलसचिव दिपक एस. जुनघरे यांनी मानले.

******

Tuesday, 3 October 2017

मिशन अत्योंदय आणि कौशल्य रथाव्दारे विकास गंगा आपल्या दारी : अशोक सिरसे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी

चंद्रपूर दि.03 ऑक्टोंबर- राज्यात 1 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर 2017 पर्यंत मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्हातील 157 ग्राम पंचायतीमध्ये पथदर्थी ग्राम समृध्दी व स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. पंधरवडयामध्ये जिल्हयातील सर्व गावांमध्ये विविध स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा जागर होत आहे. यामुळे या पंधरवडयात लोकांचा ग्रामसभेत सहभाग व गांवाचा विकास आराखडा तयार करणे, स्वच्छता विषयी जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या कामास सुरवात करणे आणि विविध योजनेची जाणीव जागृती करण्याकरीता कौशल्य रथासह कलापथकाची सोबत असल्याने लोकांच्या सहभागाने विकासाची गंगा आपल्या दारी आलेली आहे. तीचे स्वागत उत्स्फुर्तपणे करण्याचे आवाहन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे  यांनी आज कौशल्य रथाचे स्वागत करतांना केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, गोंडपिंपरीचे गटविकास अधिकारी यशवंत मोहितकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती आशा ढवळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांच्या उपस्थित कौशल्य रथाला हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
मिशन अंत्योदय अंतर्गत 157 ग्रामपंचायतीमध्ये पायाभुत सर्वेक्षणाचे काम दिनांक 1 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील विविध संसाधने आणि विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहितीची नोंद ‘समृध्द ग्राम’ ह्या ॲप्लीकेशनवर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सर्वेक्षण गावातील महिला बचत गटातील CRP, ग्राम रोजगार सेवक व एक महाविद्यालयीन विद्यार्थी या चमुमार्फत करण्यात येणार आहे. वरील सर्व चमूंचे प्रशिक्षण तालुका स्तरावर घेण्यात येणार आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार गावाला आवश्यक सुविधा या माध्यमातुन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. गावातील सर्वेक्षणातून प्राप्त माहितीचे संकलन झाल्यानंतर ग्राम पंचायतीच्या मासिक सभेमध्ये सदर माहितीचे प्रमाणीकरण करून मगच संकलीत माहिती ॲपवर अंतिम ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
स्वच्छता पंधरवडा जिल्हातील सर्वच ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येत असून या अंतर्गत ग्रामपंचायतीच्या कामाचे नियोजन व माहिती भरण्यासाठी स्वतंत्र “स्वच्छता ॲप” तयार करण्यात येणार आहे. याकरीता शासनाने तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे.
कौशल्य रथाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन सांख्येकी विस्तार अधिकारी पी.डब्लु.पाल व प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापन सचिन देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हातील बचत गटातील सर्वच भागातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

000

जिल्हयातील कृषी, आरोग्य सेवा बळकट करा : ना.हंसराज अहीर


जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचा आढावा

चंद्रपूर, दि.3 ऑक्टोंबर – जिल्हयातील शेतकरी हा शासनाच्या प्रत्येक योजनांनी लाभान्वित झाला पाहिजे, त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी योजना, प्रशिक्षण सुविधा, सल्ला आणि आवश्यक तिथे थेट मदत पोहचली पाहीजे. शासनाच्या विविध योजना केवळ कागदांवरच न राहता जनतेपर्यंत पोहचल्या पाहीजे, त्यासाठी अधिका-यांनी कर्तव्य नव्हे दायित्व म्हणून काम करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर आमदार ॲड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा दक्षता समितीचे सदस्य खुशाल बोंडे, सर्व पंचायत समितीचे सभापती, सर्व गट विकास अधिकारी, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते .
या बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय अंतोदय योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक साहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पीक विमा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, शामाप्रसाद मुखर्जी शहरी उपक्रम, कौशल्य विकास, अमृत योजना याशिवाय विविध पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.  
जिल्हयातील दुर्गम भागातील नागरिकांना उत्तम सोयी, सुविधा पुरवण्‍यात याव्यात, 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात यावे, सर्वांना मूलभूत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी आढावा बैठकीनंतर केले. तत्पूर्वी त्यांनी कृषी विभागाच्या योजना आणि त्याची अंमलबजावणी याबाबत जिल्हयातील दुर्गम भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे शेतक-यांसाठी योजनांची माहिती, प्रशिक्षण, सवलती आणि सुविधा देण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये पंचायत समितीचे सभापती व अन्य लोकप्रतिनिधींनी आपली बाजू मांडली. जिल्हयातील प्राथमिक आरोग्य यंत्रणा ही अधिक सक्षम व्हावी. प्रसूतीला येणा-या महिलांना उत्तम सुविधा व सोयी मिळाव्यात. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट करण्याचे निर्देश यावेळी अहीर यांनी दिले.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेताना नियमित मस्टर भरून कामाची उपलब्धता करण्यात यावी. मजूरांची उपलब्धता करण्यात यावी, याविषयी लक्ष वेधण्याचे आवाहन हंसराज अहीर यांनी केले. पंडित दिनदयाल उपाध्याय अंतोदय योजनेमध्ये बँकनिहाय भौतिक व आर्थिक उद्धिष्ठय पूर्ण करण्याचे आवाहन केले. बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या जनतेसोबतच्या तक्रारी वाढत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शेतकरी, महिला, विद्यार्थी व महिला बचत गट यांना होत असलेल्या त्रासाबद्दल सभापती व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी यामध्ये हस्तक्षेप करीत बँकाँच्या संदर्भात वेगळी बैठक आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुखांना दिले. जिल्हयातील विविध योजना, उपक्रम यामध्ये बँकाँनी सक्रीयतेने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
  प्रधानमंत्री आवास योजनेतील वरोरा, भद्रावती, बल्लारपूर आदी नगरपालिकांनी आपला आढावा सादर केला. शहरातील उपलब्ध जागा, डीपीआर पूर्ण करणे आदीबाबत चर्चा करण्यात आली. उज्वला गॅस वितरण योजनेबद्दल या वेळी चर्चा झाली. गॅस वितरण संदर्भात तक्रारी राहणार नाही, याची सूचना करण्यात आली. कृषी, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवरही चर्चा झाली.
            दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, फवारणी  करताना होणारे अपघात, ग्रामीण भागातील जनतेने शेती संदर्भातील प्रशिक्षण, जिल्हयातील प्रशिक्षण उत्सुक शेतकऱ्यांना पुढाकार घेऊन शिक्षीत करण्याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियान आढावा अंतर्गत 58 प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेण्यात आला. रिक्त पदामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा आजारी होता कामा नये, अशी सूचना करण्यात आली. दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी तातडीने देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत प्रलंबित अंगणवाडी बांधकाम संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली . प्रकल्प संचालक रवी शिवदास यांनी प्रास्ताविक केले. संचलन अरुणा गतफणे तर आभार प्रदर्शन उत्कर्ष वाघरे यांनी केले.

000