Search This Blog

Tuesday, 2 October 2018

'हॅलो चांदा 'चा अधिकाधिक वापर करा : ना. मुनगंटीवार


प्रत्येक गावातून समस्यांसाठी 155 398 या टोल फ्री क्रमांकाचा वापर झाला पाहिजे
चंद्रपूर, दि 2 ऑक्टोबर : ब्रम्हपुरी तालुक्यातील कोलारी या दूरच्या गावापासून जिवती तालुक्यातील बाबापूर या टोकाच्या गावापर्यंत, चंद्रपूर महानगरापासून चिचपल्ली ग्रामपंचायतपर्यंत, जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठेही काही तक्रारी असेल, त्या तक्रारी सोडविण्यासाठी पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा अर्थात  'हॅलो चांदा 'ची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र याचा वापर जोपर्यंत सामान्य नागरिक आपल्या मोबाईल मार्फत करणार नाही, तोपर्यंत ही योजना सक्षम होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस विभाग, वनविभाग, पंचायत समिती, नगरपंचायती, ग्रामपंचायत, यासह शेताच्या मोजणी पासून तर तहसील कार्यालयातील कोणत्याही कामापर्यंत सामान्य नागरिकांची अडवणूक होत असेल, तर त्यासाठी “हॅलो चांदा” ही नवी यंत्रणा संपूर्ण देशात पहिल्यांदा चंद्रपूरमध्ये सुरू झाली आहे. 155 398  हा साधा  6 अक्षरी क्रमांक डायल करून 10 ते 5 या कार्यालयीन वेळेत आपली तक्रार नोंदवण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी त्याचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी सहा हजार लोकांनी या यंत्रणेचा व लाभ घेतला या माध्यमातून शाळा समिती पासून अंगणवाडी सेविका पर्यंत आणि भुमिअभिलेख कार्यालयापासून सातबारा मिळण्याच्या सेतू केंद्राच्या समस्यांपर्यंत अनेक समस्यांची सोडवणूक करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बिलापासून तर महानगरपालिकेच्या कर वसुली विभागापर्यंत अनेक तक्रारी सोडविण्यात आल्या. शाळेतील शिक्षकांच्या भरतीपासून तर शाळेवर गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांपर्यंत, चोरट्या दारू विक्रीपासून तर सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अतिक्रमण पर्यंत अनेक तक्रारी डॅश बोर्डवर जिल्हाधिकाऱ्यांकडे उमटत असतात. त्याची सोडवणूक संबंधित अधिकाऱ्याने मार्फत 30 दिवसाच्या आत करणे बंधनकारक आहे,  त्यामुळे या यंत्रणेचा लाभ अनेक हुशार नागरिक घेताना दिसत आहेत.  ही यंत्रणा सर्वांना उपयुक्त ठरावी यासाठी हॅलो चंदा हा नंबर फक्त सहा आकड्यांमध्ये करण्यात आलेला आहे त्याचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना आपल्या प्रशासकीय समस्यांना तातडीने सोडवण्यासाठी तयार करण्यात आलेली हॅलो चांदा ही पालक मंत्री तक्रार निवारण यंत्रणा 155 398 या नव्या नंबरसह जनतेच्या सेवेत आली आहे. ग्रामपंचायतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि तहसील पासून उपनिबंधक कार्यालयापर्यंत,  तलाठी,  ग्रामसेवक,  बँक, शाळा, संस्था कोणत्याही शासकीय कार्यालयाबाबत काहीही तक्रार असली तर मोबाईल वरून 155 398 या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवता येणार आहे.
पालकमंत्री  तक्रार निवारण यंत्रणेमुळे सामान्य माणसाच्या समस्यांचा निपटारा करण्याचा चढता आलेख जिल्ह्यात आहे. गेल्या वर्षभरात 6  हजार नागरिकांच्या समस्या या यंत्रणेमार्फत सोडविण्यात आल्या आहेत. या यंत्रणेची दखल राज्य आणि देशपातळीवर घेण्यात आली आहे. गावातील सामान्य नागरिकाने आपली  तक्रार केल्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारीची नोंद केली जाते.  त्यानंतर  ही तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येते. या यंत्रणेला या तक्रारीचा निपटारा एका महिन्यात करणे गरजेचे आहे. एक महीना ही डेडलाईन ठरली आहे. या काळामध्ये तक्रारीसंदर्भात संबंधित विभाग काय करतो. तक्रारीवर कार्यवाही सुरु आहे, अथवा नाही ? याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती अद्ययावत होत राहते.  ही माहिती जिल्हाधिकारी यांच्या डॅशबोर्डवर कायम उमटत असते. आवश्यकतेनुसार पालक मंत्री सुद्धा कार्यवाहीचे निरीक्षण करू शकतात. त्यामुळे तक्रारकर्त्यापासून तर या तक्रारीवर कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचे या संदर्भात नियंत्रण असते.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दर महिन्याला तक्रारी किती झाल्यात आणि त्याची सोडवणूक कशी झाली याबाबतचा अहवाल घेतला जातो.  संबंधित विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक घेतली जाते. या बैठकीमध्ये कोणत्या विभागाच्या किती तक्रारी प्रलंबित आहेत. त्यात किती तथ्य आहे,  नेमकी समस्या शोधून जिल्हाधिकारी  जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना यासंदर्भातला तोडगा काढण्यासाठी निर्देश देतात.  हॅलो चांदाची बैठक घेत असताना जिल्हाधिकारी यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित असतात. या बैठकीमध्ये संबंधित विभागाच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात येते. अनेक प्रकरणात जिल्हाधिकारी  स्वतःच तक्रारकर्त्याशी संपर्क साधतात.  त्यामुळे तक्रारकर्त्यापर्यंत प्रशासन पोहोचत असून जिल्हाधिकारी स्वतः संपर्क साधत असल्यामुळे या यंत्रणेवर विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी होत आहे.
गेल्या वर्षभरात जवळपास 6 हजार तक्रारी हॅलो चांदावर आल्यात. या तक्रारी सोडवण्यात आल्या असून हॅलो चांदा वापरणाऱ्या अनेक तरुणांनी या सोयीबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. घरबसल्या आपल्या तक्रारी सुटत असेल तर सरकारी कार्यालयांमध्ये  विनाकारण हेलपाटे कमी होईल, असा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,  प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिशील व जबाबदार बनवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. जुन्या लांबलचक क्रमांकाच्या तुलनेत केवळ  6 डिजीटचा हेल्पलाईन क्रमांक लोकप्रिय ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या यंत्रणेचे जिल्ह्यात स्वागत होत असून चंद्रपूरची ओळख बनलेल्या या योजनेला अधिक यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तथापि यंत्रणेचा वापर करताना चुकीचे कॉल केल्यास जिल्हा प्रशासनाने त्याचीही नोंद वेगळी ठेवण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे नेमक्या, उपयुक्त, आवश्यक व न्यायालयीन प्रक्रिया सुरू नसलेल्या तक्रारी कराव्यात, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
0000

Sunday, 30 September 2018

सर्जिकल स्ट्राईक भारताने जगाला दिलेला इशारा आहे: ना.अहीर



चंद्रपूरमध्ये माजी सैनिकांच्या सत्कारात शौर्य दिन साजरा

      चंद्रपूर, दि.29 सप्टेंबर- कोणावर कधीही आक्रमण न करणारा भारत, गरज पडल्यास शत्रूच्या सिमेत घुसून आंतकवादयांचा नायनाट करु शकते, असा धडकी भरवणारा संदेश भारताने सर्जिकल स्ट्राईक माध्यमातून जगाला दिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी आज येथे केले.
            चंद्रपूर येथील आयएमए सभागृहात 29 सप्टेंबर, शौर्य दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर व माजी सैनिक संघटना चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एका देशभक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना त्यांनी भारताच्या संयमीवृत्तीचे जबाबदार उत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राईक पुढील अनेक काळ देशवासियांच्यासह लक्षात राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताला गृहीत धरु नये. शांततावादी असणारा हा देश गरज पडल्यास सिमेमध्ये घुसून शत्रूवर प्रहार करण्याची हिंमत ठेवू शकतो. हा इशारा व त्याची प्रत्यक्ष कृती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेली ही लष्करी कारवाई आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
            या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर त्यांनी चंद्रपूरच्या भुमीतून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सुपूत्रांच्या विरमाता व विरपत्नींचा सत्कार केला. यावेळी व्यासपिठावर ब्रिगेडीयर सुनील गावपांडे, कॅप्टन सोहदा, सुभेदार शंकर मेंगरे शौर्यचक्र प्राप्त,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ डांगे, जिल्हा सैनिक कल्याण संघटक व जनमाहिती अधिकारी(निवृत्त) सुभेदार मेजर दिनेशकुमार गोवारे, विजय राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी श्रीमती व्यंकमा गोपाल भिमनपल्लीवार, श्रीमती छाया बालकृष्ण नवले, श्रीमती पार्वती वसंतराव डाहुले, सुभेदार गणपती मेंगरे या वीरमाता, वीरपत्नी व शौर्यचक्र प्राप्त सैनिकांचे सत्कार करण्यात आले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेशकुमार गोवारे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी बोलतांना आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी गौरवाचा दिवस असल्याचे प्रतिपादन केले. डॉ.महेशर रेड्डी यांनी सर्जिकल स्ट्राईक मध्ये सहभागी होणे किती कष्टाचे असते, याची माहिती दिली. तर ब्रिगेडीयर सुनील गावपांडे यांनी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूच्या भागात जावून तेथे नेमकी कारवाई करत आंतकवांदी हालचाली करणा-या यत्रणेचा संपूर्ण नायनाट करणे होय. या कार्यवाहीमध्ये सामान्य नागरिकांच्या व तेथील इमारती व अन्य बाबींचे नुकसान न करता केवळ अतिरेकी कार्यवाया करणा-यांचा बिमोड केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले.
                                                          0000

Saturday, 29 September 2018

हेल्मेट चा वापर करीत युवकांनी वाहतूक नियमांचे पालण करावे : ना.हंसराज अहीर



आरटीओ व राज्य मराठी पत्रकार संघातर्फे हेल्मेट वितरण कार्यक्रम आयोजन
      चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर - देशाचे शिस्तबध्द युवक म्हणून या शहराला हेल्मेट घालणा-यांचे शहर बनविण्यासाठी युवकांनी वाहतूक नियमांचे पालन करायला हवे. सद्या अपघाताचे प्रमाण वाढत असून दरवर्षी रस्ते अपघात 1 लाखापेक्षा जास्त जीव जात असल्याचे प्रमाण बघता दोन चाकी गडी चालवितांना हेल्मेटचा वापर केल्यास हे प्रमाण कमी करता येते, असे विधान करुन तुम्ही हेल्मेट घालून गाडी चालविण्याची जन जागृती करा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटपाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी केले.
            जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमात केंद्रिय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंम्भर शिंदे, संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.महेश पानसे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रपूर शहरातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय यासह दहा महाविद्यालयाचे 150 विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. जिल्हा वाहतूक सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर वाहतुक पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. हा कार्यक्रम रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यास प्रेरणा देणार आहे. विशेष करुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानी या उपक्रमात आपले सर्वोच्च योगदान दिल्याने त्यांचे मी आभार मानतो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस जनसंपर्क अधिकारी मुंडे यांनी केले. तर प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात मोठया प्रमाणात विद्यार्थी व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
            या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.महेश पानसे, कार्याध्यक्ष सुनील बोकडे, जिल्हा संघटक राजु कुकुडे, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र चोरडीया, विनोद दुर्गे, सुनील पाटील, धम्म प्रकाश देवगडे, कवेश कष्टी इत्यादींनी परिश्रम घेतले.
                                                           000

Friday, 28 September 2018

बंदच्या काळात नागरिकांना औषधींचा पुरवठा करण्याचे औषध विक्रेत्यांना आवाहन

चंद्रपूर,दि.27 सप्टेंबर- ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲन्ड ड्रगीस्ट यांनी 28 सप्टेंबर 2018 रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्व केमिस्टना बंद मागे घेवून नियमितपणे औषध दुकाने सुरु ठेवून नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
तथापि, औषध दुकाने बंद राहिल्यास या  दिवशी नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हयातील शासकीय रुग्णालये, सामान्य रुग्णालये व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद व नगर परिषद यांच्या अधिनस्त असलेल्या रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवण्यात आला आहे. त्यामधून गरजू रुग्णांना औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच खाजगी रुग्णालयांनी सुध्दा रुग्णांना औषध पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
जिल्हयातील नागरिकांनी बंदच्या दिवशी अन्न व औषध प्रशासन, नवीन प्रशासकीय इमारत चंद्रपूर दूरध्वनी क्र.07172-255612 वर औषधीसाठी संपर्क सावाधा. त्याचप्रमाणे जिल्हयातील पुढील औषध विक्रेत्यांकडे आवश्यकतेनुसार औषधे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संपर्क करण्यात यावा. चंद्रपूर येथील अमृत फार्मशी-9096095648, जन औषधी मेडीकल-9423116266, अंजनेय मेडिकल-9075011830, चिंतावार मेडिकल-9423388788, भालचंद्र मेडिकल-9420867743, ओम श्री साई मेडिकल-9850599876 व प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र-9404862446,  संजय मेडिकल घुग्गुस-9850369097, बल्लारपूर मधील ए.वन मेडिकोज-9890368784, जलाराम मेडीकल-9422146414, विराट जेनेरीक स्टोअर्स-8698759595, राजूरा येथे हितेश मेडीकल स्टोअर्स-9049969411, श्री साई कृपा मेडीकल-9822878573, कोरपना रेणूका मेडीकल-7083795950 व गुरुदेव मेडीकल-8007513657, जिवती देशमुख मेडीकल स्टोअर्स-9881013685 व कदम मेडीकल स्टोअर्स-9689060620, पोंभूर्णा ओम साई मेडीकल-9545904650 व श्री साई मेडीकल-9823982350, गोंडपिपरी सचिन मेडीकल स्टोअर्स-9421728385 व श्री गुरुदेव मेडीकल-9923681356, भद्रावती अमृत मेडीकल-9850738755 व श्री साई कृपा मेडीकल-9921666400, वरोरा गजानन मेडीकल-8888495323 व गौरकार मेडीकल-9422874425, चिमूर शिवकृपा मेडीकल-9421721256 व श्रावक मेडीकल-7066519451, मूल जगदम्बा मेडीकल -9422839238, साई समर्थ मेडीकल-9421813799 व भाग्यश्री मेडीकल-9637270708, सिंदेवाही सरोज मेडीकल-9423608483 व गुरुकृपा मेडीकल-9403110392, सावली पुजा मेडीकल-9422191804 व व्यंकटेश मेडीकल-9657738400, नागभिड हनुमान मेडीकल-9423116015 व बोरकर मेडीकल-9423638561, ब्रम्हपूरी कांबळे मेडिकल स्टोअर्स-9420210978 व चिन्मय मेडीकल-9158920708 इत्यादी मेडीकल मध्ये जिल्हयातील नागरिकांनी औषधीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
                                                            000

Thursday, 27 September 2018

2011 ते 2017 पर्यंतचे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.27  सप्टेंबर - जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती, फ्रिशिपचे व शिक्षण शुल्कचे  सन 2011 ते 2017 पर्यंतचे ऑनलाईन भरलेले अर्ज महाविद्यालय पातळीवर अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत. याबाबत महाविद्यालयांना वारंवार कळवूनही अर्ज महाविद्यालयीन स्थरावर प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. सदर अर्जाची पूर्तता करण्यासाठी महाईस्कॉल पोर्टल काही मर्यादीत कालावधीकरीता सुरु करण्यात आली  आहे.
            परंतु अद्यापही मोठया प्रमाणात अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी त्यांच्याकडे असलेले सर्व प्रकारचे प्रलंबित अर्ज 6 ऑक्टोंबर 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर यांचेकडे ऑनलाईन सादर करण्यात येवून सदर अर्जाची प्रत व त्यासंबंधीचे सर्व कागदपत्राच्या प्रतीसह अर्ज  समाज कल्याण कार्यालय येथे सादर करण्यात यावे. यानंतर प्रलंबित असणारे सर्व अर्ज संगणक प्रणालीतून काढून टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
                                                                             000000