Search This Blog

Monday, 5 June 2023

अनधिकृत एचटीबीटी बियाणे खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

अनधिकृत एचटीबीटी बियाणे खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

            चंद्रपूर, दि. 5 : बाजारात बोगस कंपन्या, खाजगी व्यक्तींमार्फत परवाना नसलेल्या अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. या अवैध बियाण्यांना शासनाची मान्यता नाही. अशाप्रकारचे बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी अनधिकृत एचटीबीटी बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे. 

याप्रकारची बियाण्यांची लागवड केलेल्या कापूस पिकाची  पाने  व कापसाचे नमुने तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले असून एचटीबीटी आढळ्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.  तसेच एखाद्या व्यक्तीकडे अनधिकृत एचटीबीटी बियाणे आढळल्यास संबंधितांवर पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकतो. याबाबत कृषी विभाग व पोलीस विभाग सतर्क असून, एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेऊन असल्याने कोणीही सदर बियाणे विक्रीचा प्रयत्न  करू नये.  याप्रकारचे अनधिकृत बियाणे विक्रीसाठी बोगस कंपन्या, खाजगी एजंट, खाजगी व्यक्ती प्रलोभने  दाखवतील त्यास बळी पडू नये, फसवणूक होऊ शकते. यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.

बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी :

         बियाणे खरेदी करताना अधिकृत परवाना असणाऱ्या कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, पिशवी, टॅग इत्यादी जपून ठेवावी. पाकिटावर लॉट नंबर, अंतिम मुदत, उगवणशक्ती इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात. बियाणे पॉकीट योग्य वजनाचे  असल्याबाबत खात्री करावी. पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणी करून घ्यावी. कोणीही शेतकऱ्यांना एचटीबीटी असे अप्रमाणित  बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास  9561054229 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क  साधून  तक्रार नोंदवावी, असे कृषी विभागाकडुन कळविण्यात आले आहे.

००००००

पोलीस पाटील पदभरती करीता पात्रताधारक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित

 पोलीस पाटील पदभरती करीता पात्रताधारक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित

Ø उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी ही अट रद्द

 चंद्रपूर, दि. 05 : उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेली पोलीस पाटील पदे तात्पुरता स्वरूपात भरण्याकरीता पात्रताधारक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासोबतच जाहीरनाम्यात नमूद केलेल्या पात्रतेमध्ये उमेदवाराची त्या गावात जमीन असावी किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट वगळण्यात येत आहे. तथापि, उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा याकरीता तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडण्यात यावा, असे पोलीस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

पोलीस पाटील पदाकरीता उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 25 ते 45 असावे. सुदृढ शरीरयष्टी असावी. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा.

पदभरतीकरीता तालुक्यातील गावांची नावे :

नकोडा, पांढरकवडा, बोर्डा( इंदा), डोनी, झरी, जांभरला अडेगांव, चक बोर्डा, महादवाडी, धानोरा, पिपरी, वढा, शेनगांव, सिदूर, शिवनीचोर, गोंडसावरी, ताडाळी, वढोली, नागाळा(म), लोहारा, चक वायगांव, देवाडा, चोराळा या गावामध्ये पोलीस पाटीलची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

पोलीस पाटील भरती प्रक्रियेचा कार्यक्रम:

29 मे 2023 रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करणे, 15 जून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख. 17 ते 21 जून पर्यंत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरीता प्रवेशपत्र देण्यात येईल. लेखी परीक्षेचा दि.25 जून रोजी सकाळी 11 ते 12 पर्यंतच्या कालावधीत घेण्यात येईल. 27 जून रोजी लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करणे. 29 जून ते 2 जुलै 2023 पर्यंत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेकरीता उपस्थित राहण्यास पत्र देणे. 5 जुलै रोजी मुलाखत तर 10 जुलै रोजी अंतिम निकाल जाहीर करून नियुक्तीपत्र पाठविणे. असा  पोलीस पाटील भरती प्रक्रियेचा कार्यक्रम असणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

०००००००

Sunday, 4 June 2023

पोंभूर्णा येथे आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध

 


पोंभूर्णा येथे आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध

पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना मिळणार सुविधा

चंद्रपूर, दि ४ : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍ह्यातील पोंभुर्णा येथील आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी शासकीय जमीन उपलब्ध झाली आहे. यासंदर्भातील जमिन हस्तांतरणाचे आदेश चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

पोभूर्णा येथे अनुसूचित जमातीच्‍या मुलां-मुलींकरीता नवीन शासकीय वसतिगृह सुरू करण्‍यासाठी शासनाने मान्‍यता प्रदान केली होती. राज्‍य शासनाच्‍या आदिवासी विकास विभागाने दि. ८ मार्च २०१९ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला होता. विशेष म्‍हणजे दि. २ मार्च २०१९ रोजी सावली येथे झालेल्‍या विविध विकासकामांच्‍या भूमिपूजन कार्यक्रमात लवकरच अनुसूचित जमातीच्‍या मुलां-मुलींकरीता नवीन शासकीय वसतिगृह सुरू करण्‍याचे आश्‍वासन मंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार वसतिगृह मंजूर झाले. परंतु मध्यंतरीच्या काळात या वसतिगृहाचे काम जागेअभावी रखडले होते. आता पुन्हा या कामाला जोमाने सुरुवात होणार आहे.

चंद्रपूर जिल्‍ह्यातील पोंभूर्णा या आदिवासी बहुल तालुक्‍यांमध्‍ये अनुसूचित जमातीच्‍या अर्थात आदिवासी मुलां-मुलींसाठी वसतिगृह नसल्‍यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.शालेय तसेच महाविद्यालयांमधील अभ्‍यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्‍यांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. ग्रामीण तसेच दुर्गम भागातून येणारे हे विद्यार्थी तालुक्‍याच्‍या ठिकाणी शिक्षणाला येतात. मात्र त्‍या ठिकाणी निवास, भोजन व शैक्षणिक खर्च परवडत नसल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्‍याच्‍या दृष्‍टीने वसतिगृहाचा निर्णय घेण्‍यात आला होता. जागेचा प्रश्न सुटल्याने,अनुसूचित जमातीच्‍या विद्यार्थ्यांना तेथील शैक्षणिक संस्‍थांमध्‍ये उच्‍च शिक्षण घेणे सुलभ होणार आहे.

 जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाने आता या वसतिगृहासाठी शासकीय जमिन उपलब्ध झाली आहे.त्यामुळे लवकरच पोंभूर्णा येथे ७५ विद्यार्थी क्षमतेचे मुलांचे एक तालुकास्‍तरीय वसतिगृह तर ७५ विद्यार्थिनी क्षमतेचे एक तालुकास्‍तरीय वसतिगृह स्‍थापन करण्‍यात येणार आहे.

000000

ज्ञानसंकुलातील अभ्यासक्रमाचे प्रवेश बुधवारपासून


ज्ञानसंकुलातील अभ्यासक्रमाचे प्रवेश बुधवारपासून

एसएनडीटीच्या कुलगुरुंची घोषणा,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ

चंद्रपूर , दि. ४ : एसएनडीटी विद्यापीठाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस डिजीटल शाळेमध्ये स्थापन होत असलेल्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या ज्ञानसंकुलाचा शुभारंभ होणार आहे.

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाचा (एसएनडीटी) अभ्यासक्रम चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहे.  बुधवार, ७ जून २०२३ पासून या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना पत्र पाठवत ही माहिती दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एसएनडीटी विद्यापीठाचे ज्ञान संकुल ना. श्री. मुनगंटीवार यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे डॉ. चक्रदेव यांनी पत्रात नमूद केले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस डिजिटल शाळेमध्ये विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे उद्घाटन होत असल्याने विद्यार्थी विश्वात आनंदाचे वातावरण आहे. ७ जून २०२३ ला ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होईल.

दिला शब्द केला पूर्ण !

 हे केंद्र सुरू व्हावे यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांनी अहोरात्र प्रयत्न केले. या ज्ञानसंकुलात १० अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. दहा कौशल्याधारित अभ्यासक्रमांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व तरुणींना रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार आहे. या केंद्राचे सत्र जून २०२३  पासून सुरू होईल, अशी ग्वाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यांनी दिलेला शब्द खरा करुन दाखविला अशी भावना परिसरातील नागरिकांत व्यक्त होत आहे.

000 000

Saturday, 3 June 2023

जिल्हा न्यायालयात जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा

 




जिल्हा न्यायालयात जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा

चंद्रपूर दि.3, आजच्या जागतिक सायकल दिन व पर्यावरण दिनानिमित्त प्रदुषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे सायकल रॅलीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत करण्यात आले होते.

सदर सायकल रॅलीमध्ये तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत काळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी तसेच जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक विजय अंबारे, अधिक्षक सुरेश शेंडे, स्विय सहायक नरेन्द्र भोवरे, प्रकाश पायतोड व सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच मामला सायकल ग्रुप, आय.एम.ए. सायकल ग्रुप मधील मंगेश गुलवाडे व इतर सदस्य आणि गो ग्रिन सायकल ग्रुप मधील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी श्री. पी. जी. भोसले यांनी जागतीक सायकल दिनानिमित्त सर्वाना सुभेच्छा दिल्या व सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.  सदर रॅली जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथुन माहात्मा गांधी चौक मार्गे पुन्हा न्यायालयात येवुन रॅलीचा समारोप झाला. सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व कर्मचारी, पोलीस कर्मचारी व अॅड. महेंद्र असरेट यांनी सहकार्य केल्याची माहिती  सुमित जोशी यांनी दिली.

0000