Search This Blog

Thursday, 8 May 2025

जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान केंद्रांचा शोध घेऊन कारवाई करा


 

जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान केंद्रांचा शोध घेऊन कारवाई करा

Ø जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 8 मे : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे. जिल्ह्यात असे अवैध गर्भलिंग निदान केंद्र असतील तर ते शोधून काढावे तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्टींग ऑपरेशनची संख्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी संदर्भात आढावा वैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे आदी उपस्थित होते.

दर तीन महिन्यांनी नियमितपणे सर्व सोनोग्राफी केंद्राची तपासणी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व कागदपत्रे, अहवाल, दैनंदिन नोंदवही अतिशय गांभीर्याने तपासावेत. यात कुठेही निष्काळजीपणा होऊ देऊ नका. तसेच अवैध रित्या चालणारे केंद्र शोधून काढण्यासाठी स्टींग ऑपरेशनची संख्या वाढविणे आवश्यक आहे. यासाठी पोलिस विभाग किंवा इतर शासकीय कर्मचा-यांचे सहकार्य घ्यावे. 12 आठवड्यांच्या वर गर्भपात होत असलेल्या केंद्राला आवर्जुन भेट देऊन तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

खब-यांसाठी तसेच स्टींग ऑपरेशन करीता बक्षीस योजना : गर्भलिंग निदान चाचणी करणा-या व्यक्तिची माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच त्याने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने खातरजमा करून संबंधित व्यक्ती / सोनोग्राफी केंद्रावर खटला दाखल झाल्यावर माहिती देणा-या व्यक्तिस राज्य शासनातर्फे 1 लक्ष रुपये व चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे 25 हजार असे एकूण 1 लक्ष 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच स्टींग ऑपरेशनसाठी सहभागी होणा-या गर्भवती महिलेस न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर शासनातर्फे 1 लक्ष रुपये आणि चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

नागरिकांना आवाहन : जन्मापुर्वी मुलगा किंवा मुलगी आहे, हे जाणून घेणे कायद्याने गुन्हा आहे. असा गुन्हा करणा-या सोनोग्राफी केंद्राची माहिती टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 18002334475 वर, टोल फ्री क्रमांक 104, www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर, मनपा टोल फ्री क्रमांक 18002574010, व्हॉट्सॲप क्रमांक 8530006063 किंवा https://grievance.cmcchandrapur.com/complaint_registration/add या तक्रार निवारण ॲपवरही करता येऊ शकते.

००००००

विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करा


 विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करा

Ø पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

चंद्रपूर,दि. 8 मे : ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याकरिता जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये एखादया योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी पूढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय शासनाने केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल, हे कळू शकते तसेच लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

त्याकरिता सन 2025-26 या चालू वर्षात वैयक्तिक योजनांचा लाभ घेण्याकरिता 3 मे 2025 पासून  ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : http://ah.mahabms.com अँड्राईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव AH-MAHABMS(Google play Store वरिल मोवाईल अॅपवर उपलब्ध). टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 18002330418.

अशा आहेत योजना : पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सन 2025-26 या वर्षात विविध वैयक्तिक लाभाच्या योजना जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 100 कुक्कुट पिल्लांचे गट वाटप, विशेष घटक योजनांतर्गत 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा गट पुरवठा तसेच 75 टक्के अनुदानावर (10 शेळया व 1 बोकड) शेळी गट पुरवठा, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरिल आदिवासी योजना (TSP & OTSP) अंतर्गत 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा गट पुरवठा तसेच 75  टक्के अनुदानावर (10 शेळया व 1 बोकड) शेळी गट पुरवठा यासाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रकिया राबविली जाणार आहे. अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेअंतर्गत कार्यवाही सुरु असतांना आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्त्यात दर्शविलेलया टोल फ्री क्रमांकावर किंवा पंचायत समिती स्तरावर तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि.) किंवा कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकिय दवाखान्यातील अधिकारी किंवा कर्मचारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त प्रमाणात पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले आहे.

००००००

बेवारस मोटारसायकलचा होणार लिलाव

 

बेवारस मोटारसायकलचा होणार लिलाव

          चंद्रपूर, दि. 8 मे : माजरी येथील पोलिस स्टेशनमध्ये बरेच वर्षापासून बेवारस स्थितीत 40 मोटारसायकल जमा करण्यात आल्या आहेत. सदर वाहनाबाबत कोणताही इसम आजपावेतो पोलिस स्टेशनला वाहनाच्या मालकी हक्काबाबत मुळ कागदपत्र घेऊन हजर झाला नाही व मालकी हक्काबाबत मुळ कागदपत्र सादर केले नाही. 

          तरी सदर वाहन ज्या कोणाच्या मालकी हक्काचे असतील, त्यांनी पोलिस निरीक्षक, पोलीस स्टेशन माजरी यांच्या कार्यालयात सक्षम पुराव्यासह या उदघोषणापत्राच्या प्रसिध्दीपासुन 60 दिवसांच्या आत दावा दाखल करावा. विहीत कालावधीनंतर कोणाचाही दावा/हक्क/तक्रार दाखल करून घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे पोलिस निरीक्षक, माजरी पोलिस स्टेशन यांनी कळविले आहे.

००००००

श्रेया इथापेची खेलो इंडिया युथ गेम 2025 करिता निवड

 श्रेया इथापेची खेलो इंडिया युथ गेम 2025 करिता निवड

            चंद्रपूर,दि, 8 मे : केंद्र शासनाच्या खेलो इंडिया अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे मैदानी खेळ प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी मार्फत निवड करून तज्ज्ञ प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.  सदर प्रशिक्षण केंद्रातील श्रेया नितीन इथापे या खेळाडूची खेलो इंडिया युथ गेम सन 2025 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता 100 मी. हल्डर्स या क्रीडा प्रकारासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा दि. 12 ते 14 मे 2025 या कालावधीत पटना (बिहार) येथे होणर आहे. या स्पर्धेकरीता श्रेयाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, खेलो इंडिया प्रशिक्षक रोशन भुजाडे व इतर क्रीडाप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

        श्रेयाने राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत सलग 3 वेळा प्राविण्य व 20 वी नॅशनल अॅथलेटिक्स युथ गेम सन 2024-25 मध्ये 100 मी. हर्डल्स क्रीडा प्रकारामध्ये नेत्रदिपक कामगिरी करून रौप्य पदक प्राप्त केले होते.

००००००

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे


 

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Ø आयटीआयमध्ये नव्या सहा अभ्यासक्रमाचीही केली घोषणा

मुंबई / चंद्रपूर, दि. 8 मे : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज  या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत.  

          या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असो, याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे. मानवाने प्रगती केली असली तरी, आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलले असून बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे श्री. लोढा म्हणाले. त्याचबरोबर या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयटी आयमध्ये  सहा नव्या अभ्यासक्रमाची यावेळी घोषणा केली. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई व्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान,  सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे.

        दोन दिवसीय शिबिरात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील मंत्री यांचे विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन लाभले. तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांची नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेतली.

          राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉ. लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना नेमकी काय हे विद्यार्थ्यांना  सांगितले. या दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदतकार्य याचे प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे. मानव निर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून त्या काळात घ्यायची काळजी, उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बचावाची प्रात्यक्षिके विद्यार्थिनींनी सादर केली. राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती. एस. एस. माने यांनी यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

००००००