Search This Blog

Sunday, 1 October 2017

वैद्यकीय महाविद्यालयातील 30 अतिरीक्त खाटांच्या कक्षांचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे यांची उपस्थिती


चंद्रपूर, दि.29 सप्टेंबर- वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला प्रसूती वार्डातील 30 अतिरिक्त खाटांच्या कक्षाचे लोकार्पण राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थांमध्ये सुधारणा करुन या ठिकाणी दाखल होणा-या महिला रुग्णांना अतिरिक्त कक्ष देण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार महिला प्रसूती कक्षामध्ये आधीच्या 30 खाटांच्या कक्षामध्ये आणखी 30 खाटांची भर घालण्यात आली. विस्तारीत 30 खाटांच्या कक्षांचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी दाखल झालेल्या एका कुटूंबाच्या चिमुकलीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दाखल असणा-या रुग्णांची विचारपूस केली. रुग्णालया बाहेर आल्यानंतरही त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी भेटून वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मिळत असलेल्या सोयीसुविधांबाबत चौकशी केली. या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत आमदार नाना शामकुळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे, अतिरीक्त शल्य चिकित्सक डॉ.मुनघाटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर सोनारकर, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे आदी उपस्थित होते.
000

Friday, 29 September 2017

बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र म्हणजे स्वप्नपूर्तीचा आनंद --- ना.मुनगंटीवार





राज्यातील पहिल्या बांबू पदविका अभ्यासक्रमाचे उद्घाटन
बांबूच्या सायकलीवर पालकमंत्र्यांनी मारला फेरफटका

चंद्रपूर, दि.29 सप्टेंबर – चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून (बीआरटीसी) तयार होणा-या वस्तू देश-विदेशातील बाजारात देशासोबतच चंद्रपूरचे नाव उज्वल करेल. या ठिकाणी फक्त प्रशिक्षणार्थीच घडणार नाही, तर कुशल उद्योजक या केंद्रातून उभे राहतील. चंद्रपूर व परिसरातील आर्थिक विकासाला चालना देणारे केंद्र म्हणून ‘बीआरटीसी’ ची ओळख होईल, हे केंद्र स्वप्नपूर्तीचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
राज्यातील पहिल्या बांबू पदविका अभ्यासक्रमाचा शानदार शुभारंभ सोहळा चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे सभागृहातील समईपासून व्यासपिठावरील खुर्च्या, पोडीयम, मेज, भेट वस्तू, स्मृतीचिन्ह, रोपटयांची कुंडी, तिरंगा झेंडा, बांबूपासून तयार केलेली सायकल सर्वच काही बांबूपासून तयार करण्यात आले होते. याशिवाय प्रियदर्शिनी सभागृहाच्या दर्शनी भागामध्ये बांबूपासून बनवलेल्या विविध शोभेच्या वस्तूंची प्रदर्शनी लावण्यात आली होती. सभागृहामध्ये बांबू प्रशिक्षण केंद्रातर्फे तयार करण्यात आलेल्या पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यासाठी उत्सुक असणा-या महिला बचत गटांच्या शेकडो भगीनी उपस्थित होत्या. सभागृहात प्रवेश करतांनाच पालकमंत्र्यांनी बांबूच्या सायकलवर फेरफटका मारुन या केंद्राच्या कर्मचा-यांच्या कौशल्यला व कल्पकतेला दाद दिली.
व्यासपीठावर आमदार नाना शामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक जीत सिंग, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के.रेड्डी, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आर.एस.यादव, वन अकादमीचे संचालक अशोक खडसे, मुख्य वनसंरक्षक व्ही.एस.गुप्ता, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे पाटील, आयआयटी मुंबईचे सहप्राध्यापक संदेश आर.एम., बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.
सत्तेत नसतांना बांबू या वनस्पतीबद्दल कल्पवृक्षाच्या कल्पानांना कायदेशिर आयाम कसा देता येईल, याबाबत आपण नेहमी विचार करत होतो, असे पालकमंत्री म्हणाले. चिचपल्ली व परिसरात मोठया प्रमाणात बांबूपासून वस्तू तयार करणारे कुशल कामगार आहेत. त्यांना यातून व्यवसाय मिळावा यासाठी आमदार म्हणून मोठया प्रमाणात पत्र व्यवहार केला होता. मात्र 2014 मध्ये जेव्हा कॅबीनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा दुस-याच बैठकीत बांबू प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. लगेच बांबूवरील वाहतूक कर रद्द केला. बांबू प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनला देशातील जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्राचारण करण्यात आले. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर जिल्हयातील बांबू कारागिराच्या कौशल्याला बघून रतन टाटा देखील भारावून गेले. चिचपल्ली येथे 1 लाख फुटामध्ये जी इमारत बनणार आहे. तशी इमारत भारतात कुठेही नसून या ठिकाणच्या वास्तूसाठी रतन टाटांनी वास्तूविशारदांचे शुल्क ट्रस्टतर्फे दिले आहे. भारतातील सर्वांत सुंदर आणि संपूर्ण बांबूपासून तयार झालेली  वास्तू चिचपल्ली येथे उभी राहणार आहे.
या ठिकाणी दोन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांनी प्रातिनिधीक सत्कार केला. ते म्हणाले, केवळ हाच अभ्यासक्रम नव्हे तर येणा-या काळामध्ये अनेक कमी कालावधीचे अभ्यासक्रम या ठिकाणी सुरु केले जातील. या ठिकाणच्या प्रशिक्षणातून तयार होणा-या विद्यार्थ्यामध्ये आम्ही उद्याचे उद्योजक बघतो आहे. त्यासाठी आयआयटी मुंबई सोबत आज आपण करार केला आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी तयार होणा-या वस्तूंचे उत्तम मार्केटींग करण्याचे प्रशिक्षणही या ठिकाणी दिले जाणार आहे. जागतिक दर्जाच्या फर्निचर कंपनीसोबत आम्ही विक्रीचा करार करणार असून ॲमेझान कंपनी सारख्या वितरण व्यवस्थेलाही सोबत घेणार आहे. त्यांनी यावेळी सर्व शासकीय कार्यालयामध्ये बांबूपासून तयार होणा-या वस्तू वापरण्याबाबतचे निर्देश जिल्हयातील वरिष्ठ अधिका-यांना दिले. यासोबतच त्यांनी अगरबत्ती, टूथपीक व अन्य वस्तू यापुढे चीन, जापान, तैवान आदी ठिकाणावरुन आयात करावे लागणार नाही. चीन सारखी अर्थव्यवस्था बांबूमुळे सुदृढ होवू शकते तर हा प्रयोग चंद्रपूर व आसपासच्या परिसरात का होवू शकत नाही. असा प्रश्‍न करुन पोंभूर्णांमध्ये अगरबत्ती क्लस्टरची निर्मिती केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. जिल्हयामध्ये बांबूपासून वस्तू निर्मिती करणा-यांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देता येईल का याची तपासणी करण्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे विभागाने देखील बांबूच्या वस्तू वापरण्याबाबत सहमती दर्शविली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व आमदार नाना शामकुळे यांनी संबोधित केले. प्रास्ताविक मुख्य संरक्षक विजय शेळके यांनी केले. वनविभागाचे उपसचिव आर.एस.यादव यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभुषण पाझारे, नगरसेवक रामपालसिंग, राजू गोलीवार, महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे आदी उपस्थित होते. यावेळी बी.आर.टी.सी. आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामजंस्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आली. महिला बचत गटांच्या भगीनींना बांबूपासून विविध वस्तू तयार करणा-या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच बिआरटीसीच्या संख्येत स्थळाचे उदघाटन व विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
000      

Thursday, 28 September 2017

“ फोटो कॅप्शन ”


चांदा ते बांदा योजनेचा आढावा घेण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन व गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रु.वायाळ आदी उपस्थित होते.

नाल्यांचे खोलीकरण करण्याची जिल्हयात धडक मोहीम राबविण्यात यावी : ना.हंसराज अहीर


चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर – चंद्रपूर जिल्हयामध्ये जिवती, कोरपना व अन्य तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात बारमाही नाल्यांची मोठी संख्या आहे. वर्षभरातून किमान काही महिने वाहना-या नाल्यांच्या पाण्यांची साठवणूक करण्यासाठी खर्चिक बंधारे बांधण्याऐवजी या नाल्यांचे खोलीकरण करण्याची धडक मोहीम आखण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केली.
जिल्हयातील जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी जिल्हयातील 2015 पासूनच्या जलयुक्त शिवारमधील कामांचा आढावा घेतला. जिल्हयामध्ये सिंचन क्षमता वाढवायची असेल, तर जलसाठे वाढविणे गरजेचे आहे. कोल्हापूर बंधा-यामध्ये दरवाज्यांचे नियंत्रण, त्याची सुरक्षितता व पावसाळयातील देखभाल याबाबत अनिश्चितता असते. तसेच अशा पध्दतीचे बंधारे बांधणे जिल्हयासाठी खर्चिक ठरते. त्यातून पाणीसाठा होत नाही. मात्र नाल्यांचे खोलीकरण सलगरित्या केल्यास त्यातून सिंचनाची अधिक उपलब्धता होवू शकते. त्यामुळे जिल्हयात असणा-या पूर्वापार बंधा-यांना जीवंत करण्यासाठी त्यामध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी नाल्या खोलीकरण मोहीमेवर अधिक भर देण्यात यावा, अशी सूचना अहीर यांनी यावेळी केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंचन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करत असतांना जिल्हयाच्या जलयुक्त शिवार योजनेतून पाणीसाठा वाढवणे जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य असून उपलब्ध वाहत्या नाल्यांना जलयुक्त बनविण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या नेतृत्वात खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी, सिंचन, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते
000

मुद्रा योजनेतून अर्ज देणा-या योग्य उमेदवाराला कर्ज उपलब्ध झालेच पाहिजे : ना.हंसराज अहीर


जिल्हयातील बँकाच्या प्रतिनिधींसोबत घेतला आढावा

चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मुद्रा योजना हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सुशिक्षित बेरोजगारांना, होतकरु तरुणांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी देण्यात आलेला संकल्प आहे. त्यामुळे बँकेतील अधिका-यांनी अधिकाधिक सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी स्वत: प्रयत्न करावे. आलेल्या प्रत्येक अर्जाचा व मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज जिल्हयातील बँकांच्या अधिका-यांना दिले.
मुद्रा बँक योजनेअंतर्गत शिशू गट, किशोर गट, तरुण गट अशा योजनेमध्ये दहा हजारापासून दहा लाखापर्यंत विविध योजनांमधून सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्याची योजना आखण्यात आली आहे. तथापि जिल्हयामधील अनेक बँकानी या योजनेमध्ये अपेक्षित लक्ष पूर्ण केले नसल्याबद्दल अहीर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ज्या सुशिक्षित युवकांना कर्ज मिळाले आहे. त्यांनी कर्जाचे हप्ते नियमित स्वरुपात बँकेत भरुन आपली पत सांभाळावी व कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुद्रा बँक योजना सर्व देशभर राबविली जात असून चंद्रपूर जिल्हा सुध्दा योजनेमध्ये मागे पडता कामा नये, असे त्यांनी बजावले. गेल्या वर्षी 20 हजार लोकांना कर्ज मिळावे असे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 85 टक्के लोकांना कर्ज वाटप करण्यात आले. तथापि, कर्ज परत येत नाही असे कारण दाखवून बँकांनी नव्या उद्योजकांना कर्ज देणे बंद करणे संयुक्तीक नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रत्येक बँकेने त्यांच्याकडे अर्ज घेऊन येणा-या उमेदवारांची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केली. देशाच्या पंतप्रधानांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून बँकेमध्ये कर्मचारी नाहीत. बँकेला अन्य महत्वाचे प्रकल्प राबवायचे आहेत किंवा वारंवार उमेदवारांना परत पाठवण्याचे काम करु नये, असेही त्यांनी यावेळी उपस्थित बँक अधिका-यांना स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील नवतरुणांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्यासह जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, आंध्र बँक, महाराष्ट्र बँक, बडोधा बँक, कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक, ओरींटल बँक, युको बँक, युनीयन बँक आदींचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी जिवती व कोरपना परिसरातील बँकींग व्यवहार सुरु करण्यात यावे. या ठिकाणी विविध बँकेच्या शाखा उघडण्यात याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
            0000