Search This Blog

Saturday, 20 October 2018

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारे पूर परिस्थितीमध्ये बचावाचे प्रात्यक्षिक


चंद्रपूर दिनांक 20- चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे दिनांक 7.10.2018 रोजी इरई धरण, चंद्रपूर येथे जिल्हा शोध व बचाव पथकानकरिता पुरामध्ये बचावाचे प्रात्यक्षिक व घरगुती साहित्यापासून पुरामध्ये बचावाचे प्रात्यक्षिक कार्यक्रम, बोटचालविण्याचे तसेच पोहोचण्याचे प्रशिक्षण तसेच पाण्यामध्ये अचानक बोट पलटी झाल्यास स्वतःचे व इतरांचे प्राण वाचवून सदर बोटीला पुन्हा सरळ करण्याचे प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार तसेच अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी जी.एच भुगावकर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. प्रशिक्षणामध्ये जिल्हा कार्यालयातील तहसीलदार सामान्य विलास वानखेडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी चंद्रपूर निलेश तेलतुंबडे, नैसर्गिक आपत्ती शाखेचे विवेक कोहळे तसेच जिल्हा कार्यालयातील अनेक कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला पोलिस विभागाचे शोध व बचाव पथक, महानगरपालिका फायर विभागाचे बचाव पथक, सीटीपीएस फायर विभागाचे बचाव पथक तसेच तालुका स्तरावरील बचाव पथकातील सदस्यांनी सहभाग घेतला. जिल्हा पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक मुत्तेमवार, पोलीस उपनिरीक्षक  मडावी च.म.औ.वि.के.चंद्रपुर फायर विभागाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी सहायक अग्निशमन अधिकारी ढोमणे, सहाय्यक अग्निशमन अधिकारी खरवडे, कनिष्ठ अग्निशमन अधिकारी तीवारी, मानगुडधे तसेच फायरमन  सुरज मेश्राम. जाकीर शेख,  आर.बी.सिंग उपस्थित होते. चंद्रपूर येथील सुरक्षा शाखेचे वरीष्ठ सुरक्षा अधिकारी त्रिवेदी, सहायक सुरक्षा अधिकारी   बिरखडे, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी रामटेके, पहारेकरी सुर्यंवंशी तसेच अनेक कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी तसेच बचाव पथकातील सदस्यांना घरगुती साहित्यापासुन पूरामध्ये बचावा संबेधाने प्रात्यक्षिक करून दाखविले. घरगुती साहित्यामध्ये थर्माकॉल पासुन लाईफ जॅकेट, पिण्याचे पाणी बॉटल, घागर तसेच 2 व्हालीबॉल पासून पूरामध्ये जिव कसा वाचविला जातो याचे प्रात्याक्षिक शोध व बचाव पथकातील सदस्यांनी उपस्थितांना करून दाखविले तसेच उपस्थित शोध व बचाव पथकातील सदस्यांना पूरामध्ये बोट चालविण्याचे कौशल्य तसेच गोताखोर असलेल्या सदस्यांकडून पुराचे पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध कसा घेण्यात येतो याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखविले. एसडीआरएफचे पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. एसडीआरएफचे पोलीस उपनिरीक्षक पी.एम.नेमाने, एस.एस.जम्बेली, पशुवैद्यकीय अधिकारी पी.आर.साहारे तसेच 17 जवानांनी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखविले.
उपरोक्त प्रशिक्षण पोलीस विभागातील शोध व बचाव पथकातील बोटचालक अशोक गर्गेलवार, मंगेश मत्ते, उमेश बनकर, गिरीश मराप, वामन नक्षिणे, उपगनलावार तसेच त्यांचे जवान उपस्थित होते.
जिल्हा कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेचे अ.का.श्री. विवेक कोहळे तसेच शोध व बचाव पथकातील बोटचालक श्री. सुनिल नागतोडे, गजानन पांडे, गोवर्धन जेंगठे, शरद बनकर, अजय यादव, सुरेश दाते, रहुल पाटील, राजु निंबाळकर प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित होते.
000

गोवर रुबेला लसीकरण मोहिम सूक्ष्म कृती आराखडा कार्यशाळा संपन्न


चंद्रपूर दि.20-प्रशासनातर्फे येत्या नोव्हेंबर 2018 या महिण्यात राबविण्यात येणाऱ्या गोवर रुबेला मोहिमे संदर्भात आरोग्य विभाग, जि.प, चंद्रपूर अंतर्गत ‍ जिल्हयातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रूग्णालय वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र, आरोग्य सहाय्यक तालुका यांची गोवर रुबेला कार्यक्रमाबाबत कृती आराखडा सेंन्सीटॉयझेन कार्यशाळा मा.सा.कन्नमवार सभागृह जि.प.चंद्रपूर येथे संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. प्रकाश साठे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.चंद्रपूर व डॉ. एम कामरान, डब्ल्यु.एच.ओ. कन्सलटंट यांचे प्रमुख उपस्थीतीत संपन्न झाली यावेळी मंचावर डॉ. गोवर्धन दुधे, सर्जन सा.रु.चंद्रपूर, डॉ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी जि.प.चंद्रपूर,            श्री.एस. मुळावार जि.का.व्य.चंद्रपूर उपस्थित होते.
भारत सरकारने सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निमूर्लन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यानुसार नाव्हेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांमुलींकरीता लसीकरण करण्याचे 100 टक्के लक्ष्‍य निर्धारीत केले आहे. सदर मोहिम जिल्हयातील सर्व सरकारी, निमसरकारी शाळा, मदरसे, खाजगी शाळा, अंगणवाडी केंद्र या ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेत डॉ. एम कामरान, डब्ल्यु.एच.ओ. कन्सलटंट यांनी आपण आपल्या स्तरावर केलेल्या सूक्ष्म कृती आराखडयानुसार  नियोजन करुन मोहिमेची अंमलबजावनी आपल्या कार्यक्षेत्रात करावी व एकही मूल लसीकरणापासून सुटनार नाही याची काळजी घेऊन मोहीम यशस्वी करावी अश्या सूचना दिल्या.
यावेळी  डॉ. प्रकाश साठे, व डॉ. संदीप गेडाम यांनी जनतेला जागृत करुन कृती आराखडयानुसार गोवर रुबेला लसीकरण मोहिम 100 टक्के साध्य होईल याकरीता सर्वतोपरी लक्ष दयावे असे सांगीतले.
 या लसीकरण मोहिमे अंतर्गंत सर्व लाभार्थ्यांना गोवर रुबेला लसीचे एक इंजेक्शन दिले जानार आहे. गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे हा मुख्यत: लहान मुलांना होतो व आजारानंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे बालकाचा मृत्यू होऊ शकतो तसेच रुबेला हा सौम्य संक्रामक आजार असून गर्भवती स्त्रियांना रुबेला आजाराचा संर्सग झाल्यानंतर अचानक गर्भपात किंवा नविन जन्म झालेल्या बाळास जन्मजात दोष अंधत्व, बहिरेपणा, हृदयविकृती यासारखे आजार होतात. तरी सदर मोहिमेबाबत विविध प्रसिध्दी माध्यमाद्वारे जनतेत जनजागृती करावी सदर लसीकरणाबाबत जनतेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000

वरोरा येथे विद्यार्थ्‍यांसाठी ई-लायब्ररी तयार करण्‍याकरिता शासन सर्वतोपरी सहकार्य करेल - सुधीर मुनगंटीवार


वरोरा येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्‍न

चंद्रपूर दि: 19 - गेल्‍या चार वर्षात चंद्रपूर जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर ठरला आहे. या जिल्‍हयातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी माऊंट एव्‍हरेस्‍ट सारख्‍या उंच शिखरावर झेंडा रोवून चंद्रपूर जिल्‍हयाचे नाव जागतिक स्‍तरावर पोहचविले आहे. यापुढील काळात मिशन शक्‍तीच्‍या माध्‍यमातून ऑलिंम्पिक स्‍पर्धेमध्‍ये चंद्रपूर जिल्‍हयातील विद्यार्थी पदके प्राप्‍त करतील यादृष्‍टीने आम्‍ही प्रयत्‍नशील आहोत तर मिशन सेवाच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येक तालुका स्‍तरावर स्‍पर्धा परिक्षांची तयारी विद्यार्थ्‍यांकडून करवून घेतली जाणार आहे. वरोरा शहर व तालुक्‍यातील विद्यार्थी स्‍पर्धा परिक्षांमध्‍ये अव्‍वल ठरावे, यासाठी त्‍यांच्‍या अभ्‍यासाच्‍या दृष्‍टीने ई-लायब्ररी तयार करण्‍यासाठी नगर परिषदेने पुढाकार घ्‍यावा, राज्‍य शासन त्‍यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्‍वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
दिनांक 19 ऑक्‍टोबर रोजी वरोरा नगर परिषदेतर्फे आयोजित विविध विकासकामांच्‍या लोकार्पण व भुमीपूजन समारंभानिमीत्‍त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी मंत्री संजय देवतळे, नगर परिषदेचे अध्‍यक्ष अहेतेशाम अली, नगरसेवक बाबा भागडे, ज्‍येष्‍ठ नेते चंद्रकांत गुंडावार, विजय राऊत, नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी सुनिल बल्‍लाळ, न.प. उपाध्‍यक्ष अनिल झोटींग, जिल्‍हा परिषदेच्‍या सभापती अर्चना जिवतोडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर जिल्‍हयातील सर्वच भागात विकासकामांसाठी मोठया प्रमाणावर निधी आम्‍ही उपलब्‍ध केला आहे. ब्रम्‍हपूरी, सावली, सिंदेवाही, गोंडपिपरी, जिवती, राजुरा, चिमूर सर्वच भागांच्‍या विकासासाठी निधी उपलब्‍ध होवून विकासप्रक्रिया गतीमान झाली आहे. जात, धर्म, पंथ, पक्ष यांच्‍या भिंती बाजूला सारून सर्वसमावेशक पध्‍दतीने सर्वांना न्‍याय देत आम्‍ही विकास प्रक्रिया राबवित आहोत. पोंभुर्णा येथे 1000 आदिवासी महिलांची कुक्‍कुटपालन संस्‍था महाराष्‍ट्रातील पहिली कुक्‍कुटपालन संस्‍था आपण स्‍थापन केली आहे. महिलांच्‍या सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्‍प आपण राबवित आहोत. विकास ही सर्वांची जबाबदारी आहे. सबका साथ सबका विकास या माननीय पंतप्रधानांच्‍या निर्धारानुसार या जिल्‍हयाला राज्‍यातील प्रगत जिल्‍हा म्‍हणून पुढे नेण्‍यासाठी आपण प्रयत्‍नशील असल्‍याचे ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
वरोरा नगर परिषद क्षेत्रातील विकाससकामांसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध केल्‍याबद्दल नगराध्‍यक्ष अहेतेशाम अली यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे. यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी मंत्री संजय देवतळे आदींची भाषणे झालीत. वरोरा शहरातील अत्‍याधुनिक मत्‍स्‍य विक्री बाजारपेठ व गांधी उद्यानातील योग शेड चे लोकार्पण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पराते हॉस्‍पीटल पर्यंत सिमेंट रस्‍त्‍याचे भूमीपूजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाला मोठया संख्‍येने नागरिकांची उपस्थिती होती. 
000

चंद्रपूरच्या हुतात्मा स्मारकाला अद्ययावत करण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश


चंद्रपूर दि.17 ऑक्टोबर : चंद्रपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगणाऱ्या चंद्रपूरच्या हुतात्मा स्मारकाला लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत आवडीचे ठिकाण बनेल अशा पद्धतीने नव्या स्वरूपात तयार करा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
शनिवारी सायंकाळी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी हुतात्मा स्मारकाला भेट दिली. हुतात्मा स्मारकाचे स्वरूप बदलण्यासाठी नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांना दिले. यावेळी महापौर अंजलीताई घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे व अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.     .
            महानगरपालिकेमार्फत संरक्षण भिंतीचे काम सध्या सुरू आहे. तथापि, केवळ संरक्षण भिंत व डागडुजी न करता या संपूर्ण परिसराचा विकास करण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील हुतात्मा झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे दीर्घकाळ टिकणारे छायाचित्र संरक्षक भिंतीवर उमटतील अशा पद्धतीचे नियोजन करण्याचा आग्रह त्यांनी धरला. या परिसरामध्ये लहान मुलांपासून तर वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा सुविधा उपलब्ध करण्याचेही त्यांनी सुचविले. लहान मुलांसाठी एकीकडे प्लेगार्ड करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष निर्माण करण्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महिला व पुरुष यांच्यासाठी या परिसरात जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हुतात्मा स्मारक असल्यामुळे दुपारच्या वेळेस या ठिकाणी तरुण मुला-मुलींना अभ्यास करण्यासाठी जागा देखील उपलब्ध करण्यात यावी अशी सूचना देखील त्यांनी केली. मुलांना या ठिकाणी इतिहासाचे दर्शन होतानाच करिअर करण्याची संधी उपलब्ध होईल अशी बैठक व्यवस्था ही करण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
0000
मामा तलावांच्‍या पुनरूज्‍जीवन कार्यक्रमाअंतर्गत अखर्चीत निधी खर्च
करण्‍यासाठी मुदतवाढ ना.सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय

चंद्रपूर, दि.17 ऑक्टोंबर - पुर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्‍जीवन करण्‍याच्‍या कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हा परिषदेला सन 2016-17 मध्‍य वितरीत केलेल्‍या रू.34.46 कोटी निधीपैकी अखर्चीत रू.13.52 कोटी निधी दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत खर्च करण्‍याच्‍या प्रस्‍तावाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मान्‍यता दिली आहे.
पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्‍जीवन करण्‍याच्‍या कार्यक्रमाला शासन निर्णय दिनांक 16.5.2016 अन्‍वये मान्‍यता देण्‍यात आली असून हा कार्यक्रम सन 2016-17 ते सन 2018-19 या तीन वर्षामध्‍ये पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट आहे. चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये 51.91 कोटी रू. दायीत्‍वाची 520 कामे आहे. त्‍यापैकी 349 कामे भौतिकदृष्‍टया पूर्ण झाली असून त्‍यासाठी रू.20.94 कोटी निधी खर्च झाल्‍यानंतरही अंदाजे 10 कोटी रू. रकमेचे दायीत्‍व प्रलंबित आहेत. यासंबंधीची देयके प्रलंबित असल्‍यामुळे प्रगतीपथावरील 165 कामे पूर्ण करण्‍यासाठी वारंवार निविदा काढून देखील कंत्राटदारांकडून प्रतिसाद प्राप्‍त होत नाही. तसेच तलावामध्‍ये पाणी असल्‍यामुळे व काही दुरूस्‍ती दगडी अस्‍तराचे काम असल्‍यामुळे सदरची दुरूस्‍तीची कामे शक्‍य झाली नाही. या कार्यक्रमामुळे पुर्व विदर्भातील तलावांची सिंचन क्षमता तुलनेने कमी निधीमध्‍ये पुनःर्स्‍थापित होवून धान उत्‍पादक शेतक-यांना संरक्षीत सिंचनाची सोय होणार आहे. त्‍यामुळे जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या उद्देशाप्रमाणे गाव जल परिपूर्ण होण्‍यास मदत होणार आहे.
सन 2016-17 मध्‍ये वितरीत केलेला निधी दिनांक 31.3.2018 पर्यंत खर्च करता येईल असे शासन निर्णयात नमूद असल्‍यामुळे यासाठी एक वर्ष मुदतवाढ देण्‍याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. या माध्‍यमातुन माजी मालगुजारी तलावांच्‍या पुनरूज्‍जीवनाच्‍या कार्यक्रमाची उद्देशपुर्ती होण्‍यास मदत झाली आहे. 
                                                            0000

28 व 29 ऑक्टोबरला, चलो बल्लारपूरचा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचा नारा !

रोजगार महामेळाव्यासाठी सर्व यंत्रणांची बैठक 21 ते 25  ऑक्टोबर या काळात ऑनलाईन नोंदणी अनिवार्य
  50 ख्यातनाम कंपन्यांकडून शेकडोंची जागेवरच होणार निवड
100 टक्के पारदर्शिता, गुणवंताना मिळेल संधी
चंद्रपूर जिल्‍हयातील सुशिक्षीत बेरोजगारांनी लाभ घेण्‍याचे आवाहन

चंद्रपूर दि. 17 ऑक्टोंबर – राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दिनांक 28 आणि 29 ऑक्‍टोबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्हयातील युवकांसाठी युथ एम्‍पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्‍याचे आयोजन बल्‍लारपूर तालुक्‍यातील बामणी येथे करण्‍यात आले आहे. पारदर्शी निवड प्रक्रीयेचा आदर्श या मेळाव्यातून उभा राहिला पाहिजे. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डिजीटल सर्टिफिकेट, जागेवरच अपाँईंटमेट लेटर आणि प्लेसमेंट प्रक्रीया पूर्ण केल्या जाईल. त्यामुळे या मेळाव्याच्या आयोजनाची शिस्त प्रत्येक कार्यकर्त्याने, विभागाने व आयोजकांनी पाळावी, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.
स्थानिक हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत ते आज  बोलत होते. मार्गदर्शन,  प्रशिक्षण, कार्यशाळा,  मुद्रा कर्ज उपलब्धता,  याशिवाय 50 प्रतिष्ठीत कंपन्याकडून शेकडो युवकांची निवड या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्यात सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे 21 पासून सुरू होणाऱ्या या नोंदणी प्रक्रीयेवर तरुणांना लक्ष केंद्रीत करायला सांगा. ज्याच्यात प्रावीण्य असेल, कौशल्य असेल, गुणवत्ता असेल अशी तुमच्या व माझ्या जिल्हयातीलच मुलांची निवड होणार आहे. आपला जिल्हा रोजगार युक्त व्हावा, ही भावना ठेऊन यामध्ये सहभागी व्हा, आपल्या गावातील, तालुक्यातील, गटातील मुलांना मोठया कंपन्यांचे आकर्षक पॅकेज मिळावे. मुंबई, पुणे याप्रमाणे संधी मिळावी यासाठी कंपन्याच आपण हजार किलोमिटर अंतरावरील बल्लारपूरला आणल्या आहेत. या ठिकाणी फक्त नोकरीच भेटणार नसून ख्यातीप्राप्त मार्गदर्शक रोजगार, स्वयंरोजगार व अन्य क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी मदत करणार आहे, जिल्हयाच्या कायम स्मरणात राहील असा हा मेळावा असेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नागपूर येथील फॉर्च्यून फाऊडेशनचे अध्यक्ष आमदार अनील सोले यांनी या मेळाव्यातून आपल्या मुलाला,  नातेवाईकाला नोकरी लावायची नसून या जिल्ह्यातल्या हजारो युवकांना नोकरी देण्यासाठी हे आयोजन आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि प्रख्यात कंपन्यांना गुणवान मुलांची उपलब्धता करणे, त्यांना बल्लारपूरच्या आयोजन स्थळावर पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे व त्यासाठी संपूर्ण यंत्रणेने काम करावे. अतिशय पारदर्शी अशी निवड प्रक्रिया या ठिकाणी मुलांसमोरच केली जाणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री यांनी पुढाकार घेतल्यामुळे मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रख्यात कंपन्या चंद्रपूर सारख्या ठिकाणी येत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो लोकांना आपला आयुष्य घडविण्याची संधी आम्हा सर्वांना या आयोजनातून मिळणार आहे हे लक्षात घ्या, असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी काही समित्यांचे गठन करण्यात आले. 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनला सर्वाधिक महत्त्व देण्याचे आवाहन यावेळी आमदार सोले यांनी केले. आमदार सोले यांच्या नेतृत्वातील फॉर्च्यून फाउंडेशन हे या मेळाव्याच्या आयोजकांतर्फे एक आहे. याशिवाय जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, जिल्हा समन्वय समिती, चंद्रपूर यांच्‍या वतीने हे आयोजन करण्‍यात आले आहे.
चंद्रपूर जिल्‍हा रोजगारयुक्‍त बनविण्‍याच्‍या दृष्‍टीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन सेवा, मिशन स्‍वयंरोजगार, मिशन कौशल्‍य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन उन्‍नत शेती, मिशन सोशल वर्क हा सहा सुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. युथ एम्‍पॉवरमेंट समीट हा या सहा सुत्री कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे.
इयत्‍ता 10 वी पासुन पदवी, पदव्‍युत्‍तर,  अभियांत्रीकी, आय.टी.आय. अशा सर्वच प्रकारचे शिक्षण घेतलेले चंद्रपूर जिल्‍हयातील तरूण-तरूणी या मेळाव्‍यात सहभागी होवू शकतील. यासाठी www.yeschandrapur.com /register.aspx या माध्‍यमातुन ऑनलाईन नोंदणी इच्‍छूक तरूण, तरूणी करू शकतील. दिनांक 21 च्या सकाळी 10 वाजतापासून ते 25 ऑक्‍टोबरच्या     सायं.6 वाजेपर्यंत 5 दिवस ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे.
                                                0000